वन नेटवर्क एंटरप्रायझेसच्या वतीने संगणक सख्य प्रकल्पाचा शुभारंभ

गणेश सातव,वाघोली

सामाजिक कार्यात सातत्याने भरीव योगदान देणाऱ्या ‘वन नेटवर्क एंटरप्रायझेस’ या पुणे स्थित सॉफ्टवेअर कंपनीच्यावतीने पुणे महानगरपालिका माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी संगणक सख्य या प्रकल्पाचा शुभारंभ सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय,भवानी पेठ येथे शुभारंभ करण्यात आला असून आधार सामाजिक संस्था पुणे या संस्थेस प्रकल्प अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या प्रकल्पाअंतर्गत मनपाच्या माध्यमिक शाळांना प्रत्येकी पाच संगणक,पाच संगणक टेबल व खुर्च्या तसेच एक प्रिंटर व स्कॅनर या साहित्यासह सुसज्ज संगणक कक्षाद्वारे विद्यार्थ्यांना संगणक व इंटरनेट वापरासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रसंगी बोलतांना वन नेटवर्क एन्टरप्रायझेसचे संचालक मा. श्री. समीर कुलकर्णी म्हणाले की, “वन नेटवर्क एन्टरप्रायझेस” ही कंपनी सॉफ्टवेअर क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कार्यासाठी ओळखली जाते सोबतच एक सामाजिक जबाबदारी म्हणून वंचित व गरजू घटकांसाठी योगदान देत आहे. मनपा शिक्षण मंडळातर्फे आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांमार्फत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत दिले जाते ही पुणे शहरासाठी अभिमानाची बाब आहे. मनपा शिक्षण मंडळाच्या या कार्यात सहभाग म्हणून वन नेटवर्क एंटरप्रायझेसच्या वतीने माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांमध्ये संगणक व इंटरनेट कौशल्य विकसित करून येणाऱ्या स्पर्धात्मक काळासाठी त्यांची तयारी करून घेण्यात येणार आहे.संगणक शिक्षक बालसुलभ व अनौपचारिक पध्द्तीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.आधार सामाजिक संस्था ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेल व पुणे मनपा शिक्षण मंडळाचे आवश्यक ते सहकार्य लाभेल याची आम्हाला खात्री आहे.

या प्रसंगी मा.श्री. दामोदर उंडे, (उपशिक्षणाधिकारी,पुणे मनपा शिक्षण मंडळ माध्यमिक व तांत्रिक विभाग),गीतांजली पडळकर (वरिष्ठ व्यवस्थापक वन नेटवर्क एन्टरप्रायझेस) वैशाली गुडदे (प्रकल्प संचालिका आधार सामाजिक संस्था)अमोल शिंदे (अध्यक्ष आधार सामाजिक संस्था)राजेंद्र गाढवे (मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय) उपस्थित होते. प्रकल्पासाठी पोपट श्रीराम काळे (शिक्षणाधिकारी,पुणे मनपा शिक्षण मंडळ माध्यमिक व तांत्रिक विभाग) यांनी मार्गदर्शन केले.

Previous articleनिमगाव सोसायटीकडून १कोटी २८लाख कर्ज वाटप
Next articleमहाराष्ट्र दिनानिमित्त पी के जुनियर कॉलेजमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न