Home Blog Page 120

बिबट सफारी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रूपयांचा निधी मंजूर

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारीचा प्रस्तावित प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत हा निधी प्राप्त झाला आहे. अशी माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिली.

दरम्यान जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा अनावरण कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार मागील महिन्यात आले होते व या दौऱ्यादरम्यान माणिकडोह येथील वन्यजीव हॉस्पिटल उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांनी बिबट सफारी प्रकल्पाच्या प्रकल्प अहवाल निर्मितीसाठी निधी देण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी आता झाली आहे. बिबट सफारी प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी वन अधिकारी, त्याचप्रमाणे पर्यटन तज्ञ व अभ्यासक यांच्या सहकार्याने अहवाल तयार करण्यात येईल त्यानंतर लवकरच हा परिपूर्ण अहवाल शासनाकडे सादर करण्यात येईल.

अजित पवार यांनी जुन्नर दौऱ्या दरम्यान दिलेला शब्द पाळला याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानत असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचेही आपण ऋणी असल्याचे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी म्हटले आहे

मंगला बनसोडेंचा पुत्र नितीन बनसोडेंने केला बैलगाड्याचा नाद ; बैलगाडा थेट तमाशाच्या व्यासपीठावर

नारायणगाव : किरण वाजगे

तमाशा पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नारायणगाव (ता. जुन्नर) येथील श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवाच्या यात्रेनिमित्त मंगला बनसोडे यांच्या तमाशा व्यासपीठावर सोमवार (दि.२ रोजी ) सादर केलेल्या गीतांमधून बैलगाड्या सह जल, वायू, अग्नी, आकाश व पृथ्वी या पंचतत्वाचा अनोखा संगम येथे पाहायला मिळाला.
नारायणगाव येथे यात्रेनिमित्त सलग सात ते आठ लोकनाट्य तमाशा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात. यामुळे तमाशा कार्यक्रम सादर करणारा प्रत्येक फडमालक नारायणगावात तमाशा करताना काहीतरी नावीन्यपूर्ण सादरीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो.

याच अनुषंगाने आघाडीचे फडमालक मंगला बनसोडे व नितीन करवडीकर यांनी थेट तमाशाच्या व्यासपीठावर बैलगाडा आणून त्याला दोन पायाचे बैल जुंपले. अर्थात दोन पायाचे बैल म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून बैलाचा मुखवटा परिधान करणारे दोन कलाकार बैलगाड्याला जुंपले होते.
हे दृश्य पाहताना अनेकांनी एकच जल्लोष करत “नाद एकच एकच बैलगाडा शर्यत” या गाण्यावर जोरदार ठेका धरला.

याचप्रमाणे “टिपटिप बरसा पानी” या गाण्या द्वारे जल, वायू, अग्नी, आकाश व पृथ्वी या पंचतत्वाचा अनोखा संगम तमाशाच्या व्यासपीठावर सोमवारी रात्री पहायला मिळाला.

तमाशा कार्यक्रमामध्ये ही अनोखी गीते नितिन बनसोडे यांच्यासह नृत्यांगना रमा शेवगावकर, कोमल शेवगावकर, रेश्मा पुणेकर व कामिनी मुंबईकर तसेच त्यांच्या सहकलाकारांनी सादर केली. तत्पूर्वी सुरुवातीला मंगला बनसोडे यांच्या नृत्य अदाकारीने देखील रसिक प्रेक्षक घायाळ झाले.

थेट व्यासपीठावर बैलगाडा घेऊन जाणाऱ्या व स्टेजवर पाण्याचा पाऊस पाडून व अग्नी प्रज्वलित करून एकाच ठेक्यात नृत्य सादर करणाऱ्या नितिन बनसोडे यांच्या अनोख्या स्टाइल ची चर्चा मात्र नारायणगावसह संपूर्ण पंचक्रोशीत होत आहे.

दरम्यान तमाशा कार्यक्रमामध्ये यात्रा कमिटीच्या वतीने मंगला बनसोडे व नितिन बनसोडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी दत्तोबा फुलसुंदर, विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे, अनिल खैरे, विजय विटे, संतोष शशीनाना खैरे, संभाजी पाटे, अक्षय वाव्हळ, राम शेवाळे, गणेश पाटे, हितेश कोराळे, स्वप्निल भोंडवे, आशिष वाजगे, श्री भुजबळ, श्री मेहत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंगला बनसोडे नितिन बनसोडे यांच्या तमाशा ला रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी १०६ हुतात्म्यांना व कामगारांच्या कार्याला “तैल बैला”वर तिरंगा फडकावून केला सलाम

राजगुरूनगर – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा तैल बैला टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी सर करीत राकट, कणखर दगडांचा देश म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्र देशास प्रणाम केला आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण करून आणि कामगारांच्या कार्यास सलाम करून तिरंगा फडकाविला.

या मोहीमेची सुरवात मुळशी तालुक्यातील तैल-बैला येथून झाली करून अवघ्या पाऊण तासांची पायपीट तैल-बैला च्या पायथ्याला घेऊन जाते. आरोहणासाठी सुमारे एक तास लागतो. हातांच्या आणि पायांच्या बोटांची मजबूत पकड करून आरोहण करावे लागते.

पहिला १०० फुटी टप्पा पार केल्यावर एक छोटा ट्रॅवर्स मारल्यावर २० फुट आरोहण केल्यावर दुसरा टप्पा येतो. या नंतर अंगावर येणारा पुढील १०० फुटी टप्पा चिकाटीने पार करताना कस लागतो. शेवटचा ३० फुटी टप्पा पार केल्यावर शिखर गाठता येते.

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा ९० अंशातील ३०० फुटी सरळसोट कठीण चढाई, २०० फुटी रॅपलिंगचा थरार, पाहताक्षणीच मनात धडकी भरावी असे तैल-बैलाचे रांगडे रूप, अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या जॅकी साळुंके, चेतन शिंदे, मंदार चौधरी, सिद्धार्थ बावीसकर, अक्षय कातोरे, महेश जाधव, वैभव गांगुर्डे, पूजा साळुंके, सुवर्णा कांगणे, राजश्री चौधरी, कमलसिंग क्षत्रिय, अनुराग दांडेकर, सचिन अतुगडे, पुरुषोत्तम राऊत, निलेश खेडकर, मयुर शेटे, सचिन तुपे, बालाजी जामखेडे, प्रशील अंबाडे आणि डॉ.समीर भिसे या गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते केली.

मोलमजुरी, धुणीभांडी, भाजी विकण्याची वेळ कलाकारांवर पुन्हा येऊ नये – सुरेखा पुणेकर

नारायणगाव : किरण वाजगे

गेली दोन वर्ष सर्वच कलावंत कोरोना परिस्थितीमुळे हालाकीत जगत होते. अनेकांना रोजगार नव्हता त्यामुळे कलाकार धुणीभांडी, मोलमजुरी करून पडेल ते काम करत होते व प्रसंगी भाजी देखील विकत होते. अशी वेळ पुन्हा कोणत्याही कलाकारावर येऊ नये असे प्रतिपादन सुरेखा पुणेकर यांनी नारायणगाव (ता. जुन्नर) येथे झालेल्या लावणी महोत्सवात केले.

मराठी बाणा प्रतिष्ठाण (महा. राज्य) यांनी प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या लावणी महोत्सव व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर बोलत होत्या.
या कार्यक्रमात लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर तसेच लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे यांनी आपल्या लावणी संचाच्या माध्यमातून अनेक लावण्यांचे सादरीकरण केले.

आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते सुरेखा पुणेकर व मेघा घाडगे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी आमदार अतुल बेनके यांनी मराठी बाणा प्रतिष्ठानचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगत मागील दोन वर्षात कोरोना कालावधीमध्ये आपण व आपल्या कुटुंबियांच्या वतीने तसेच राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्या वतीने सर्व प्रकारच्या कलावंतांना भरभरून मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही सर्व कलाकारांना आपण मदत करू असे आश्वासन देखील आमदार बेनके यांनी दिले.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, वनक्षेत्रपाल अजित शिंदे, सुजित खैरे, सुरज वाजगे, मराठी बाणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रमेश मेहेत्रे, नारायणगाव विकास सोसायटीचे व्हा. चेअरमन किरण वाजगे, ऍडव्होकेट राजेंद्र कोल्हे, तमाशा फडमालक लता पुणेकर, अंजली खैरे, नंदा मुथ्था, ज्योती संते, प्रकाश नेहरकर, गणेश वाजगे, विलास पानसरे, मनोज बेल्हेकर, पप्पू जठार, ओंकार भोंडवे, तुळशीदास कोराळे, निलेश कोल्हे, अभिजीत विटे, अमोल पानसरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सुरेखा पुणेकर यांनी तमाशा व लावणी या बाबत म्हटले की, माझ्या आईवडिलांचा तसेच आजोबांचा देखील तमाशा होता. त्यामुळे मला लावणीचे बाळकडू तमाशा मध्येच मिळाले. तमाशा आणि लावणी माझ्यासाठी सारखेच आहे. लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे यांनी नारायणगावकरांच्या प्रेमामुळे, स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या भूमी मुळे व माझ्या गुरुस्थानी असलेल्या सुरेखा पुणेकर यांच्या उपस्थितीत मला जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याने मी आज खूप भाग्यवान ठरले आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त पी के जुनियर कॉलेजमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

चाकण – महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त पी के ज्युनिअर कॉलेज, कडाचीवाडी (चाकण) येथे लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर आणी सुदर्शन नेत्रालय व ऑप्टिकल्स चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन सोमवार (दि.2 मे ) रोजी करण्यात आले होते.

करोना कालावधीत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणाला सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम मुख्यतः विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या दृष्टीवर झाल्याचे दिसून येत असल्याने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन कॉलेजच्या वतीने करण्यात आले. सदर शिबीराचा लाभ सुमारे 132 विद्यार्थी व शिक्षकांनी घेतला.

यानिमित्ताने संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी विविध समाज सुधारक व राज्यकर्त्यांचा योगदानाचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ चाकण सफायरचे पदाधिकारी तसेच सुदर्शन नेत्रचिकित्सालयाचे डॉक्टर दिनेश उबाळे, नेत्रचिकित्सक श्री. अविनाश उबाळे, संस्था प्रतिनिधी निकिताताई खांडेभराड उपस्थित होते

पीके फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रतापराव खांडेभराड व सचिव नंदाताई खांडेभराड यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच लायन्स क्लब चाकण सफायर व सुदर्शन नेत्रालयाच्या प्रतिनिधींचे आभार मानले.

वन नेटवर्क एंटरप्रायझेसच्या वतीने संगणक सख्य प्रकल्पाचा शुभारंभ

गणेश सातव,वाघोली

सामाजिक कार्यात सातत्याने भरीव योगदान देणाऱ्या ‘वन नेटवर्क एंटरप्रायझेस’ या पुणे स्थित सॉफ्टवेअर कंपनीच्यावतीने पुणे महानगरपालिका माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी संगणक सख्य या प्रकल्पाचा शुभारंभ सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय,भवानी पेठ येथे शुभारंभ करण्यात आला असून आधार सामाजिक संस्था पुणे या संस्थेस प्रकल्प अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या प्रकल्पाअंतर्गत मनपाच्या माध्यमिक शाळांना प्रत्येकी पाच संगणक,पाच संगणक टेबल व खुर्च्या तसेच एक प्रिंटर व स्कॅनर या साहित्यासह सुसज्ज संगणक कक्षाद्वारे विद्यार्थ्यांना संगणक व इंटरनेट वापरासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रसंगी बोलतांना वन नेटवर्क एन्टरप्रायझेसचे संचालक मा. श्री. समीर कुलकर्णी म्हणाले की, “वन नेटवर्क एन्टरप्रायझेस” ही कंपनी सॉफ्टवेअर क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कार्यासाठी ओळखली जाते सोबतच एक सामाजिक जबाबदारी म्हणून वंचित व गरजू घटकांसाठी योगदान देत आहे. मनपा शिक्षण मंडळातर्फे आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांमार्फत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत दिले जाते ही पुणे शहरासाठी अभिमानाची बाब आहे. मनपा शिक्षण मंडळाच्या या कार्यात सहभाग म्हणून वन नेटवर्क एंटरप्रायझेसच्या वतीने माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांमध्ये संगणक व इंटरनेट कौशल्य विकसित करून येणाऱ्या स्पर्धात्मक काळासाठी त्यांची तयारी करून घेण्यात येणार आहे.संगणक शिक्षक बालसुलभ व अनौपचारिक पध्द्तीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.आधार सामाजिक संस्था ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेल व पुणे मनपा शिक्षण मंडळाचे आवश्यक ते सहकार्य लाभेल याची आम्हाला खात्री आहे.

या प्रसंगी मा.श्री. दामोदर उंडे, (उपशिक्षणाधिकारी,पुणे मनपा शिक्षण मंडळ माध्यमिक व तांत्रिक विभाग),गीतांजली पडळकर (वरिष्ठ व्यवस्थापक वन नेटवर्क एन्टरप्रायझेस) वैशाली गुडदे (प्रकल्प संचालिका आधार सामाजिक संस्था)अमोल शिंदे (अध्यक्ष आधार सामाजिक संस्था)राजेंद्र गाढवे (मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय) उपस्थित होते. प्रकल्पासाठी पोपट श्रीराम काळे (शिक्षणाधिकारी,पुणे मनपा शिक्षण मंडळ माध्यमिक व तांत्रिक विभाग) यांनी मार्गदर्शन केले.

निमगाव सोसायटीकडून १कोटी २८लाख कर्ज वाटप

राजगुरुनगर- निमगाव खंडोबा (ता.खेड) विकास कार्यकारी सहकारी सोसायटीने ३१ मार्च अखेर शंभर टक्के पीक कर्ज वसूल केले असून व सोसायटीने किसान क्रेडिट कार्ड नुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा दावडी अंतर्गत २५७ सभासदांना १५९ हे.९५ आर साठी १कोटी २८लाख कर्ज वाटप केला असल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि शाखा दावडीचे विकास अधिकारी श्री सचिन खेडकर संस्थेचे सचिव श्री दत्तात्रेय रोडे यांनी दिली .

यावेळी चेअरमन श्री अनिल गुलाबराव शिंदे, व्हाईस चेअरमन श्री खंडेराव सोनवणे , संचालक श्री बाळासाहेब गोपाळा शिंदे, श्री भगवान शंकर शिंदे, श्री केशव दौलत शिंदे,श्री सोपान लक्ष्मण शिंदे, श्री युवराज राजाराम शिंदे, श्री मनोहर किसन गोरगल्ले, तज्ञ संचालक . श्री दशरथ गुलाब शिंदे, तज्ञ संचालक श्री बाळासाहेब श्रीपती येवले व ग्रामस्थ श्री बबन तुकाराम शिंदे श्री संजय माणिक शिंदे, श्री दिलीप गेनभाऊ शिंदे, श्री किरण बबन शिंदे श्री विशाल माणिक शिंदे, श्री बाळासाहेब लक्ष्मण शिंदे, श्री विठ्ठल उध्दव शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

निलेश सरवदे स्वरचित ‘पांथस्थ’ या कवितासंग्रहाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन


गणेश‌ सातव,वाघोली

नवोदित कवी निलेश सरवदे उर्फ निलेशकुमार स्वरचित व मैत्री पब्लिकेशन प्रकाशित ‘पांथस्थ’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच पुण्यात एस. एम.जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनच्या सभागृहात पार पडला.

या नवकवितांच्या संग्रहाचे प्रकाशन जेष्ठ कवी,लेखक डॉ. प्रदीप आवटे,अरिहंत एज्युकेशन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.भूषण पाटील,प्रकाशक मोहिनी कारंडे,निलेशकुमार यांचे आई-वडील यांच्या हस्ते व जेष्ठ साहित्यक,८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

प्रकाशन सोहळ्यानंतर डॉ. प्रदीप आवटे कवितासंग्रहाविषयी बोलत असताना म्हणाले, “प्रेम उमगणं महत्वाचं कारण द्वेष करायला फार अक्कल लागत नाही. ते पुढे म्हणाले, परिघावरील मंडळींचे प्रश्न आपल्याला या कवितेमध्ये दिसत राहतात. तुम्ही जे जगता त्या जगण्याला प्रश्न विचारण्यासाठी लिहता ते ही निलेशच्या कवितेत दिसतं. या कविता आई वडिलांच्या जगण्यातून आली आहे.”

डॉ. भूषण पाटील यांनी बोलताना शिक्षणाचं महत्व अधोरेखित करत कवितासंग्रहाला शुभेच्छा दिल्या.सोबतचं शिरुर कासार पंचायत समितीच्या सभापती उषाताई सरवदे यांनी कवी निलेशकुमार यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत,कवितासंग्रहाला शुभेच्छा दिल्या.

जेष्ठ साहित्यीक, विचारवंत व समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, निलेशकुमार अत्यंत सूचक, गांभीर्यपूर्ण आकलनाची सूत्र काव्यात्म करून आपल्या समोर मांडत आहे. वैचारिक दृष्टीने, कल्पनेच्या दृष्टीने, प्रतिमेच्या दृष्टीने सामर्थ्याच्या दृष्टीने या अत्यंत महत्वाच्या कविता आहेत. आंबेडकरवादी, दलित कवितेचे व्रत, परंपरा जी आहे ती संघर्षाची आहे. सबंध आंबेडकरी प्रेरणेतून आलेली दलित कविता बाजूला सारून निलेशकुमार हा संवादाच्या भूमिकेतून कविता लिहतो हे त्याच वेगळेपणं आहे. देशातल्या जगातल्या कोटी कोटी सर्वहारा वर्गाच्या कष्टकऱ्यांच्या वेदनेची कविता आहे. निलेशकुमारची कविता प्रश्न निर्माण करते. सर्व विचारवंत, प्रतिभावंत ज्या जागेवर हात टेकतात त्या जागेवरची ही कविता आहे.
निलेशकुमार हा विद्रोही कवी जरूर आहे पण तो विवेकीविद्रोही कवी आहे. ते पुढे म्हणाले, निलेशकुमारच्या कविता या माणसाच्या आनंदासाठीच्या कविता आहेत. माणसाच्या दुःख मुक्तीचा ध्येयवाद अधोरेखित करणाऱ्या कविता आहेत. संवादावर विश्वास असणारा हा कवी आहे. तुम्ही जर समता आमलात आणू शकत नसाल तर विद्यापीठातील विद्वान काय करताय? असा प्रश्न श्रीपाल सबनीस यांनी निलेशकुमार यांच्या विद्यापीठ या कवितेचा संदर्भ देत असताना केला आहे. पुढे ते बोलताना म्हणाले, “माझ्या प्रस्तावनेला आणि लेखणीला ही जात नाही.

सूत्रसंचालन निवेदक आरती गाढवे यांनी केलं. सदर काव्य संग्रहातील कवितेचे विवेक वंजारी व अमर मालन मारुती यांनी काव्यवाचन केलं, टीम तरुणाईचे अभिषेक आकोटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि कार्यक्रमाचा शेवट अक्षय चव्हाण यांनी गायलेल्या वामन दादा कर्डक यांच्या व शंतनू कांबळे यांच्या ‘समतेच्या वाटेनं’ या गीताने झाला. यावेळी अर्थतज्ञ अजित अभ्यंकर, किसान सभेचे डॉ.अमोल वाघमारे, अभ्यासक प्रवीण निकम,प्रज्ञेश मोळक, कवी प्रा. हनुमंत भवारी आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील मान्यवर व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुरकुंभ एमआयडीसीतील एमक्युअर कंपनीत १२ लाखांच्या केमिकलची चोरी

सुरेश बागल,कुरकुंभ

एमआयडीसी मधील एमक्युअर फार्मास्युटीकल लिमिटेड
या कंपनीमधील ३ किलो ४६६ ग्रॅम पॅलेडियम ऑन कार्बन या केमिकलची सुमारे १२ लाख ५४ हजार ९४७ रूपये किंमतीच्या केमिकलची चोरी झाल्याची फिर्याद कंपनीचे व्यवस्थापक राहुल हनुमंत मोरगावकर ( वय ५२ रा . शालीमार चौक ) यांनी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती नुसार कुरकुंभ औद्योगीक वसाहतमधील एमक्युअर फार्मासुटीकल लिमीटेड प्लॉट नं. डी.२४ आणि २४/१ या कंपनीमध्ये वेअर हाउस ( स्टोअर) मध्ये पॅलेडियम ऑन कार्बन ( ५० % वेट ) हा कच्चा माल ठेवलेला असतो . हे अंत्यत संवेदनशील रसायन आहे . (ता.२८ मार्च २०२२ ) रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास कंपनीचे वेअर हाऊस विभागाचे अधिकारी श्रीकांत जाधव यांनी स्टॉकची तपासणी करताना १०% व पॅलेडियम ऑन कार्बन ( ५० %) कच्चा माल अंदाजे ३ किलो ४६६ ग्रॅम या ठिकाणी नसल्याचे निदर्शानास आले . त्यांनी कंपनीतील वरिष्ठ अधिकारी अशोक राठोड यांना बोलावुन तेथे माल नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले . त्यांनी कंपनीतील सी.सी.टि.व्ही फुटेज तपासले तसेच कर्मचारी यांच्याशी याबाबत चौकशी केली . मात्र या ठिकाणावरील माल कुठे गायब झाला हे निष्पन्न झाले नाही. ३ किलो ४६६ ग्रॅम , एका किलोची किंमत ३ लाख ६२ हजार ७४ पैसे ) प्रमाणे १२ लाख ५४ हजार ९४७ किंमतीचे हे रासायनिक अज्ञात चोरट्यांनी चोरू नेले आहे .याबाबत कंपनीचे व्यवस्थापक राहुल मोरगावकर यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये मोठी टोळी असून मुंबई तसेच इतर राज्यांतील रासायनिक केमिकल युक्त चोरी करणाऱ्या चोरांचा यामध्ये समावेश असू शकतो असे पोलिसांकडून सांगण्यात आले व पुढील तपास पोलीस करत आहेत.

पबजी गेम खेळायला मोबाईल घेण्यासाठी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण चोरी करणारा १८ वर्षीय चोरटा जेरबंद

राजगुरुनगर- पबजी गेम खेळण्यासाठी मोबाईल हवा यासाठी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे गंठण चोरी करण्याऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली आहे.

मालती रामदास भगत (रा.राक्षेवाडी,राजगुरूनगर) या राक्षेवाडी येथे किराणा घेण्यासाठी गेल्या असता अज्ञात चोरट्याने दुचाकी वर भरधाव वेगाने येऊन त्यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाचे गंठण जबरदस्तीने हिसकावून पळून गेले होते.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस कॉन्स्टेबल धिरज जाधव यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की ,सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी वापरलेली मोटार सायकल ही हिंगणगाव ता.शिरूर ,जि. पुणे येथील एक जण वापरत असलेचे समजले त्यावरून सदर ठिकाणी सापळा रचून सदर वर्णनाची गाडी आणि ती वापरत असणाऱ्या एकास ताब्यात घेतले असता,त्याने त्याचे नाव अजय राजु शेरावत (वय १८, रा.हिंगणगाव,ता.शिरूर, जि. पुणे) असे सांगितले.

खेड येथील सदर गुन्ह्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याने त्याचे साथीदारसोबत केला असल्याचे सांगत आहे . सदरील आरोपी यास ताब्यात घेऊन पुढील तपासकामी खेड पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे, खेड उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पोलिस उपनिरीक्षक, शिवाजी ननवरे, पो हवा अतुल डेरे, विजय कांचन, पो ना बाळासाहेब खडके, अमोल शेडगे ,पो कॉ धिरज जाधव,
दगडू विरकर , पूनम गुंड यांनी केली आहे.