डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडून खेड घाट बायपास रस्त्याची पाहणी

 

पुणे – लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बंद पडलेल्या खेडघाट बायपास रस्त्याचे काम सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (दि. ७ जून रोजी) या संपूर्ण ४.४ कि.मी. लांबीच्या बायपास रस्त्याची पायी चालत पाहाणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

या रस्त्याचे सुमारे ३.४ कि.मी. लांबीचे काम जवळपास पूर्ण झाले असून उर्वरीत १ कि. मी. लांबीतील मोठ्या पुलाचा अर्धा स्लॅब पूर्ण झाला आहे. तर उर्वरीत काम दोन-अडीच महिन्यात पूर्ण करून सप्टेंबरपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. विशेष म्हणजे ४.४ कि.मी. खेड बायपास रस्त्यावरुन स्वत: चालत जात कामाची पाहणी केली. अचानक पाहणीसाठी आलेल्या डॉ. कोल्हे यांना पाहताच तुकाईवाडी व भांबूरवाडी परिसरातील ग्रामस्थांनी अनिलबाबा राक्षे, वैभव घुमटकर यांच्यासमवेत डॉ. कोल्हे यांची भेट घेतली. तुकाईवाडी जवळच्या संभाव्य जंक्शनच्या कामाबाबत ग्रामस्थांचे म्हणणे डॉ. कोल्हे यांनी जाणून घेतले. तसेच लवकरच आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या समवेत चर्चा करून ही समस्या कशी सोडवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करु असे आश्वासन दिले. यावेळी कामाचा आढावा घेण्यासाठी ४ कि.मी. अंतर पायी चालणारा खासदार आम्ही पहिल्यांदाच पाहात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत डॉ. कोल्हे यांचे कौतुक केले.

चांडोली ते आळेफाटा (पुणे हद्दीपर्यंत) दरम्यानच्या बायपास रस्त्यांची कामे कंत्राटदाराने अर्धवट सोडल्यानंतर बंद पडली होती. त्यामुळे पुणे – नाशिक रस्ता केव्हा पूर्ण होणार या प्रश्नाबाबत सातत्याने चर्चा होत होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात हा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे निवडून आल्यावर या रस्त्याचे काम आपण पूर्ण करु असे आश्वासन डॉ. कोल्हे यांनी दिले होते. त्यामुळे निवडून आल्यानंतर त्यांनी या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले. त्यासाठी डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बैठक घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे बायपास रस्त्याच्या कामाची स्वतंत्र निविदा प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नारायणगाव व खेडघाट बायपास रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू झाले.

खेड घाट व नारायणगाव बायपास रस्त्याच्या कामात अनेक अडचणी होत्या. शेतकऱ्यांनी काम रोखले होते. या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून त्यावर मार्ग काढण्यासाठी डॉ. कोल्हे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी नवल किशोर राम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व संबंधित शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. प्रसंगी खासदार डॉ. कोल्हे यांनी स्वत: प्राधिकरणाचे अधिकारी व तांत्रिक सल्लागार यांच्यासह वादग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. जागेवर जाऊन शेतकरी व अधिकारी यांच्यात समन्वय साधून सर्वमान्य तोडगा काढला. त्यामुळेच प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले.

केवळ काम मंजूर झाले म्हणजे आपले काम संपले असे न समजता दर महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या बैठकांचे आयोजन करून वेळोवेळी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यामुळे ऐनवेळी आलेल्या अडचणींवर मार्ग काढता आला. त्यामुळे खऱ्याअर्थाने रस्त्याच्या कामाला वेग आला. खेड घाट बायपास रस्त्याचे काम मार्च अखेर तर नारायणगाव बायपास रस्त्याचे काम एप्रिल अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अचानक आलेल्या कोविड -१९च्या जागतिक महामारीला रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून शासनाच्या निर्देशानुसार काम पुन्हा बंद झाले होते.

मे महिन्याच्या अखेरीस लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाल्याबरोबर या दोन्ही बायपास रस्त्यांची कामे सुरू करण्याच्या सूचना डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कंत्राटदार यांना दिल्या. त्यानुसार काम सुरू करण्यात आले. मात्र परराज्यातील मजूर त्यांच्या घरी परत गेल्याने कामासाठी मजुरांची कमतरता भासत आहे, असे असले तरी कामाचा वेग कमी होता कामा नये अशा सूचना डॉ. कोल्हे यांनी दिल्या. त्यामुळे आज अचानक भेट देऊन डॉ. कोल्हे यांनी खेड बायपास रस्त्याची पाहणी केली. कामाच्या प्रगतीबाबत डॉ. कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले.

Previous articleदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यावर मंचर पोलिसांची कारवाई
Next articleआंबेगाव तालुक्यालाही चक्री वादळाचा तडाखा ; तालुक्यातील जनजीवन विस्कळीत