हवेलीसाठी अप्पर तहसील कार्यालय, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची विधानसभेत माहिती :  आमदार अशोक पवार यांच्या मागणीला यश

उरुळी कांचन

हवेलीत लवकरच अप्पर तहसीलदार कार्यालय होणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. हवेलीचे विस्तारीकरण,नागरीकरण, विकास पाहता तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा तोकडी असून यंत्रणेवर प्रचंड ताण असल्याने हवेली तालुक्याचे महसूली विभाजन करण्याबाबत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

हवेली तहसिल कार्यालयात दैनंदीन कामकाज संदर्भात दर महिन्याला साधारणत: ७ ते ८ हजार विविध अर्ज प्राप्त होतात. तर शिक्षा पत्रिका मिळणेसाठी दरमहा साधारणत: ४०० ते ५०० अर्ज प्राप्त होतात. हवेली तहसिल कार्यालय नागरीक सुविधा केंद्रातर्फे दरमहा विविध प्रकारचे साधारणत: ६००० दाखले दिले जातात. त्याव्यतिरिक्त जमीन मागणी बाबत विविध व्यक्ती व संस्थांची प्रकरणे, जमीन खरेदी विक्री व्यवहाराच्या नोंदी, विविध प्रकारच्या परवानग्या, तदनुषंगिक दावे, न्यायालयीन प्रकरणे, नैसर्गिक आपत्ती, पुरवठा विषयक कामकाज, नियोजन व कार्यवाहीबाबत बैठका, निवडणूक कामकाज, जनगणना विषयक कामकाज इत्यादी कामकाज तहसिलदार हवेली यांना पहावे लागते. वाढती लोकसंख्या नागरीकरण, शहरीकरण इ. बाबी विचारात घेता परिसरातील नागरीकांच्या सोयीसाठी तसेच प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी हवेली तालुक्यासाठी स्वतंत्र अपर तहसिल कार्यालय स्थापन करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या लोकसंख्येसाठी उपलब्ध असलेल्या तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषि अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी यांची तुलनात्मक संख्या पाहता हवेली तालुक्यात तोकड्या व अन्य प्रशासकीय यंत्रणेमुळे नागरिकांवर प्रचंड अन्याय होत आहे. सद्या वस्तुस्थिती पाहता हवेली तहसिल कार्यालयाचे विभाजन करुन हवेलीसाठी स्वतंत्र नविन तहसिल कार्यालय स्थापन करण्यात यावे. आणि तेथे स्वतंत्र तहसिलदार, गटविकास अधिकारी व कृषि अधिका-यांची पदे वाढवावीत. तसेच तालुक्यातील विकास कामांची गती वाढविण्याची नितांत आवश्यकता आहे.यासाठी आमदार अशोक पवार यांनी हवेली तालुक्यासाठी स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालयाची मागणी केली होती. या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हवेलीसाठी अप्पर तहसीलदार कार्यालय लवकर होणार असल्याची माहिती विधानसभेत दिली.

हवेली तालुक्यात १६० गावांचा समावेश असून तेथे जवळजवळ ४० लाख लोकसंख्येची वस्ती असणे, हवेली तालुक्याचे वाढते विस्तारीकरण, नागरीकरण, विकास पाहता या तालुक्यासाठी सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेली प्रशासकीय यंत्रणा अत्यंत तोकडी असून इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या तालुक्यासाठी शहरी व ग्रामीण भागाला मिळून एकच तहसिलदार, गटविकास अधिकारी व कृषि अधिकारी असल्यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण पडत असणे, यामुळे खरेदी-विक्री व्यवहार, पुरवठाविषयक कामे, विविध परवानग्या, दाखले, नैसर्गिक आपत्ती, कायदा सुव्यवस्था, बैठका, नियोजन, न्यायालयीन कामकाज इत्यादी महत्वाच्या कामांमधील विलंबासह जनतेच्या विकास कामांवर परिणाम होत आहे.

Previous articleनारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनलचा एकतर्फी विजय
Next articleबहुळ सोसायटीच्या अध्यक्षपदी कान्हू वाडेकर व उपाध्यक्षपदी शशिकांत मोरे यांची बिनविरोध निवड