बिबट सफारी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रूपयांचा निधी मंजूर

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारीचा प्रस्तावित प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत हा निधी प्राप्त झाला आहे. अशी माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिली.

दरम्यान जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा अनावरण कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार मागील महिन्यात आले होते व या दौऱ्यादरम्यान माणिकडोह येथील वन्यजीव हॉस्पिटल उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांनी बिबट सफारी प्रकल्पाच्या प्रकल्प अहवाल निर्मितीसाठी निधी देण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी आता झाली आहे. बिबट सफारी प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी वन अधिकारी, त्याचप्रमाणे पर्यटन तज्ञ व अभ्यासक यांच्या सहकार्याने अहवाल तयार करण्यात येईल त्यानंतर लवकरच हा परिपूर्ण अहवाल शासनाकडे सादर करण्यात येईल.

अजित पवार यांनी जुन्नर दौऱ्या दरम्यान दिलेला शब्द पाळला याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानत असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचेही आपण ऋणी असल्याचे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी म्हटले आहे

Previous articleमंगला बनसोडेंचा पुत्र नितीन बनसोडेंने केला बैलगाड्याचा नाद ; बैलगाडा थेट तमाशाच्या व्यासपीठावर
Next articleधामणी येथील साकव पुलासाठी १ कोटी रु. निधी मंजूर