बेल्ह्यात ८ गुंठ्यातील कांदारोप लंपास:बटाटा, कांदा चोरीनंतर शेतकऱ्यांपुढे नवे संकट

Ad 1

नारायणगाव(किरण वाजगे)

सध्या कांद्याला सोन्यासारखा भाव आला आहे. त्यामुळे चोरट्यांनी कांदा बटाट्या बरोबरच आपला मोर्चा कांद्यासह कांद्याच्या रोपांवर वळवला आहे.
जुन्नर तालुक्यातील बेल्हा येथील दत्तनगर शिवारातील एका शेतकऱ्याच्या ८ गुंठे क्षेत्रातील कांदा रोपे चोरीला गेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
या हंगामात अतिवृष्टीमुळे सर्वत्रच शेतकऱ्यांची कांदा लागवड उशिरा झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे कांदा बी पावसात वाहून गेले. तर काहींची कांदारोपे सडून गेली. त्यामुळे कांदा लागवड म्हणावी अशी झाली नाही. परिणामी बाजारात कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आता कांद्याचे बाजारभाव गगनाला भिडू लागले आहेत. दरम्यान ज्यांनी कशीबशी कांदा रोपे जगवली आणि कांदा लागवड केली त्यांना आता नवी समस्या भेडसावू लागली आहे. ती म्हणजे कांदा आणि रोपांची चोरी. चोरट्यांनी कांदा, बटाटा चोरीनंतर आता आपला मोर्चा कांदा रोपांवर वळविला आहे.

बेल्हा येथील दत्तनगर शिवारातील देविदास पिंगट यांनी त्यांच्या शेतातील ८ गुंठे क्षेत्रात महागडे कांदा बीयाणे विकत घेऊन ते टाकले. मोठ्या कष्टाने त्यांनी या क्षेत्राची काळजी घेतली. त्यानंतर कांदा बीयाणे चांगल्याप्रकारे उगवले आणि त्याची लागवडी योग्य रोपे तयार झाली. लवकरच ते या रोपांची शेतात लागवड करणार होते. मात्र चोरट्यांनी रात्रीच्या वेळी सर्व कांदा रोपे उपटून नेली.

एवढे कांदा रोप चोरीला गेल्याने देविदास हे हवालदिल झाले असून. जवळपास ८ ते १० हजार रुपये किमतीचे हे कांदा रोप चोरीला गेले खरे. पण यातून मिळणारे कांद्याचे उत्पन्नही गेल्याने त्यांचे कुटुंबही आर्थिक संकटात सापडले आहे. शेतातून कांदा रोपे चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण वाढले आहे. पोलिसांनी तातडीने या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकरी संदीप वायाळ, नितीन भोर व योगेश तोडकरी यांनी केली आहे.