मंगला बनसोडेंचा पुत्र नितीन बनसोडेंने केला बैलगाड्याचा नाद ; बैलगाडा थेट तमाशाच्या व्यासपीठावर

नारायणगाव : किरण वाजगे

तमाशा पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नारायणगाव (ता. जुन्नर) येथील श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवाच्या यात्रेनिमित्त मंगला बनसोडे यांच्या तमाशा व्यासपीठावर सोमवार (दि.२ रोजी ) सादर केलेल्या गीतांमधून बैलगाड्या सह जल, वायू, अग्नी, आकाश व पृथ्वी या पंचतत्वाचा अनोखा संगम येथे पाहायला मिळाला.
नारायणगाव येथे यात्रेनिमित्त सलग सात ते आठ लोकनाट्य तमाशा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात. यामुळे तमाशा कार्यक्रम सादर करणारा प्रत्येक फडमालक नारायणगावात तमाशा करताना काहीतरी नावीन्यपूर्ण सादरीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो.

याच अनुषंगाने आघाडीचे फडमालक मंगला बनसोडे व नितीन करवडीकर यांनी थेट तमाशाच्या व्यासपीठावर बैलगाडा आणून त्याला दोन पायाचे बैल जुंपले. अर्थात दोन पायाचे बैल म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून बैलाचा मुखवटा परिधान करणारे दोन कलाकार बैलगाड्याला जुंपले होते.
हे दृश्य पाहताना अनेकांनी एकच जल्लोष करत “नाद एकच एकच बैलगाडा शर्यत” या गाण्यावर जोरदार ठेका धरला.

याचप्रमाणे “टिपटिप बरसा पानी” या गाण्या द्वारे जल, वायू, अग्नी, आकाश व पृथ्वी या पंचतत्वाचा अनोखा संगम तमाशाच्या व्यासपीठावर सोमवारी रात्री पहायला मिळाला.

तमाशा कार्यक्रमामध्ये ही अनोखी गीते नितिन बनसोडे यांच्यासह नृत्यांगना रमा शेवगावकर, कोमल शेवगावकर, रेश्मा पुणेकर व कामिनी मुंबईकर तसेच त्यांच्या सहकलाकारांनी सादर केली. तत्पूर्वी सुरुवातीला मंगला बनसोडे यांच्या नृत्य अदाकारीने देखील रसिक प्रेक्षक घायाळ झाले.

थेट व्यासपीठावर बैलगाडा घेऊन जाणाऱ्या व स्टेजवर पाण्याचा पाऊस पाडून व अग्नी प्रज्वलित करून एकाच ठेक्यात नृत्य सादर करणाऱ्या नितिन बनसोडे यांच्या अनोख्या स्टाइल ची चर्चा मात्र नारायणगावसह संपूर्ण पंचक्रोशीत होत आहे.

दरम्यान तमाशा कार्यक्रमामध्ये यात्रा कमिटीच्या वतीने मंगला बनसोडे व नितिन बनसोडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी दत्तोबा फुलसुंदर, विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे, अनिल खैरे, विजय विटे, संतोष शशीनाना खैरे, संभाजी पाटे, अक्षय वाव्हळ, राम शेवाळे, गणेश पाटे, हितेश कोराळे, स्वप्निल भोंडवे, आशिष वाजगे, श्री भुजबळ, श्री मेहत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंगला बनसोडे नितिन बनसोडे यांच्या तमाशा ला रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

Previous articleपॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी १०६ हुतात्म्यांना व कामगारांच्या कार्याला “तैल बैला”वर तिरंगा फडकावून केला सलाम
Next articleबिबट सफारी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रूपयांचा निधी मंजूर