ग्रामपंचायत उमेदवारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार

सिताराम काळे घोडेगाव

ग्रामपंचायत व कोविडच्या अनुषंगाने उमेदवारांना सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या प्रचार सभा घेता येणार नाहीत तसेच फ्लेक्स बोर्ड, प्रचार पत्रके देखिल लावता येणार नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले आहे.

आंबेगाव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत असून ७६ प्रभागातील १७१ जागांवर ३६५ उमेदवार उभे आहेत. यासाठी ९२ मतदान केंद्र तयार करण्यात आले असून यासाठी अंदाजे ६०० कर्मचारी नेमले आहेत. तसेच कडक अचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी दि.१० रोजी सर्व उमेदवारांची बैठक घेवून सर्व सुचना दिल्या जाणार आहेत.
फलेक्स बोर्ड खाजगी जागेंमध्ये जागा मालकाची संमती घेऊन व निवडणूक विभागाची परवानगी घेऊ न लावले जावेत. कोणत्याही प्रकारे ग्रामपंचायत कार्यालय, स्थानिक शाळेच्या इमारती, सार्वजनिक शौचालये, मंदिरे, मुख्य रस्त्यावरील चौक या ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावू नयेत. तसेच सभा घेण्यास परवानगी नाही, त्यामुळे कुठेही जास्त गर्दि न करता उमेदवारांनी प्रचार करावेत, कोविडसाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन रमा जोशी यांनी केले आहे.

घोडेगाव येथील तहसिल कार्यालयातून निवडणूकीच्या ठिकाणी मतदान केंद्रावर कर्मचारी पाठविणे, सामान वाटप दि.१३ रोजी केले जाणार आहे तर मत पेट्या जमा करणे व दि.१८ रोजी मतमोजणी देखिल घोडेगाव येथे तहसिल कार्यालयात होणार असल्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.

Previous articleराळे कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे आश्वासन
Next articleआंबेगाव तालुक्यातील कातकरी समाज व किसान सभेचे २६ जानेवारी रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा