Home Blog Page 482

मराठी पाऊल पडते पुढे, नितीन वाघ

 अतुल पवळे,पुणे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तरूणांना आव्हान केले आहे की, व्यवसायासाठी सगळ्यांना संधी उपलब्ध आहे. आता तुम्ही पुढे या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा. या आव्हानाला प्रतिसाद देत,आज कोंढवे धावडे येथे शिवसैनिक संतोष शेलार यांना गावातील तरुण सहकारी अमीन विश्वकर्मा व प्रकाश पवार यांना विश्वकर्मा एंटरप्राइजेस नावाने कार्यालय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देऊन विशेष सहकार्य केले.

 

या कार्यालयाचे उद्घाटन करताना खडकवासला विधानसभा क्षेत्रिय प्रमुख नितीन वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी शिवसैनिक संतोष शेलार, गणेश गवांडे,महेश नायडू, अंकुश मोकाशी, अविनाश सरोदे, अनिल हगवणे, अमोल गुंजाळ व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यातील १४ गावे झाली कोरोनामुक्त

 

निरगुडसर : प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील कोरोना बाधित व्यक्तिंनी उपचारास उत्तम प्रतिसाद दिला असून आतापर्यंत ३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर उर्वरित ६ रुग्ण ही लवकरच बरे होऊन घरी जातील असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.आंबेगाव तालुक्यातील सतरा गावांमध्ये कोरोना चे रुग्ण आढळून आले होते यातील आता १४ गावे कोरोना मुक्त झाले आहेत

आंबेगाव तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसात कोरोना रुग्णांची वाढ झाली नसून एकूण ३७ रुग्ण बरे झाले आहेत आतापर्यंत तालुक्यात ४४ कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तिंची नोंद झाली असून यातील आतापर्यंत ३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.व नारोडी येथील एक रुग्ण मयत झाला आहे.त्यानंतर दि ११ रोजी पारगाव येथील १ व दि १२ रोजी निरगुडसर येथील ५ व अवसरी बुद्रुक येथील १ असे एकूण ७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर उर्वरित वडगाव येथील १ ,गिरवली येथील ४,व चपटेवाडी येथील १ असे सहा रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित सहा रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती उत्तम आहे त्यामुळे तेही लवकरच बरे होऊन घरी येतील व आंबेगाव तालुका कोरोना मुक्त होईल अशी आशा तहसीलदार रमा जोशी,गटविकास अधिकारी जालींदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी व्यक्त केली आहे.

आंबेगाव तालुक्यातील साकोरे, शिनोली, जवळे, पिंगळवाडी, वळती, घोडेगाव, एकलहरे, उगलेवाडी, नारोडी, पेठ ,मंचर, पारगाव, निरगुडसर, अवसरी बुद्रुक, ही चौदा गावे करुणा मुक्त झाली असून उर्वरित वडगाव, गिरवली, चपटेवाडी येथील सहा रुग्णावर उपचार सुरू असून पुढील काही दिवसात हे रुग्ण देखील बरे होऊन घरी येतील व आंबेगाव तालुका कोरणा मुक्त होईल अशी भावना तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आंबेगाव तालुक्यालाही चक्री वादळाचा तडाखा ; तालुक्यातील जनजीवन विस्कळीत

 

निरगुडसर : प्रतिनिधी

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन आलेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर , मुंबई, ठाणे, पालघर ,पुणे ,परिसरात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.या निसर्ग चक्री वादळाचा तडाखा आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागापासून ते खाली चाळीस गावापर्यत सर्वच गावांना बसला असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महाराष्ट्र अगोदरच कोरोना सारख्या महामारीने हैराण झालेला असताना या चक्री वादळामुळे निर्माण झालेल्या जोरदार हवा व पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.आंबेगाव तालुक्यात अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून घरातील धान्य, कपडे व अंथरुण पांघरूण आलेल्या पावसाने भिजली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसाठी साठवून ठेवलेली वैरणही भिजली आहेत तर अनेक ठिकाणी बाजरी,फ्लॉवर,टोमॅटो,अशी पिके पूर्ण खाली पडली असून शेती पिकांमध्ये पाणी साचले आहे तर अनेकांच्या पोल्ट्री चे पत्रे, शेडचे पत्रे उडून गेले आहेत यासह तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडली असून रस्ते बंद झाले आहेत शाळा ,समाज मंदिरे यांचे पत्रे उडून गेले असून अनेक ठिकाणी वीज महावितरण कंपनीचे खांब कोसळले असून वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

निसर्ग चक्री वादळाचा तडाखा तालुक्यातील सर्वच गावात बसला असून या वादळात अनेकांच्या शेती पिकाची ,घराचे, पोल्ट्री शेडचे, जनावरांच्या खाद्याचे नुकसान झाले आहे तालुक्यातील नुकसान झालेल्या ठिकाणी पहाणी करुन शासनाने लवकरात लवकर नुकसानग्रस्त कुटुंब व शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडून खेड घाट बायपास रस्त्याची पाहणी

 

पुणे – लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बंद पडलेल्या खेडघाट बायपास रस्त्याचे काम सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (दि. ७ जून रोजी) या संपूर्ण ४.४ कि.मी. लांबीच्या बायपास रस्त्याची पायी चालत पाहाणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

या रस्त्याचे सुमारे ३.४ कि.मी. लांबीचे काम जवळपास पूर्ण झाले असून उर्वरीत १ कि. मी. लांबीतील मोठ्या पुलाचा अर्धा स्लॅब पूर्ण झाला आहे. तर उर्वरीत काम दोन-अडीच महिन्यात पूर्ण करून सप्टेंबरपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. विशेष म्हणजे ४.४ कि.मी. खेड बायपास रस्त्यावरुन स्वत: चालत जात कामाची पाहणी केली. अचानक पाहणीसाठी आलेल्या डॉ. कोल्हे यांना पाहताच तुकाईवाडी व भांबूरवाडी परिसरातील ग्रामस्थांनी अनिलबाबा राक्षे, वैभव घुमटकर यांच्यासमवेत डॉ. कोल्हे यांची भेट घेतली. तुकाईवाडी जवळच्या संभाव्य जंक्शनच्या कामाबाबत ग्रामस्थांचे म्हणणे डॉ. कोल्हे यांनी जाणून घेतले. तसेच लवकरच आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या समवेत चर्चा करून ही समस्या कशी सोडवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करु असे आश्वासन दिले. यावेळी कामाचा आढावा घेण्यासाठी ४ कि.मी. अंतर पायी चालणारा खासदार आम्ही पहिल्यांदाच पाहात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत डॉ. कोल्हे यांचे कौतुक केले.

चांडोली ते आळेफाटा (पुणे हद्दीपर्यंत) दरम्यानच्या बायपास रस्त्यांची कामे कंत्राटदाराने अर्धवट सोडल्यानंतर बंद पडली होती. त्यामुळे पुणे – नाशिक रस्ता केव्हा पूर्ण होणार या प्रश्नाबाबत सातत्याने चर्चा होत होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात हा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे निवडून आल्यावर या रस्त्याचे काम आपण पूर्ण करु असे आश्वासन डॉ. कोल्हे यांनी दिले होते. त्यामुळे निवडून आल्यानंतर त्यांनी या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले. त्यासाठी डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बैठक घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे बायपास रस्त्याच्या कामाची स्वतंत्र निविदा प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नारायणगाव व खेडघाट बायपास रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू झाले.

खेड घाट व नारायणगाव बायपास रस्त्याच्या कामात अनेक अडचणी होत्या. शेतकऱ्यांनी काम रोखले होते. या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून त्यावर मार्ग काढण्यासाठी डॉ. कोल्हे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी नवल किशोर राम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व संबंधित शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. प्रसंगी खासदार डॉ. कोल्हे यांनी स्वत: प्राधिकरणाचे अधिकारी व तांत्रिक सल्लागार यांच्यासह वादग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. जागेवर जाऊन शेतकरी व अधिकारी यांच्यात समन्वय साधून सर्वमान्य तोडगा काढला. त्यामुळेच प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले.

केवळ काम मंजूर झाले म्हणजे आपले काम संपले असे न समजता दर महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या बैठकांचे आयोजन करून वेळोवेळी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यामुळे ऐनवेळी आलेल्या अडचणींवर मार्ग काढता आला. त्यामुळे खऱ्याअर्थाने रस्त्याच्या कामाला वेग आला. खेड घाट बायपास रस्त्याचे काम मार्च अखेर तर नारायणगाव बायपास रस्त्याचे काम एप्रिल अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अचानक आलेल्या कोविड -१९च्या जागतिक महामारीला रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून शासनाच्या निर्देशानुसार काम पुन्हा बंद झाले होते.

मे महिन्याच्या अखेरीस लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाल्याबरोबर या दोन्ही बायपास रस्त्यांची कामे सुरू करण्याच्या सूचना डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कंत्राटदार यांना दिल्या. त्यानुसार काम सुरू करण्यात आले. मात्र परराज्यातील मजूर त्यांच्या घरी परत गेल्याने कामासाठी मजुरांची कमतरता भासत आहे, असे असले तरी कामाचा वेग कमी होता कामा नये अशा सूचना डॉ. कोल्हे यांनी दिल्या. त्यामुळे आज अचानक भेट देऊन डॉ. कोल्हे यांनी खेड बायपास रस्त्याची पाहणी केली. कामाच्या प्रगतीबाबत डॉ. कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले.

देशी दारूची वाहतूक करणाऱ्यावर मंचर पोलिसांची कारवाई

निरगुडसर : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री व वाहतूक बंद असतानाही आंबेगाव तालुक्यातील वडगाव कांशिबेग गावच्या हद्दीत देशी दारूची वाहतूक करणाऱ्यावर मंचर पोलिसांनी कारवाई करून २४९६ रुपये किमतीची दारू व दारू वाहतूक करणारी मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी जप्त केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की रविवार दि १४ रोजी ५वा.चे. सुमारास मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल के.एस.पाबळे ,पो.ह.मांडवे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वडगाव काशिंबेग फाटा येथे चेक पोस्टवर नाकाबंदी करत असताना मंचर वरून वडगाव काशिंबेग येथे येणारी गाडी इको एम एच ०६ ए.झेड. ४७४५ जोरात येताना दिसली त्यावेळी ही गाडी थांबवली असता गाडीतील तिघेजण पळून गेले गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये २४९६ रुपये किमतीच्या देशी दारूचे बॉक्स आढळून आले.तिथे उपस्थित असलेल्या लोकांना पळून गेलेल्या व्यक्तींची नावे विचारली असता त्यांनी किरण अरुण कळंबे, निलेश रत्नाकर कळंबे, उद्धव अशोक कळंबे ,( सर्व राहणार वडगाव काशिंबेग ता.आंबेगाव पुणे )असे सांगितले.पोलिसांनी देशी दारू चे बॉक्स व मारुती सुझुकी कंपनीची ईको गाडी ताब्यात घेतली असून सदर घटनेबाबत मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णदेव पाबळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.

सर्वसामान्य जनतेची हक्काची लाल परी निघाली ; रोटरी क्लब च्या वतीने वाहक व चालक यांचा सन्मान

 

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

राज्यभरात कोरोनाचा फैलाव वाढत असताना या आजाराचा प्रादुर्भावामुळे रोगाचे प्रसारण रोखण्यासाठी गेले तीन महीन्या पासून सार्वजनिक वाहतुक बंद करण्यात आली होती. कोरोनाचे सावट गेले नसले तरी काही प्रमाणात दैनंदिन जीवनमान सुरळीत सुरू झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले बस सेवेमुळे मंचर बस स्थानकामध्ये शुकशुकाट होता मात्र तिन महिन्यांच्या दिर्घ विश्रांतीनंतर मंचर बस स्थानकावरून दि १४ रोजी पहिली एस टी बस मंचर-कळंब-चास- घोडेगाव या मार्गाने सुरू झाली असल्याने सर्वसामान्य जनतेची लाल परी पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.जेष्ठ नागरिक व लहान मुलांना रोग प्रतीकारक क्षमतेच्या कारणाने त्यांना प्रवासास परवानगी नाही.मात्र इतर नागरिक नियमांचे पालन करून प्रवास करू शकतात असे एस.टी.महामंडळ यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यावेळी रोटरी कल्बचे अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर यांनी एस टी बसला हार घालून, चालक, वाहक यांना रोटरी क्लब मंचरच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले. चालक, वाहक, नियंत्रक, अधिकारी व प्रवाशांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी एस टी महामंडळातील कर्मचारी, अधिकारी, गौरव काळे(सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक) महेश विटे(सहाय्यक वाहतूक निरीक्षक) मोहमद सय्यद(वाहतूक नियंत्रक) अजयशेठ घुले, तुषार कराळे,सागर काजळे अमोल शिंदे, पप्पूशेठ थोरात, दिपकशेठ चवरे व इतर उपस्थित होते.

एस. एम. देशमुख यांची राज्यपालांनी विधान परिषदेवर पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करुन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला न्याय मिळवून द्यावा

 

उरुळी कांचन – प्रतिनिधी

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त जेष्ठ पत्रकार – पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक, मुंबई गोवा महामार्गाच्या यशस्वी लढ्याचे अग्रणी सामाजिक कार्यकर्ते एस एम देशमुख यांची राज्यपालांनी विधान परिषदेवर पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला न्याय मिळवून द्यावा, खरे तर या जागा समाजातील विविध क्षेत्रात जाणीवपूर्वक महत्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कार्यातून मिळालेल्या अनुभवाचा फायदा कायदे मंडळाच्या उच्च सभागृहाला मिळावा व त्यातून समाजाच्या उत्थानाच्या कार्याला वेग यावा , उपेक्षित वर्गाचा विकास व्हावा ही भूमिका तत्कालीन समाज धुरिणांनी घेतली व पाळली.
मात्र काही वर्षांपासून पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात या जागांना राजकीय स्वरूप आले आहे, ते कोणी तरी थांबवणे गरजेचे आहे आणि यासाठी आमच्या दृष्टीने आपण धाडसाने हे काम कराल ही भावना जागृत झाल्याने आपणास नम्र विनंती करतो की बऱ्याच दिवसांपासून राज्यातील तमाम पत्रकार वर्गाचे अनेक प्रश्न, मागण्या प्रलंबित आहेत त्या सभागृहात अभ्यासूवृत्तीने व कळकळीने मांडण्यासाठी व त्यातून पत्रकार बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी एस.एम. देशमुख यांच्यासारख्या लढवय्या नेत्याला ही संधी मिळावी अशी मागणी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे वतीने अध्यक्ष सुनिल लोणकर व जिल्हा समन्वयक पुणे जिल्हा पत्रकार संघ – तथा अध्यक्ष हवेली तालुका पत्रकार संघ सुनिल जगताप यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,, उपमुख्यमंत्री अजित पवार,, कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात , राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष व मंत्री जयंत पाटील , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेकडे ईमेल व्दारे निवेदन पाठवून केली आहे.

शॉटसर्किट होऊन घराला लागलेल्या आगीत सर्व जळून खाक

 

 

निरगुडसर : प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील मांदळेवाडी येथे शनिवार दि.६ रोजी रात्रीच्या सुमारास शेतकरी फकीरा रंगनाथ मांदळे यांच्या कौलारु घरास शॉर्टसर्किटने आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य, कपडे,भांडी,सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम तसेच सर्व घर जळून खाक झाले आहे.
महसुल विभागाने केलेल्या पंचनाम्यात १६ ते १७ तोळे सोने,२ लाख रुपये रोकड,फर्निचर,कपडे इत्यादी वस्तु जळुन खाक झाल्या आहेत.असे एकुण २६ ते २७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सिलेंडरचा स्फोट झाल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.रविवार दि.७ रोजी सकाळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य तथा पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ पंचनामा करुन आपत्तीग्रस्त कुटूंबियांना नुकसान भरपाई द्यावी.अशी सुचना विवेक वळसे पाटील यांनी महसुल विभागाला केली.त्यांच्या समवेत आंबेगाव तालुका विस्तार अधिकारी रामदास पालेकर,शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय आदक,सरपंच कोंडीभाऊ आदक,प्रा.अरुण गोरडे उपस्थित होते.

कुंभार समाज युवा आघाडीच्या वतीने १२१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 

प्रतिनिधी : निरगुडसर

एक हात मदतीचा..एक हात कर्तव्याचा”म्हणत आंबेगाव तालुक्यातील कुंभार समाजातील मुलांना शैक्षणिक मदत करण्याचे आवाहन केले असता याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आंबेगाव तालुका कुंभार समाज अध्यक्ष ज्ञानेश्वर विठ्ठल चव्हाण व शरद सोमवंशी याच्या मार्गदर्शना खाली आंबेगाव तालुक्यातील आंबेगाव तालुका कुंभार समाज युवा आघाडीच्या वतीने तालुक्यातील कुंभार समाजाच्या १२१ गरजू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या प्रादुर्भवामुळे लॉकडाऊन मध्ये विस्कटलेली आर्थिक घडी व चक्री वादळाचा बसलेला तडाखा या दुहेरी संकटामध्ये कुंभार समाज सापडला होता.त्या अनुषगाने
या समाजाच्या मुलांसाठी मदतीचा हातभार लागावा म्हणून युवक संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला समाजाच्या होतकरू तरुणांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत तालुक्यातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यतच्या १२१ गरीब व गरजू विध्यार्थ्यांना सुमारे ४० हजार रुपयांचे शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

वहीचे पान हा फक्त कोरा कागद नसून उज्वल भविष्य घडविण्याची ग्वाही असून कुंभार समाजातील मुलांना मिळालेल्या साहित्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा आम्हास प्रेरणा देणारा असून या पुढील काळात कुंभार समाजातील सन २०२० मध्ये दहावी व बारावी मध्ये सर्वात्तम मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आंबेगाव तालुका कुंभार समाजाच्या वतीने योग्य सत्कार करण्यात येईल असे कुंभार समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश दरेकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील जनतेच्या संयमामुळे हे शक्य झाले…वेल डन महाराष्ट्र ! – जयंत पाटील

मुंबई – प्रतिनिधी

महाराष्ट्रातील जनतेच्या संयमामुळे हे शक्य झाले… वेल डन महाराष्ट्र!.. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करून समाधान व्यक्त केले आहे.
राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना सोमवारी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात एकाच दिवशी ५ हजार ७१ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरद्वारे समाधान व्यक्त करत याचे श्रेय राज्यातील जनतेला तसेच अहोरात्र झटणाऱ्या प्रशासनाला दिले आहे.
जयंत पाटील यांनी सोमवारी रात्री उशिरा आरोग्य विभागाची अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध झाल्यावर ट्वीट केले. एकाच दिवशी ५ हजार ७१ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. ४ हजार २४२ रुग्ण मुंबई शहर व उपनगरातील आहेत. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. फक्त आणि फक्त राज्यातील जनतेच्या संयमामुळे, प्रशासनावरील विश्वासामुळे हे शक्य झाले आहे असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राज्याने दुसऱ्यांदा बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४७.२ टक्के आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.