Home Blog Page 365

सर्वोच्च न्यायालयाचा नविन कृषी कायद्याला स्थगिती देण्याचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा -जयंत पाटील

अमोल भोसले,पुणे

नवीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच देशातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

अनेक दिवस ऊन, वारा, थंडी, पावसाची कसलीही तमा न बाळगता केंद्रसरकारच्या दारात शेतकरी आंदोलनासाठी बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलकांना दाद दिली नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शेतकऱ्यांवर अशी वेळ कधीही आली नव्हती, असेही जयंत पाटील म्हणाले.

जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत दिल्लीत आंदोलनासाठी बसलेला शेतकरी मागे हटणार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्यादृष्टीने जो कायदा स्थगिती योग्य आहे. तो कायदा रद्द करण्याची भूमिका केंद्र सरकारने लवकरात लवकर घ्यावी असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी अहंभाव सोडण्याची वेळ आली असून ते लवकरच तो सोडतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

धक्कादायक-राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची महिलेने धरली कॉलर

इंदापूर – राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदापूरमध्ये संभाजी चव्हाण यांच्याविरुद्ध प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे 394 अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संभाजी चव्हाणने प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगेवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला.

याबाबत काल प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे कुटुंबातील लोक दत्तात्रय भरणे यांच्या घराबाहेर उपोषणाला बसले होते. प्रफुल्ल चव्हाण हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. प्रफुल्ल चव्हाण हा दत्तात्रय भरणे यांचा निकटवर्तीय आहे.

 

प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी पाच लाख रुपये खंडणी मागितली होती. ती न दिल्याने गुन्हा दाखल केल्याचा आरोप प्रफुल्लची आई शोभा चव्हाण यांनी केला आहे. शोभा चव्हाण या रेडणी गावच्या माजी सरपंच आहेत.

पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या निलंबनाची कारवाई व्हावी. यासाठी प्रफुल्लची आई शोभा चव्हाण या दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर उपोषणाला बसल्या होत्या. त्यावेळी यांनी थेट दत्तात्रय भरणे यांची कॉलर पकडली. यानंतर त्यांनी जाब मागितल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे उपोषण काल दुपारीच मागे घेतले होते. या प्रकरणानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. भरणे हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. सध्या ते राज्याचे राज्यमंत्री आहेत.

निवडणुकीत अनुचित प्रकार घडल्यास होणार कडक कारवाई -प्रताप माणकर

 अमोल भोसले

बकोरी – ग्रामपंचायत निवडणुकीत पार्श्वभूमीवर लोणिकंद पोलिस स्टेशनच्या माध्यमातून गावा गावात शांतता कमिटीच्या बैठका चालू आहेत .नुकतीच बकोरी येथे बैठक पार पडली त्याठिकाणी लोणिकंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप माणकर यांनी मार्गदर्शन केले .निवडणुक काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा प्रताप माणकर यांनी दिला. व निवडणुक शांततेत पार पाडण्याचे आव्हान केले.

या बैठकीला पोलिस निरीक्षक प्रताप माणकर ,माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे,पोलीस हवालदार बाळासाहेब गाडेकर ,ग्रामसेवक गव्हाणे ,पोलिस पाटील सीमा वारघडे व सर्व उमेदवार ,ग्रामस्थ उपस्थित होते.

तरुणांनी आपल्या देशाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा – जयंत पाटील

अमोल भोसले पुणे

कल्पना शक्ती आजच्या तरुणांमध्ये आहे. अनेक तरुणांमध्ये व्यवसायाची चांगली स्कील आहे… काम करण्याची चिकाटी आहे… अनेक तरुण कलेच्या क्षेत्रात चांगली कामगिरी बजावत आहे… तरुणांनी या सगळ्या गोष्टींचा अचूक वापर करून आपल्या देशाला आपल्या अर्थक्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज फेसबुक लाईव्ह करत राज्यातील युवकांशी संवाद साधला.

भारतीय तरुणांनी संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवावं. तर आणि तरच स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना ती खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात जयंत पाटील यांनी तरुणांना प्रेरीत करण्याचा प्रयत्न केला.

स्वामी विवेकानंद हे नेहमीच काळाच्या खूप पुढे राहिले आहेत. आपल्यासमोरच्या आजच्या आणि उद्याच्या प्रश्नांची मांडणी करून त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे आपल्या उपदेशांच्या माध्यमातून सांगितली आहेत. आपल्या भाषणाच्या माध्यमातून, परखड लेखणीच्या माध्यमातून विवेकानंदांनी रूढी, अंधश्रद्धा, धर्मातील अनाचार यांच्याविरुद्ध नेहमीच लढाई पुकारली होती.

स्वामी विवेकानंद यांनी नेहमीच विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून उपदेश दिले. देशाच्या युवा कसा असावा याची संक्षिप्त मांडणीच त्यांनी केली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात भारतीय तरुणांना सदैव पुढे रहावं अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणूनच स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते असेही जयंत पाटील म्हणाले.

भारत हा एक युवा देश आहे. भारताच्या लोकसंख्येत युवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जगाला भारतीय युवकांकडून मोठी अपेक्षा आहे. राजकारणात काम करणाऱ्या युवकांना मी सांगू इच्छितो की आपण पवार साहेबांचा आदर्श घ्यावा. आपल्या राजकीय कारकीर्देत त्यांनी युवक काँग्रेसमध्ये असताना एक वेगळाच ठसा उमटवला. ते ज्यावेळी युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी दादरच्या टिळक भवनातच आपले बस्तान मांडले. टिळक भवनाच्या एका खोलीत राहूनच ते लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करत व आपला जनसंपर्क वाढवत. आपल्या कामाविषयी त्यांना फार आपुलकी होती व चिकाटी होती याची आठवण करून दिली.

तरुण वयात शरद पवार यांनी अनेक पदे भूषविली म्हणून शरद पवार यांचा तरुणांवर जास्त विश्वास आहे. म्हणूनच की काय कोणताही अनुभव नसताना पवार अतिशय कमी वयात आमच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या जबाबदाऱ्या पेलवल्याही
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला मोठी अपेक्षा आहे. त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांचे विचार तळागाळात रुजवण्यासाठी काम करावे. समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडावे, सरकार दरबारी प्रयत्न करावेत असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

यावेळी युवा दिनानिमित्त भावी वाटचालीसाठी जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या !

आळंदीत पहिले शाहिरी व लोककला संमेलन संपन्न

दिनेश कुऱ्हाडे,आळंदी – शाहिरी असो वा कीर्तन ही भगवत प्राप्तीची साधने आहेत असे विचार हभप यशोधन महाराज साखरे यांनी पहिल्या शाहिरी व लोककला संमेलन उदघाटन प्रसंगी मांडले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे यांचे वतीने सो.क्ष.कासार धर्मशाळा आळंदी येथे दोन दिवसांचे पहिले ‘शाहिरी व लोककला संमेलन’ संपन्न झाले.

 

लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पहिल्यांदाच हे संमेलन घेण्यात आले.

यावेळी श्री संत कबीर मठाचे प्रमुख हभप चैतन्य महाराज कबीर,भाजपा आध्यात्मिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक हभप संजय घुंडरे पाटील,माजी नगरसेवक अशोक उमरगेकर,सो.क्ष.कासार धर्मशाळा आळंदी चे अध्यक्ष मोहन कोळपकर व प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे,प्रा.संगिता मावळे,अजित वडगावकर उपस्थित होते.

शाहिरी व लोककलांना उर्जितावस्था प्राप्त करून देऊन या कलांना जुने वैभव प्राप्त करून देण्यासाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी कार्यरत असून लोककलावंतांना व लोककलेला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी या विषयावर चिंतन, मनन व्हावे म्हणून शाहिरी व लोककला संमेलन घेण्यात आले असल्याची माहिती उदघाटन प्रसंगी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली.लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या दोन लोकोत्तर महापुरुषांचे कार्यकर्तृत्व शाहिरीच्या माध्यमातून समाजापुढे आणून समाजप्रबोधनाची वेगळी वाट चोखाळत असल्याचेही शाहीर हेमंतराजे मावळे यांनी सांगितले. संमेलनाच्या उदघाटन सत्रानंतर चंद्रशेखर कोष्टी यांनी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ हे एकपात्री सादरीकरण केले.त्यानंतर उपस्थित कलावंतांनी आपल्या कलांचे सादरीकरण केले.

उदघाटन प्रसंगी बालशाहीर सक्षम जाधव याने शाहिरी गण व बालशाहीरा निर्झरा उगले हिने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित महाराष्ट्राची परंपरा हा पोवाडा सादर केला.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात हभप अभय महाराज नलगे यांनी वारकरी कीर्तन केले.संध्याकाळच्या सत्रात पुण्यातील प्रख्यात तबलावादक संजय करंदीकर यांनी ‘महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीतील तालवाद्ये’ या विषयावर सप्रयोग व्याख्यान दिले.यावेळी होनराज मावळे,स्वानंद करंदीकर,मुकुंद कोंडे यांनी तालवाद्यांचे सादरीकरण केले. समारोप प्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अरुणकुमार बाभुळगावकर, सुरेश तरलगट्टी, समीर गोरे, शिवम उभे, प्रसाद जाधव, ओंकार चिकणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

संग्राम घोडेकर यांच्या मुख्य मारेकऱ्यांना अवघ्या तीन दिवसात अटक

नारायणगाव पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी

नारायणगाव :- (किरण वाजगे)

नारायणगाव येथील कोल्हे मळा चौकात संग्राम घोडेकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील हल्लेखोर व सुपारी घेणा-रा कुविख्यात गुंड गणेश रामचंद्र नाणेकर यांस नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

या घटनेतील मुख्य आरोपी चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे हा पोलिसांच्या ताब्यात असून ह्या प्रकरणात सुपारी घेणारा गणेश नाणेकर (रा .नाणेकर वाडी, चाकण), अजय उर्फ सोन्या राठोड ( वय २३,रा १४ नंबर ) तसेच खबऱ्या संदीप बाळशीराम पवार (वय २०,रा पिंपळवंडी ता जुन्नर) व दोन अल्पवयीन हल्लेखोर यांस पोलिसांनी चाकण येथून ताब्यात घेतले असून दुसरा सूत्रधार प्रशांत माने हा फरार आहेेेे.

सांनी दिलेल्या माहितीनुसार ७ जानेवारी रोजी संग्राम घोडेकर याच्यावर हल्ला करून फरार झालेले दोन अल्पवयीन गुन्हेगार व अजय उर्फ सोन्या राठोड हे अलिबाग या ठिकाणी वास्तव्यास होते.

 घटनेतील दुसरा सूत्रधार प्रशांत माने व सुपारी किंग गणेश नाणेकर या दोघांची पूर्वीची मैत्री होती त्यांनी शेखर कोऱ्हाळे यांच्याबरोबर डिसेंबर २०२० मध्ये या हल्ल्याबाबत चा प्लँन केला होता. या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा वापर केल्यावर जामीन लवकर होऊन मुलांना सोडवता येईल म्हणून त्यांनी त्या घटनेत अल्पवयीन मुलांचा वापर करायचा ठरवला त्यानुसार  गणेश नाणेकर याने सुपारी घेऊन ही जबाबदारी सोन्या राठोडवर सोपवली गणेश नाणेकर यावर विविध पोलीस ठाण्यात शरीराला अपाय करण्याबाबतचे व इतर गंभीर गुन्हे तर  हल्लेखोर अजय उर्फ सोन्या राठोड याच्यावर चोरी,अपहरण करून खून करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ७ जानेवारी रोजी हल्ला करण्यापूर्वी या गुन्ह्यातील संदीप पवार हा संग्राम घोडेकर यांच्यावर पाळत ठेवून होता. त्यानुसार पवार यांनी अजय उर्फ सोन्या राठोडला संग्राम घोडेकर यांच्या हालचाली ची माहिती देऊन सोन्या राठोड याने दोन अल्पवयीन मुलांना बरोबर घेऊन संग्राम घोडेकर यांच्यावर कोल्हे मळा येथे कोयत्याने  हल्ला केला.

या हल्ल्यानंतर नारायणगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नारायणगाव पोलिसांनी या घटनेनंतर मुख्य सूत्रधार चंद्रशेखर को-हाळे यास अवघ्या सहा तासाच्या आत ताब्यात घेतले व पुढील गुन्हेगार लवकरच शोधून काढून असा शब्द सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी ग्रामस्थांना दिला होता. त्यानुसार तीन दिवसाच्या आत यातील हल्लेखोर व सुपारी घेणाऱ्यास नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याने नारायणगाव ग्रामस्थांमधून या अधिकाऱ्याचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

ही  कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पो उप निरीक्षक गुलाब हिंगे,पोलीस नाईक दिनेश साबळे,पालवे,पोलीस शिपाई सचिन कोबल,शैलेश वाघमारे,शाम जायभाय,संतोष साळुंखे,योगेश गारगोटे यांच्या पथकाने केली.

हुक्का पार्लर आणि पब चालकांचा पोलीसांना चकवा कि ‘पबला’ पोलीसांचा वरदहस्त?

लोणी काळभोर (सुचिता भोसले) :

हुक्का पार्लरवर बंदी असताना लोणी काळभोर येथील क्लब जे2के नावाच्या हॉटेलमध्ये सर्रासपणे हुक्का घेतला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात लहान मुला-मुलींच्या जीवाशी खेळ होत असल्याचे देखील समोर आले आहे.

दरम्यान याबाबत नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता पोलीसांचे पथक पोलीस ठाण्यातून कारवाईला निघत असतानाच त्याची माहिती ही पब चालकाला मिळते आाणि तात्पुरत्या स्वरूपात तो पब बंद केला जातो. आणि पोलीस गेले की परिस्थिती ‘जैसे थे’होते.

पबला’ पोलीसांचा वरदहस्त ?

कारवाईसाठी पोलीस हे ठाण्यातून निघाले ही गोष्ट पब चालकाला कळतेच कशी? असा प्रश्‍न उपस्थित होतोय. चिरीमीरी घेऊन पोलीस याकडे दुर्लक्ष का हेही विरिष्ठांनी तपासणे गरजेचे आहे. पबमध्ये प्रवेश करताना ठराविक वय पाहून आतमध्ये प्रवेश दिला जातो. पण या पबमध्ये त्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या पबमध्ये काही फॅमिली सुध्दा येत असल्याचे समोर आले आहे. पोलीस येताच पब बंद होतो आणि पोलीस गेले की पब चालू कसा होतो हे तपासणे गरजेचे आहे. जर त्यात पोलीसांचा सहभाग असेल तर त्यांच्या निलंबनाची कारवाई ही नक्कीच व्हायला हवी.

चासमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जंयतीनिमीत्त रक्तदान शिबिर संपन्न

राजगुरूनगर-शहरा व ग्रामीण भागातील विविध रूग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे याच अनुषंगाने

रक्तदान हेच जीवनदान’,
“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान”म्हणत

राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या ४२३ व्या जंयतीनिमीत्त चास ( ता.खेड)येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आम्ही कट्टर शिवभक्त महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तर संयोजन मैत्री संघटन आणि जिगरियार मित्र परिवार याच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर शिवव्याख्याते शुभम कड आणि तनिष्का सोनार ,पल्लवी बुट्टे यांची राजमाता जिजाऊं जंयती निमीत्त व्याख्याने झाली त्यांनतर रक्तदान शिबिर कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमाला ८१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहभाग नोंदविला.यावेळी साक्षी पावडे यांनी सुत्रसंचालन केले.या कार्यक्रमाला जि.प.सदस्य तनुजाताई घनवट ,पोलीस पाटील उषा घनवट ,सरपंच बाळु बुट्टे ,

महेश सुर्वसे आदी उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यातील कातकरी समाज व किसान सभेचे २६ जानेवारी रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा

 सिताराम काळे घोडेगाव
– आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जुने आंबेगाव येथे शिल्लक असलेल्या जमिनीवर आदिम जमाती कातकरी २६ कुटुंबीयांना शासनामार्फत घरे बांधून दहा वर्षे होऊनही अदयाप या घरांच्या नोंदी ग्रामपंचायत दप्तरी झालेल्या नाहीत. यामुळे येथील कातकरी समाज संतप्त आहे. त्यांचा हा प्रश्न २६ जानेवारी पर्यंत न सुटल्यास २६ जानेवारी पासुन राहत्या ठिकाणीच स्थानिक ग्रामस्थ व किसानसभेचे कार्यकर्ते बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा विभागीय आयुक्त व सचिव ग्रामविकास मंत्रालय मुंबई यांना लेखी निवेदनाव्दारे अखिल भारतीय किसान सभा पुणे यांच्या वतीने देण्यात आले आहे.

आंबेगाव तालुक्यात कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे धरणाचे काम पूर्ण होऊन ३५ वर्षे झाली. आंबेगाव हे गाव बुडित क्षेत्रात गेल्यामुळे आंबेगावचे पुनर्वसन तालुक्यालगत घोडेगाव, चास, कडेवाडी, चिंचोली आदि ठिकाणी झाले आहे. सन २०१० मध्ये बोरघर गावाजवळील उरलेल्या शिल्लक क्षेत्राच्या हद्दीमध्ये २६ कुटुंबासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने विशेष निधी खर्च करून घरकुले बांधुन दिली. परंतु येथील उर्वरित शिल्लक क्षेत्र कोणत्याच ग्रामपंचायतीला न जोडल्यामुळे घरकुलांची नोंद होऊ शकली नाही आणि कोणत्याही नागरी सुविधा त्यांना मिळाल्या नाही.

यासाठी ११ नोव्हेंबर २०१६ रोजी कातकरी समाज कुटुंबांतील १५६ लहानमोठया व्यक्तींनी डिंभे धरणामध्ये जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिल्यानंतर १५ नोव्हेंबर २०१६ रोजी तहसिलदार आंबेगाव व गटविकास अधिकारी यांनी जुने आंबेगावचे बुडीत क्षेत्र वगळून महसुली गाव बोरघर ग्रामपंचायतीस जोडणे बाबतचा प्रस्ताव तयार करून गटविकास अधिकारी जिल्हा परीषद पुणे यांचेकडे देतील. त्यानंतर बोरघर ग्रामपंचायती मध्ये समावेश करण्याचा आदेश प्राप्त झाल्यानंतर घरांच्या नोंदी केल्या जातील, असे लेखी आश्वासन दिल्याने कातकरी समाजाने जलसमाधी आंदोलन स्थगित केले. या सर्वांचा परिणाम म्हणून पंचायत समिती आंबेगाव यांनी परिपूर्ण प्रस्ताव पुणे जिल्हा परिषद यांना पाठवला व पुणे जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव मान्य करून आवश्यक त्या ठरावासह विभागीय आयुक्त पुणे यांना २७ नोव्हेंबर २०१७ रोजी सादर केला व विभागीय आयुक्त कार्यालयाने २० डिसेंबर २०१७ रोजी सदरील प्रस्ताव मान्यतेसाठी सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांना पाठवला होता. या नंतर मात्र या प्रस्तावावर आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर हा प्रश्न २६ जानेवारी पर्यंत तात्काळ सोडविण्यात यावा व बुडित आंबेगाव येथील शिल्लक क्षेत्र ग्रामपंचायत बोरघरला जोडण्यात यावे अन्यथा २६ जानेवारी पासुन बेमुदत उपोषन करणार असल्याचे किसानसभा आंबेगाव तालुका समिती अध्यक्ष कृष्णा वडेकर, उपाध्यक्ष राजु घोडे व सचिव अशोक पेकारी यांनी ग्रामविकास विभागाचे सचिव व विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.

ग्रामपंचायत उमेदवारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार

सिताराम काळे घोडेगाव

ग्रामपंचायत व कोविडच्या अनुषंगाने उमेदवारांना सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या प्रचार सभा घेता येणार नाहीत तसेच फ्लेक्स बोर्ड, प्रचार पत्रके देखिल लावता येणार नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले आहे.

आंबेगाव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत असून ७६ प्रभागातील १७१ जागांवर ३६५ उमेदवार उभे आहेत. यासाठी ९२ मतदान केंद्र तयार करण्यात आले असून यासाठी अंदाजे ६०० कर्मचारी नेमले आहेत. तसेच कडक अचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी दि.१० रोजी सर्व उमेदवारांची बैठक घेवून सर्व सुचना दिल्या जाणार आहेत.
फलेक्स बोर्ड खाजगी जागेंमध्ये जागा मालकाची संमती घेऊन व निवडणूक विभागाची परवानगी घेऊ न लावले जावेत. कोणत्याही प्रकारे ग्रामपंचायत कार्यालय, स्थानिक शाळेच्या इमारती, सार्वजनिक शौचालये, मंदिरे, मुख्य रस्त्यावरील चौक या ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावू नयेत. तसेच सभा घेण्यास परवानगी नाही, त्यामुळे कुठेही जास्त गर्दि न करता उमेदवारांनी प्रचार करावेत, कोविडसाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन रमा जोशी यांनी केले आहे.

घोडेगाव येथील तहसिल कार्यालयातून निवडणूकीच्या ठिकाणी मतदान केंद्रावर कर्मचारी पाठविणे, सामान वाटप दि.१३ रोजी केले जाणार आहे तर मत पेट्या जमा करणे व दि.१८ रोजी मतमोजणी देखिल घोडेगाव येथे तहसिल कार्यालयात होणार असल्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.