निलेश सरवदे स्वरचित ‘पांथस्थ’ या कवितासंग्रहाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन


गणेश‌ सातव,वाघोली

नवोदित कवी निलेश सरवदे उर्फ निलेशकुमार स्वरचित व मैत्री पब्लिकेशन प्रकाशित ‘पांथस्थ’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच पुण्यात एस. एम.जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनच्या सभागृहात पार पडला.

या नवकवितांच्या संग्रहाचे प्रकाशन जेष्ठ कवी,लेखक डॉ. प्रदीप आवटे,अरिहंत एज्युकेशन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.भूषण पाटील,प्रकाशक मोहिनी कारंडे,निलेशकुमार यांचे आई-वडील यांच्या हस्ते व जेष्ठ साहित्यक,८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

प्रकाशन सोहळ्यानंतर डॉ. प्रदीप आवटे कवितासंग्रहाविषयी बोलत असताना म्हणाले, “प्रेम उमगणं महत्वाचं कारण द्वेष करायला फार अक्कल लागत नाही. ते पुढे म्हणाले, परिघावरील मंडळींचे प्रश्न आपल्याला या कवितेमध्ये दिसत राहतात. तुम्ही जे जगता त्या जगण्याला प्रश्न विचारण्यासाठी लिहता ते ही निलेशच्या कवितेत दिसतं. या कविता आई वडिलांच्या जगण्यातून आली आहे.”

डॉ. भूषण पाटील यांनी बोलताना शिक्षणाचं महत्व अधोरेखित करत कवितासंग्रहाला शुभेच्छा दिल्या.सोबतचं शिरुर कासार पंचायत समितीच्या सभापती उषाताई सरवदे यांनी कवी निलेशकुमार यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत,कवितासंग्रहाला शुभेच्छा दिल्या.

जेष्ठ साहित्यीक, विचारवंत व समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, निलेशकुमार अत्यंत सूचक, गांभीर्यपूर्ण आकलनाची सूत्र काव्यात्म करून आपल्या समोर मांडत आहे. वैचारिक दृष्टीने, कल्पनेच्या दृष्टीने, प्रतिमेच्या दृष्टीने सामर्थ्याच्या दृष्टीने या अत्यंत महत्वाच्या कविता आहेत. आंबेडकरवादी, दलित कवितेचे व्रत, परंपरा जी आहे ती संघर्षाची आहे. सबंध आंबेडकरी प्रेरणेतून आलेली दलित कविता बाजूला सारून निलेशकुमार हा संवादाच्या भूमिकेतून कविता लिहतो हे त्याच वेगळेपणं आहे. देशातल्या जगातल्या कोटी कोटी सर्वहारा वर्गाच्या कष्टकऱ्यांच्या वेदनेची कविता आहे. निलेशकुमारची कविता प्रश्न निर्माण करते. सर्व विचारवंत, प्रतिभावंत ज्या जागेवर हात टेकतात त्या जागेवरची ही कविता आहे.
निलेशकुमार हा विद्रोही कवी जरूर आहे पण तो विवेकीविद्रोही कवी आहे. ते पुढे म्हणाले, निलेशकुमारच्या कविता या माणसाच्या आनंदासाठीच्या कविता आहेत. माणसाच्या दुःख मुक्तीचा ध्येयवाद अधोरेखित करणाऱ्या कविता आहेत. संवादावर विश्वास असणारा हा कवी आहे. तुम्ही जर समता आमलात आणू शकत नसाल तर विद्यापीठातील विद्वान काय करताय? असा प्रश्न श्रीपाल सबनीस यांनी निलेशकुमार यांच्या विद्यापीठ या कवितेचा संदर्भ देत असताना केला आहे. पुढे ते बोलताना म्हणाले, “माझ्या प्रस्तावनेला आणि लेखणीला ही जात नाही.

सूत्रसंचालन निवेदक आरती गाढवे यांनी केलं. सदर काव्य संग्रहातील कवितेचे विवेक वंजारी व अमर मालन मारुती यांनी काव्यवाचन केलं, टीम तरुणाईचे अभिषेक आकोटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि कार्यक्रमाचा शेवट अक्षय चव्हाण यांनी गायलेल्या वामन दादा कर्डक यांच्या व शंतनू कांबळे यांच्या ‘समतेच्या वाटेनं’ या गीताने झाला. यावेळी अर्थतज्ञ अजित अभ्यंकर, किसान सभेचे डॉ.अमोल वाघमारे, अभ्यासक प्रवीण निकम,प्रज्ञेश मोळक, कवी प्रा. हनुमंत भवारी आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील मान्यवर व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleकुरकुंभ एमआयडीसीतील एमक्युअर कंपनीत १२ लाखांच्या केमिकलची चोरी
Next articleनिमगाव सोसायटीकडून १कोटी २८लाख कर्ज वाटप