Home Blog Page 139

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त साने गुरुजी कथामालेच्या वतीने कथाकथन

राजगुरूनगर- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने साने गुरुजी कथामाला समिती पुणे यांच्या वतीने कथाकथन उपक्रमांतर्गत ७५ शाळांमध्ये कथाकथन उपक्रमांतर्गत खेड तालुक्यातील कनेरसर केंद्रातील जि.प.प्राथमिक शाळा गोसासी, वरूडे, जालिंदरनगर, कनेरसर येथे कथाकथन आयोजित करण्यात आले होते.
कथामालेचे कथाकार श्रीमती अपर्णा निरगुडे मॅडम व शोभना जोगळेकर मॅडम यांनी साने गुरूजी,स्वामी विवेकानंद, भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम,लता मंगेशकर यांच्या कथा अतिशय मार्मिकपणे ओघवत्या शैलीत सादर केल्या.

तसेच देशभक्तीपर गीते,स्फूर्तीगीते,गायन केली.या कथा व गाणी ऐकुन विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून आला.याचे सर्व श्रेय जाते ते अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे मुख्य कार्यवाह आदरणीय श्री.शामराव कराळे सर यांनी हा योग घडवून आणला.

या वेळी कनेरसर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.चंद्रकांत दौंडकर (भाऊ)यांच्या हस्ते श्रीमती अपर्णा निरगुडे मॅडम यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.श्री.चंद्रकांत दौंडकर यांनी साने गुरुजी यांच्या जीवन कार्यावर आधारीत २१ पुस्तके कनेरसर व जालिंदरनगर शाळेस भेट म्हणून दिली.विद्यार्थ्यांनी त्यांचे वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी उपयोग करावा व सानेगुरुजी यांचे विचार आत्मसात करावे असे सांगितले.

या कार्यक्रमास शाळेतील शिक्षिका श्रीम.अंजली शितोळे मॅडम, शुभांगी जाधव मॅडम, साने गुरुजी कथामाला पुणे ग्रामीणचे कार्यकारीणी सदस्य श्री.संदिप म्हसुडगे सर,कनेरसर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.चंद्रकांत दौंडकर उपस्थित होते.
या वेळी कनेरसर शाळेतील शिक्षिका श्रीम.सारिका राक्षे मॅडम यांनी सर्वाचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

कंत्राटी वीज कामगारांचा २१ मार्चला विधानसभेवर मोर्चा

कुरकुंभ,सुरेश बागल

महावितरण,महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील नियमित रिक्त पदावर हजारो वीज कंत्राटी कामगार व सुरक्षा रक्षक हे प्रामाणिकपणे कामे करत असून त्यांच्या समस्या ऊर्जामंत्री यांनी समजून घ्याव्यात व त्यावर तोडगा काढावा व ऊर्जा खात्यातील कष्टकरी पीडित शोषित वीज कामगारांना न्याय मिळावा म्हणून संघटनेच्या माध्यमातून आम्ही ऊर्जामंत्री या नात्याने आपणाकडे व शासनाकडे संघटनेने मागील २ वर्षांपासून अनेक पत्रव्यवहार केले.

आंदोलने केली मात्र ऊर्जामंत्री या नात्याने या पत्रांची व आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही पायी मोर्चा ची नोटीस ०४/०३/२०२२ रोजी देवुनही कोणतेही प्रकारची दखल शासनाने/ प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे २१ ता. पायी मोर्चा अटळ आहे या मोर्चा मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्हा मधून कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत अशी माहिती पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) अध्यक्ष श्री नीलेश खरात सरचिटणीस सचिन मेंगाळे, यांनी सांगितले. या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष उमेश आणेराव, संघटने मंत्री राहूल बोडके, व पुणे झोन संघटन मंत्री निखिल टेकवडे उपस्थित होते.

महावितरण, महापारेपण, व महानिर्मीती कंपनी मधील कंत्राटी कामगारांचे शासनाने स्तरावरील मुद्यावर , शासनाने संघटने सोबत चर्चा करावी व निर्णय करावा अशी मागणी संघटनेने केली आहे.

दि.२२ फेब्रुवारी २०२२ रोजी संघटनेने आत्मदहनाचे पत्र दिल्यानंतर शासन पातळीवरील ऊर्जा खात्याचे ऊर्जामंत्री या नात्याने संघटने सोबत चर्चा करून या शोषित पीडित कामगारांना न्याय देतील हे अपेक्षित होते.पण कोणतेही चर्चा शासन पातळीवर झाली नाही.
विविध जिल्हा मधे मा जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, कामगार आयुक्त कार्यालय, मा लोकप्रतिनिधी ना निवेदन देवुन या विषयावर लक्ष वेधून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे ही विनंती केली आहे.

तिन्ही वीज कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे शासन स्तरावर वर्षानुवर्षे प्रलंबित धोरणात्मक मुद्दे, समस्या

१ ) तिन्ही वीज कंपनीत रिक्त पदी वर्षानुवर्ष काम केलेल्या सर्व अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना इतर शासकीय अत्यावश्यक खात्या प्रमाणेच कोविड योद्धा / फ्रंट लाईन वर्कर हा दर्जा देऊन विशेष बाब म्हणून शासन सेवेत कायम स्वरूपी सामावून घ्यावे.

२ ) या कामगारांना वीज कंपनीत सामावून घेण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या मनोज रानडे समिती चा अहवाल सकारात्मक असून कंपनीचे व कामगारांचे हित पहाता या अहवालानुसार सर्व कामगारांना त्वरित न्याय मिळावा.

३ ) वीज कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळावे या करिता नियुक्त अनुराधा भाटीया समिती चा अहवाल शासनाकडे अनेक वर्षे प्रलंबित आहे या वर त्वरित कार्यवाही होऊन समान काम समान वेतन तिन्ही वीज कंपनीत कार्यरत कामगारांना लागू करावे.

४ ) कंत्राटी कामगारांना कंत्राटदार मुक्त रोजगार दिल्यास कंत्राटदारांच्या मार्फत होणारी त्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल व वीज कंपनीच्या खर्चात सुमारे 25% बचत होईल.अशी कंपनीच्या आर्थिक हिताची सूचना संघटनेने या पूर्वी वारंवार केली या साठी.
अ) पूर्वाश्रमीच्या वीज मंडळात शासन मान्यता मिळालेल्या रोजंदारी कामगार पद्धती प्रमाणे कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा या साठी चर्चा व्हावी
ब ) अथवा उपकंपनी नेमून कंत्राटदार विरहित कंत्राटी कामगार भरती करावी या साठी चर्चा व्हावी.

५ ) महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या सभापती मा.नीलम ताई गोऱ्हे यांनी राज्य कामगार मंत्री यांना हिवाळी अधिवेशन २०२१ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार वीज कंत्राटी कामगारांच्या हितार्थ त्वरीत अशा महामंडळाची स्थापना करावी. त्यात भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींचा समावेश करावा जेणे करून कामगार कंत्राटदार विरहित होतील व त्यांना आर्थिक स्थेर्य व शाश्वत रोजगार ( जॉब सिक्युरिटी ) मिळेल.

६ ) संघटनेने २०१९ साली पुणे ते मुंबई असा पायी मोर्चा काढला होता त्यावेळी तत्कालीन ऊर्जामंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत २७ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार प्रशासनाने अंमलबजावणी करावी व त्या चर्चेनुसार कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार ( जॉब सिक्युरिटी ) मिळावा.

७ ) कोरोना काळात सेवे दरम्यानच्या अपघातात मृत पावलेल्या वीज कंत्राटी कामगारांच्या वारसांना शासन सेवेत सामावून घ्यावे तसेच त्यांच्या वारसाला शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी.
जनसेवा करतांना अपघातामध्ये जखमी झालेल्या वीज कंत्राटी कामगारांना देखील शासन स्तरावर आर्थिक मदत करावी.

८ ) महाराष्ट्र शासनाच्या विमा संचालनालयाचा दहा लाखाचा विमा जसा कायम कामगारांना लागू आहे त्याच धर्तीवर तिन्ही वीज कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांना हा १० लाखाचा विमा देखील लागू करावा .

तलाठी महिलेस २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

चाकण – पाच वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या जमिनीच्या ७/१२ नोंदीसाठी लाच स्वीकारणा-या तलाठी महिलेस पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. १६) रंगेहाथ पकडले. चाकणमधील आंबेठाण येथील तलाठी कार्यालयात ‘एसीबी’च्या पुणे विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

वर्षा मधूकर धामणे (वय ४५, रा. तलाठी, सजा म्हाळूंगे, अतिरिक्त कार्यभार आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. खासगी व्यक्ती अकबर (पूर्ण नाव, पत्ता, उपलब्ध नाही) याच्यावरही चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (पुणे) सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय तक्रारदार हे यांनी सन २०१७ मध्ये म्हाळूंगे गावच्या हद्दीत जमीन खरेदी केली. खरेदी केलेल्या जमिनीच्या सात-बारा नोंदीसाठी तलाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारत होते. मात्र तलाठी कार्यालयातून नोंदीचे काम होत नव्हते.

तलाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारल्यानंतर खासगी व्यक्ती अकबर यांच्याकडून सात-बारा नोंदीसाठी सुरवातीला एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तलाठी धामणे यांनी ३० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये लाच बुधवारी (दि. १६) स्वीकारली. त्यावेळी ‘एसीबी’च्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील तपास करीत आहेत.

मधुकर गिलबिले यांचा समाजकार्य प्रेरणा पुरस्काराने गौरव

राजगुरूनगर -येथील प्राथमिक शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते मधुकर गिलबिले गुरुजी याना नुकताच कराड येथे स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर समाजकार्य प्रेरणा पुरस्कार देण्यात आला.जी.के गुजर मेमोरियल ट्रस्ट बनवडी कराड यांच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर यांच्या ३३ व्या पुण्य स्मरण दिनानिमित्त राज्यातील स्वातंत्र्य सैनिक वंशज,सामाजिक कार्यकर्ते यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

मधुकर गिलबिले हे येथील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव स्मृती स्थळ बसस्थानक येथे अनेक वर्ष दैनिक पूजा करत आहेत, हुतात्मा राजगुरू जीवन चरित्रावर अनेक व्याख्याने, समाधी स्थळ पंजाब भेट,तसेच साहित्य क्षेत्रात त्यांनी चार पुस्तके लिहिली आहेत.अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो या सर्व कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी जी.के .गुजर मेमोरियल ट्रस्ट अध्यक्ष डॉ. अशोक गुजर , डॉ.माधुरी गुजर ,भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती अध्यक्ष संपतराव जाधव , क्रांतिसिंह नाना पाटील गौरव समिती अध्यक्ष बाबा राव मुठाळ , माजी नगराध्यक्ष नंदकुमार भटाने, कृषी अधिकारी विलास पवार,तसेच केंद्रप्रमुख गजानन पुरी,शिक्षक तानाजी चौधरी,सुभाष सांडभोर, साहित्यिक संतोष गाढवे यांसह राज्यातून आलेले सामाजिक कार्यकर्ते, विद्या नगर बनवडी येथील विद्यार्थी उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त झाल्याने गिलबिले गुरूजींचा सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

धामणीकरांच्या पिण्याच्या पाण्याची योजना आठवड्यात मार्गी लागणार – विवेक वळसे पाटील

मंचर – राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना २०१४-१५ आर्थिक वर्षात मंजूर असलेली मौजे धामणी पाणी पुरवठा योजना ही येत्या आठवड्यात पुर्ण होऊन दरवर्षी ऐन उन्हाळ्यात भासणाऱ्या धामणीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. तसेच टँकरने देखील पाणी पुरवठा करावा लागणार नाही.

मंचर (ता.आंबेगाव) येथे संपन्न झालेल्या बैठकीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील, पं स सदस्य मा.रवींद्र करंजखेले, गटविकास अधिकारी मा.जालिंदर पठारे, निरगुडसर मा.उपसरपंच रामदासशेठ वळसे पाटील, धामणी सरपंच सागर जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग श्री टोपे, शाखा अभियंता श्री गांधी, श्री पाटील, सतीश जाधव पाटील, आनंदा पाटील जाधव, ठेकेदार योगेश आदक आदि उपस्थित होते.

जऊळके बु’ येथील ठाकरवाडी शाळेतील विद्यार्थांना वाढदिवसा निमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

राजगुरुनगर- आपल्या २१ व्या विवाह वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून मंगेश महाराज आडवळे यांनी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यां सोबत केक कापुन आपला वाढदिवस साजरा केला . तसेच शाळेतील विद्यार्थांना अध्यापनासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप केला .

या प्रसंगी मंगेश महाराज आडवळे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात शिक्षणाचे महत्व किती आहे .आपण का शिक्षण घेतले पाहिजे या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रामचंद्र येवले सरांनी केले .

या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री सुरेश मेंगडे . दत्तात्रय टाकळकर चांगभलं गृप चे अध्यक्ष संतोष येवले, अविनाश आडवळे, अंगणवाडी ताई, सौ सुवर्णा कराळे उपस्थित होते . शाळेचे मुख्याध्यापक श्री क्षिरसागर सरांनी महाराजांचा सन्मान करून सर्वांचे आभार मानले .

बहुळ सोसायटीच्या अध्यक्षपदी कान्हू वाडेकर व उपाध्यक्षपदी शशिकांत मोरे यांची बिनविरोध निवड

चाकण- खेड तालुक्याच्या पुर्व भागातील महत्वाची मानली जाणारी बहुळ विविध विकास सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी चेअरमन व व्हाईस चेअरमनपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आला. चेअरमनपदी बाळासाहेब कान्हु वाडेकर व व्हाईस चेअरमनपदी सिद्धेगव्हाणचे मा. सरपंच शशिकांत प्रकाशराव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शशिकांत मोरे यांनी यापूर्वी सिद्धेगव्हाणचे बिनविरोध सरपंच पद भुषविले आहे.

यावेळी नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील व पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी व्हाईस चेअरमन शशिकांत मोरे यांनी आमदार दिलीपराव मोहिते पाटील व पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुळ विविध विकास सहकारी सोसायटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या विकासाचा आलेख उंचवण्यासाठी प्रयत्न करणार , नाबार्डच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी विजयी मिरवणूक काढली. बहुळ विविध विकास सहकारी सोसायटी इतिहासात दुसऱ्यांदा बिनविरोध झाली.

यावेळी पंचायत समितीच्या मा. सदस्या सौ. सुरेखाताई वाडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धैर्यशील पानसरे, खरेदी विक्री संघाचे संचालक पठाणराव वाडेकर, मा. सरपंच राजाभाऊ साबळे, अॅड. सुखदेव तात्या पानसरे, संतोष साबळे,पै. अनिल साबळे, संदिप साबळे,उपसरपंच गणेश वाडेकर,धंनजय पठारे,बाळासाहेब आरेकर, बाळासाहेब वाडेकर, भरत काटकर, अशोक नाईक, सुधीर गंगावणे, सत्यवान काळे, बाळासाहेब मोरे, मारुती आप्पा वाडेकर, संजय आरेकर, विनायक पवार ,दिलीप मोरे,प्रदिप तांबे, विठ्ठल साळुंखे, नवनाथ पानसरे, अनिल मोरे, मनोज मोरे, कपिल मोरे इ. उपस्थित होते.
निवडणूक अधिकारी म्हणून मा.श्री. कांबळे साहेब यांनी काम पाहिले.

हवेलीसाठी अप्पर तहसील कार्यालय, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची विधानसभेत माहिती :  आमदार अशोक पवार यांच्या मागणीला यश

उरुळी कांचन

हवेलीत लवकरच अप्पर तहसीलदार कार्यालय होणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. हवेलीचे विस्तारीकरण,नागरीकरण, विकास पाहता तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा तोकडी असून यंत्रणेवर प्रचंड ताण असल्याने हवेली तालुक्याचे महसूली विभाजन करण्याबाबत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

हवेली तहसिल कार्यालयात दैनंदीन कामकाज संदर्भात दर महिन्याला साधारणत: ७ ते ८ हजार विविध अर्ज प्राप्त होतात. तर शिक्षा पत्रिका मिळणेसाठी दरमहा साधारणत: ४०० ते ५०० अर्ज प्राप्त होतात. हवेली तहसिल कार्यालय नागरीक सुविधा केंद्रातर्फे दरमहा विविध प्रकारचे साधारणत: ६००० दाखले दिले जातात. त्याव्यतिरिक्त जमीन मागणी बाबत विविध व्यक्ती व संस्थांची प्रकरणे, जमीन खरेदी विक्री व्यवहाराच्या नोंदी, विविध प्रकारच्या परवानग्या, तदनुषंगिक दावे, न्यायालयीन प्रकरणे, नैसर्गिक आपत्ती, पुरवठा विषयक कामकाज, नियोजन व कार्यवाहीबाबत बैठका, निवडणूक कामकाज, जनगणना विषयक कामकाज इत्यादी कामकाज तहसिलदार हवेली यांना पहावे लागते. वाढती लोकसंख्या नागरीकरण, शहरीकरण इ. बाबी विचारात घेता परिसरातील नागरीकांच्या सोयीसाठी तसेच प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी हवेली तालुक्यासाठी स्वतंत्र अपर तहसिल कार्यालय स्थापन करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या लोकसंख्येसाठी उपलब्ध असलेल्या तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषि अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी यांची तुलनात्मक संख्या पाहता हवेली तालुक्यात तोकड्या व अन्य प्रशासकीय यंत्रणेमुळे नागरिकांवर प्रचंड अन्याय होत आहे. सद्या वस्तुस्थिती पाहता हवेली तहसिल कार्यालयाचे विभाजन करुन हवेलीसाठी स्वतंत्र नविन तहसिल कार्यालय स्थापन करण्यात यावे. आणि तेथे स्वतंत्र तहसिलदार, गटविकास अधिकारी व कृषि अधिका-यांची पदे वाढवावीत. तसेच तालुक्यातील विकास कामांची गती वाढविण्याची नितांत आवश्यकता आहे.यासाठी आमदार अशोक पवार यांनी हवेली तालुक्यासाठी स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालयाची मागणी केली होती. या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हवेलीसाठी अप्पर तहसीलदार कार्यालय लवकर होणार असल्याची माहिती विधानसभेत दिली.

हवेली तालुक्यात १६० गावांचा समावेश असून तेथे जवळजवळ ४० लाख लोकसंख्येची वस्ती असणे, हवेली तालुक्याचे वाढते विस्तारीकरण, नागरीकरण, विकास पाहता या तालुक्यासाठी सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेली प्रशासकीय यंत्रणा अत्यंत तोकडी असून इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या तालुक्यासाठी शहरी व ग्रामीण भागाला मिळून एकच तहसिलदार, गटविकास अधिकारी व कृषि अधिकारी असल्यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण पडत असणे, यामुळे खरेदी-विक्री व्यवहार, पुरवठाविषयक कामे, विविध परवानग्या, दाखले, नैसर्गिक आपत्ती, कायदा सुव्यवस्था, बैठका, नियोजन, न्यायालयीन कामकाज इत्यादी महत्वाच्या कामांमधील विलंबासह जनतेच्या विकास कामांवर परिणाम होत आहे.

नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनलचा एकतर्फी विजय

नारायणगाव (विशेष प्रतिनिधी) – नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनलने एकतर्फी १२ जागांवर बहुमताने विजय मिळविला. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर यांनी दिली.

या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे हे सर्वात जास्त मते मिळवून निवडून आले आहेत. तसेच आपला आवाज न्यूज नेटवर्क चे कार्यकारी संपादक किरण वाजगे हे देखील बहुमताने निवडून आले आहेत.
या निवडणुकीत श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनल व श्री मुक्ताई,हनुमान,भागेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनल यांच्यात जोरदार लढत झाली.

ही निवडणूक एकतर्फी व बहुमताने जिंकल्यामुळे पॅनल प्रमुख सरपंच योगेश पाटे, सरपंच राजेश मेहेर, संजय वारुळे, राहुल बनकर, आशिष फुलसुंदर, माजी सरपंच अशोक पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, भागेश्वर डेरे, अशिष माळवदकर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
८३ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोसायटीची निवडणूक झाली आहे. इतर मागास प्रवर्गातून श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनलचे अरुण हरिभाऊ कोल्हे हे बिनविरोध निवडून आले होते

.१२ जागांसाठी झालेल्या लढतीमध्ये श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनलचे सर्वसाधारण गटातून संतोष बबन खैरे (८१० मते), सिताराम आत्माराम खेबडे (८०९ मते), किरण लक्ष्मण वाजगे (७८२ मते), कैलास दत्तात्रय डेरे (७८१), रामदास जिजाबा तोडकरी (७४९ मते), राजेंद्र देवराम पाटे (७८९ मते), चंद्रकांत पिराजी बनकर (७१० मते), बाळासाहेब केरू भुजबळ (७३९ मते), महिला प्रतिनिधी गटातून आरती संदिप वारुळे (८९७ मते), सीमा संदेश खैरे (८३९ मते) या दोघी विजयी झाल्या तर पराभूत सुजाता जयसिंग भुजबळ यांना (५०९ मते) मिळाली. अनुसूचित जाती जमाती गटातून – मारुती जानकू काळे (८४५ मते) मिळाली तर पोपट महादू जाधव यांना (४२२) मते मिळाली, भटक्या विमुक्त जाती व विशेष प्रवर्ग गटातून – बाबाजी येड्डू लोखंडे (८४९ मते) मिळाली तर पराभूत उमेदवार येल्लू लोखंडे यांना (४५७ मते) मिळाली.दरम्यान या निवडणुकीमध्ये एकूण १९१९ मतदार होते. यातील १३८७ मतदारांनी मतदान केले. सर्वसाधारण गटातील १२९ मते बाद झाली.

सर्वसाधारण गटातील पराभूत उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे कैलास ज्ञानेश्वर पानसरे (५०८ मते), भागुजी गणपत पानसरे (४८२ मते), गणेश विलास वाजगे (४७९ मते), बबन दत्तात्रय खैरे (४५८ मते), सागर लक्ष्मण दरंदाळे (४४४ मते), जयवंत बाबुराव औटी (३५५ मते), सुरेश पांडुरंग खैरे (३५५ मते), गणेश तुकाराम तांबे (३४७ मते).महिला राखीव गटातून, अनुसूची जाती जमाती व भटक्या विमुक्त जाती जमाती मधून अनुक्रमे ५२, १०८ व ८१ एवढी मते बाद झाली.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर शेतकरी विकास पॅनलच्या वतीने मोठा जल्लोष करून आणि जेसीबी द्वारे गुलाल भंडारा उधळून विजयी उमेदवारांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

पिंपरी सांडस सोसायटीला पीडीसीसी बँकेच्या वतीने ढाल भेट

उरुळी कांचन

पूर्व हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट काम केल्याबद्दल हवेली तालुक्यातुन एकमेव संस्थेची निवड झाल्याने छत्रपती शिवाजी महाराजांची ढाल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा दिंगबर दुर्गाडे यांच्या हस्ते देण्यात आली असल्याची माहिती सोसायटीचे संचालक नवनाथ वायकर यांनी दिली.

याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदिप कंद, संचालक विकास दांगट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, माजी सभापती दिलीप काळभोर तसेच विभागीय आधिकारी नरेश शिरसाम, सिनियर ऑफिसर तुषार मोकाशी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नंदुपाटिल काळभोर, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रशांत काळभोर यांच्या उपस्थित देण्यात आले.

पिंपरी सांडस विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सतिष भोरडे, संचालक नवनाथ वायकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल भोरडे, दत्तात्रय भोरडे, सोसायटीचे सचिव संजय चव्हाण आदी उपस्थित होते.