Home Blog Page 371

महाराष्ट्र मास्टर्स गेम्स असोसिएशनच्या जॉईंट सेक्रेटरी धनंजय मदने

अमोल भोसले,उरुळी कांचन

मास्टर्स गेम्स असोसिएशनच्या राज्य कार्यकारणीची मीटिंग नुकतीच संपन्न झाली. ह्या मीटिंगमध्ये काही पदाधिकाऱ्यांना पद वाटप करण्यात आली. असोसिएशनचे सचिव बाळू चव्हाण व डाॅ.मदन कोठुळे यांच्या उपस्थितीत मिटिंग संपन्न झाली. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांची मास्टर्स गेम्स असोसिएशन महाराष्ट्रचे जॉईंट सेक्रेटरी या पदावर निवड करण्यात आली.

चिंचबाईवाडी येथील अतिक्रमण न काढल्याने शेतकऱ्याने दिला आत्महत्या करण्याचा इशारा

प्रशासनाच्या कागदी घोड्यांना कंटाळून मच्छिंद्र गार्डी यांनी घेतले टोकाचे पाऊल

 राजगुरुनगर-नैसर्गिक ओढा व शेतात झालेल्या अतिक्रमण मोकळे करून देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे गेले अनेक दिवस पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने शेतकऱ्याने पाण्यात स्वतःला बुडवून जीवनाचा अंत करीत आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

 

चिंचबाईवाडी (ता.खेड) येथील शेतकरी मच्छिंद्र भाऊ गार्डी यांनी अतिक्रमण काढले नाही तर आत्महत्या करण्याचे निवेदन प्रांत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी खेड यांना देण्यात आले आहे. तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दि. १२ जून २०२० रोजी त्याठिकाणाचे मंडलाधिकारी यांना अतिक्रमण काढण्याबाबत आदेश दिले असताना देखील तेथील  अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्याला शेतात अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या  दिरंगाईच्या धोरणाला कंटाळून मच्छिंद्र गार्डी यांनी मानसिक ताण घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे.

यापूर्वीही खेड तालुक्यात अशी दुर्घटना झालेली आहे संबधित शेतकऱ्याचे अतिक्रमण हटवले नसल्याने औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना प्रशासन चालढकल करत आहे.

या घटनेची माहिती तालुक्यात पसरताच नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे..प्रशासनाच्या कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार व प्रशासनाचा चालढकलपणा यामुळे मच्छिंद्र गार्डी हे शेतकरी टोकाचे पाऊल घेत आहेत

नगरसेवक प्रकाश कुर्‍हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीत रक्तदान शिबीर

दिनेश कुऱ्हाडे,आळंदी- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अलीकडेच रक्त पुरवठा कमी होत असल्याची शंका व्यक्त केली होती. तसेच रक्तदान शिबीरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक प्रकाश कुर्‍हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन डॉ नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक डि.डि.भोसले, माजी नगरसेविका मालती कुऱ्हाडे,रमेश गव्हाणे,मनोज कुऱ्हाडे,रोहन कुऱ्हाडे,तेजस कुऱ्हाडे,प्रशांत घुंडरे,प्रसाद बोराटे उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना सोबतच गरजूंना रक्ताची आवश्यकता भासू शकते.त्यामुळे मानवधर्म व सेवेचे व्रत म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असे नगरसेवक नगरसेवक प्रकाश कुर्‍हाडे यांनी सांगितले.या शिबिरात १०१ रक्तदात्यानी रक्तदान केले तसेच मथुराबाई वसिष्ठ बल्ड बँक केईएम हॉस्पीटल पुणे यांनी रक्त संकलित केले.

बेल्ह्यात ८ गुंठ्यातील कांदारोप लंपास:बटाटा, कांदा चोरीनंतर शेतकऱ्यांपुढे नवे संकट

नारायणगाव(किरण वाजगे)

सध्या कांद्याला सोन्यासारखा भाव आला आहे. त्यामुळे चोरट्यांनी कांदा बटाट्या बरोबरच आपला मोर्चा कांद्यासह कांद्याच्या रोपांवर वळवला आहे.
जुन्नर तालुक्यातील बेल्हा येथील दत्तनगर शिवारातील एका शेतकऱ्याच्या ८ गुंठे क्षेत्रातील कांदा रोपे चोरीला गेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
या हंगामात अतिवृष्टीमुळे सर्वत्रच शेतकऱ्यांची कांदा लागवड उशिरा झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे कांदा बी पावसात वाहून गेले. तर काहींची कांदारोपे सडून गेली. त्यामुळे कांदा लागवड म्हणावी अशी झाली नाही. परिणामी बाजारात कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आता कांद्याचे बाजारभाव गगनाला भिडू लागले आहेत. दरम्यान ज्यांनी कशीबशी कांदा रोपे जगवली आणि कांदा लागवड केली त्यांना आता नवी समस्या भेडसावू लागली आहे. ती म्हणजे कांदा आणि रोपांची चोरी. चोरट्यांनी कांदा, बटाटा चोरीनंतर आता आपला मोर्चा कांदा रोपांवर वळविला आहे.

बेल्हा येथील दत्तनगर शिवारातील देविदास पिंगट यांनी त्यांच्या शेतातील ८ गुंठे क्षेत्रात महागडे कांदा बीयाणे विकत घेऊन ते टाकले. मोठ्या कष्टाने त्यांनी या क्षेत्राची काळजी घेतली. त्यानंतर कांदा बीयाणे चांगल्याप्रकारे उगवले आणि त्याची लागवडी योग्य रोपे तयार झाली. लवकरच ते या रोपांची शेतात लागवड करणार होते. मात्र चोरट्यांनी रात्रीच्या वेळी सर्व कांदा रोपे उपटून नेली.

एवढे कांदा रोप चोरीला गेल्याने देविदास हे हवालदिल झाले असून. जवळपास ८ ते १० हजार रुपये किमतीचे हे कांदा रोप चोरीला गेले खरे. पण यातून मिळणारे कांद्याचे उत्पन्नही गेल्याने त्यांचे कुटुंबही आर्थिक संकटात सापडले आहे. शेतातून कांदा रोपे चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण वाढले आहे. पोलिसांनी तातडीने या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकरी संदीप वायाळ, नितीन भोर व योगेश तोडकरी यांनी केली आहे.

शरद पवार वाढदिवसानिमित्त द्वारका वृध्दाश्रमात खाऊ व साहित्य वाटप

राजगुरुनगर-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष,देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राजगुरुनगर पूर-कनेरसर येथील द्वारका वृध्दाश्रमास भेट देऊन खाऊ व साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मलाताई पानसरे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष कांचनताई ढमाले, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष कैलासराव सांडभोर, शहर अध्यक्ष सुभाष होले, युवती अध्यक्षा वरुडे गावच्या उपसरपंच सौ.आशाताई तांबे,महिला अध्यक्षा संध्याताई जाधव, शहर अध्यक्ष मनीषा सांडभोर, सरचिटणीस मनीषा टाकळकर,पश्चिम अध्यक्ष सुजाताताई पचपिंड,बेबीताई कड,मंगलताई जाधव,तसेच तुकाराम गोपाळा गावडे, कुलस्वामिनी दुध संकलन केंद्राचे मालक विट्ठलशेठ गावडे, ग्रा.सदस्य अशोक शेठ गावडे, मुख्याध्यापक केरुजी गावडे, गुलाब वाघा गावडे सह पुर-कनेरसर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.द्वारका वृद्धाश्रमाच्या संस्थापिका अध्यक्ष कल्याणीताई पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

भोर-वेल्हे तालुक्याचे माजी आमदार संपतराव जेधे यांचे निधन

अमोल भोसले पुणे

भोर-वेल्हे तालुक्याचे माजी आमदार श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे उपाध्यक्ष तथा आंबवडे गावचे सुपुत्र आंबवडे गावच्या सरपंच पदापासून ते तालुक्यातील सर्वच प्रमुख पदांवर आरूढ होत आमदारपदी विराजमान झालेले एकमेव व्यक्तिमत्त्व संपतराव जेधे यांचे आज दि.१५ डिसेंबर २०२० रोजी पहाटे ५.४५ च्या दरम्यान अल्पशा आजाराने तथा वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

माजी आमदार संपतराव जेधे यांच्या अकस्मात निधनाने “भोरचे लोकनायक काळाच्या पडद्याआड” गेल्याची भावना पुणे जिल्ह्यातील ,सर्वच क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी ,अधिकाऱ्यांनी व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात वृक्षारोपण

अमोल भोसले,उरुळी कांचन

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.के.डी.कांचन यांचे हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात महात्मा गांधी सर्वोदय संघाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त ८० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. आर. के. आडसूळ, अविनाश बोरकर, महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.विजय कानकाटे, प्रा. एन. बी. कांचन, पी. टी. राजपूत, बापू जगताप तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षेकेतर सेवक व विद्यार्थी यांचे वृक्षारोपनसाठी सहकार्य लाभले.

घोडेगाव ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्याची मागणी

सिताराम काळे घोडेगाव

घोडेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन घोडेगाव नगर पंचायत स्थापन करावी, यासाठी घोडेगाव मधील शिष्टमंडळाने दि. १४ रोजी मुंबई मंत्रालय येथे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन घोडेगाव ग्रामपंचायतीचे घोडेगाव नगर पंचायतीत रूपांतर करावे अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे केली.

घोडेगाव ग्रामपंचायत ही आंबेगाव तालुका मुख्यालयामध्ये असणारी ग्रामपंचायत आहे. १ मार्च २०१४ रोजी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायत मध्ये करण्याची उद्दघोषणा नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत करण्यात आली होती परंतु अजुनही ग्रामपंचायत घोडेगावचे रूपांतर नगर पंचायत मध्ये झालेले नाही. घोडेगाव ग्रामपंचायत ही तालुका पातळीवरील ग्रामंपचायत असुन ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे विस हजार पेक्षा जास्त आहे. ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना आवश्यक त्या मुलभूत सुविधा पुरविताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. तसेच नागरी वसाहतीत वाढ झाल्यामुळे घन कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होत आहे.

घोडेगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतमध्ये व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांची देखिल आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी मासिक सभा व ग्रामसभा ठराव देखिल मंजुर केले आहे. त्यामुळे घोडेगाव ग्रामपंचायतीचे नगर पंचायत मध्ये रूपांतर व्हावे, अशी मागणी घोडेगाव मधील शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

या शिष्टमंडळामध्ये माजी पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे, सखाराम घोडेकर, भिमाशंकर कारखाना संचालक अक्षय काळे, समता परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश घोडेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर घोडेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक वैभव काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे घोडेगाव शहर अध्यक्ष किरण घोडेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख गोविंद काळे, मिलींद काळे, शिवाजी घोडेकर, सुनिल इंदोरे, स्वप्नील घोडेकर, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बो-हाडे, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

मंदिरासमोर एकमेकांना अंडी मारून वाढदिवस साजरा  करणाऱ्या सहा जणांवर नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे)

सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर व मंदिरासमोर एकमेकांवर अंडी मारून बेकायदेशीररित्या वाढदिवस साजरा करणाऱ्या सहा जणांवर नारायणगाव (तालुका जुन्नर) येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की, रविवार दिनांक १३ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नारायणगावचे ग्रामदैवत मुक्ताई मंदिरासमोर काही युवकांनी भर रस्त्यावरच वाढदिवस साजरा केला. नारायणगाव येथील मुस्लिम मोहल्ला परिसरात राहणाऱ्या सकलेन नासिर आतार याचा वाढदिवस साजरा करत असताना काही युवकांनी बेकायदेशीर पणे एकत्र येऊन सकलेन आतार याच्यावर अंडी फेकून मारत बीभत्स वर्तणूक केली. याशिवाय या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण करून काही युवकांनी आपल्या स्टेटसवर व सोशल मीडियावर अंडी मारत असलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल केला.

अशाप्रकारे विचित्र पद्धतीने वाढदिवस साजरा करणाऱ्या घटनेचा निषेध करत या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण नारायणगाव येथील बजरंग दलाचे कृष्णा माने तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नारायणगाव पोलिसांनी मुस्लिम मोहल्ला येथील सहा जणांवर गुन्हा दाखल केला.

सोशल डिस्टंसिंग चे पालन न करता सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाढदिवस साजरा केल्यामुळे आरोपी सकलेन नासिर आतार, साकिर आमीन जमादार, आरमान खालीद शेख, मोईन एकलाक आतार, मोसीन फिरोज ईनामदार, जाहीद पिर महम्मद पटेल (सर्व राहणार मुस्लिम मोहल्ला, नारायणगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करून नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नारायणगाव पोलीस स्थानकात भा.द.वि. कलम १८८,२६९, २७० आ. व्य. २००५ चे कलम ५१ (२), कोवीड – १९ उपाय योजना २०२० कलम २,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन कैलास कोबल यांनी दिली. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार टाव्हरे करीत आहे.

विकासाचा राजमार्ग हे पुस्तक तरूणासांठी प्रेरणादायी-देवेंद्र फडणवीस

राजगुरुनगर- कनेरसर (ता.खेड) येथील लेखक अशोक टाव्हरे यांनी लिहिलेल्या विकासाचा राजमार्ग या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाच्या दुसरी आवृत्तीचे प्रकाशन मुंबई येथे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी फडणवीस यांनी गडकरी यांचे असामान्य कर्तुत्व असलेले कार्य शब्दरूपात मांडून समाजापुढे आणून लेखक व प्रकाशकाने मोलाचे कार्य केले आहे असे मत व्यक्त करून राजकारणात नव्याने येत असलेल्या तरूणासांठी हे पुस्तक प्रेरणादायी असल्याचे नमुद केले.
अशोक टाव्हरे यांना पुस्तकासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परवानगी दिली होती. विकासाचा राजमार्ग या पुस्तकात १९७६ साली अभाविपचे पदाधिकारी ते केंद्रीय मंत्री हा प्रवास उलगडला आहे. कार्यकर्ता ते राष्ट्रीय अध्यक्ष भाजपा.महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, सार्वजनिक बांधकाम मंत्री ,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रीय रस्ते विकास समितीचे अध्यक्ष, नागपुरचे खासदार, केंद्रीय मंत्री म्हणून भुपृष्ठवाहतुक, जलमार्ग, नदी विकास, गंगा पुनरुत्थान या खात्याची कामगिरी तसेच आता रस्ते विकासाबरोबरच लघु,सुक्ष्म, मध्यम उद्योग (MSME)या खात्यांसाठी गडकरी देत असलेले योगदान याचा अंतर्भाव लेखक अशोक टाव्हरे यांनी केला आहे.

पुस्तक प्रकाशनप्रसंगी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे,माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार, राज पुरोहित, राजुशेठ खंडीझोड, राजेंद्र शिंदे, रामदास दौंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वांनी विकासाचा राजमार्ग या पुस्तकाचे कौतुक केले.विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही गडकरींचे अद्भुत कार्य समाजापुढे आणल्याबद्दल प्रशंसा केली. निलेश म्हसाये, दुर्गा प्रकाशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.