आंबेगाव तालुक्यातील कातकरी समाज व किसान सभेचे २६ जानेवारी रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा

 सिताराम काळे घोडेगाव
– आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जुने आंबेगाव येथे शिल्लक असलेल्या जमिनीवर आदिम जमाती कातकरी २६ कुटुंबीयांना शासनामार्फत घरे बांधून दहा वर्षे होऊनही अदयाप या घरांच्या नोंदी ग्रामपंचायत दप्तरी झालेल्या नाहीत. यामुळे येथील कातकरी समाज संतप्त आहे. त्यांचा हा प्रश्न २६ जानेवारी पर्यंत न सुटल्यास २६ जानेवारी पासुन राहत्या ठिकाणीच स्थानिक ग्रामस्थ व किसानसभेचे कार्यकर्ते बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा विभागीय आयुक्त व सचिव ग्रामविकास मंत्रालय मुंबई यांना लेखी निवेदनाव्दारे अखिल भारतीय किसान सभा पुणे यांच्या वतीने देण्यात आले आहे.

आंबेगाव तालुक्यात कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे धरणाचे काम पूर्ण होऊन ३५ वर्षे झाली. आंबेगाव हे गाव बुडित क्षेत्रात गेल्यामुळे आंबेगावचे पुनर्वसन तालुक्यालगत घोडेगाव, चास, कडेवाडी, चिंचोली आदि ठिकाणी झाले आहे. सन २०१० मध्ये बोरघर गावाजवळील उरलेल्या शिल्लक क्षेत्राच्या हद्दीमध्ये २६ कुटुंबासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने विशेष निधी खर्च करून घरकुले बांधुन दिली. परंतु येथील उर्वरित शिल्लक क्षेत्र कोणत्याच ग्रामपंचायतीला न जोडल्यामुळे घरकुलांची नोंद होऊ शकली नाही आणि कोणत्याही नागरी सुविधा त्यांना मिळाल्या नाही.

यासाठी ११ नोव्हेंबर २०१६ रोजी कातकरी समाज कुटुंबांतील १५६ लहानमोठया व्यक्तींनी डिंभे धरणामध्ये जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिल्यानंतर १५ नोव्हेंबर २०१६ रोजी तहसिलदार आंबेगाव व गटविकास अधिकारी यांनी जुने आंबेगावचे बुडीत क्षेत्र वगळून महसुली गाव बोरघर ग्रामपंचायतीस जोडणे बाबतचा प्रस्ताव तयार करून गटविकास अधिकारी जिल्हा परीषद पुणे यांचेकडे देतील. त्यानंतर बोरघर ग्रामपंचायती मध्ये समावेश करण्याचा आदेश प्राप्त झाल्यानंतर घरांच्या नोंदी केल्या जातील, असे लेखी आश्वासन दिल्याने कातकरी समाजाने जलसमाधी आंदोलन स्थगित केले. या सर्वांचा परिणाम म्हणून पंचायत समिती आंबेगाव यांनी परिपूर्ण प्रस्ताव पुणे जिल्हा परिषद यांना पाठवला व पुणे जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव मान्य करून आवश्यक त्या ठरावासह विभागीय आयुक्त पुणे यांना २७ नोव्हेंबर २०१७ रोजी सादर केला व विभागीय आयुक्त कार्यालयाने २० डिसेंबर २०१७ रोजी सदरील प्रस्ताव मान्यतेसाठी सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांना पाठवला होता. या नंतर मात्र या प्रस्तावावर आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर हा प्रश्न २६ जानेवारी पर्यंत तात्काळ सोडविण्यात यावा व बुडित आंबेगाव येथील शिल्लक क्षेत्र ग्रामपंचायत बोरघरला जोडण्यात यावे अन्यथा २६ जानेवारी पासुन बेमुदत उपोषन करणार असल्याचे किसानसभा आंबेगाव तालुका समिती अध्यक्ष कृष्णा वडेकर, उपाध्यक्ष राजु घोडे व सचिव अशोक पेकारी यांनी ग्रामविकास विभागाचे सचिव व विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.

Previous articleग्रामपंचायत उमेदवारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार
Next articleचासमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जंयतीनिमीत्त रक्तदान शिबिर संपन्न