तरुणांनी आपल्या देशाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा – जयंत पाटील

अमोल भोसले पुणे

कल्पना शक्ती आजच्या तरुणांमध्ये आहे. अनेक तरुणांमध्ये व्यवसायाची चांगली स्कील आहे… काम करण्याची चिकाटी आहे… अनेक तरुण कलेच्या क्षेत्रात चांगली कामगिरी बजावत आहे… तरुणांनी या सगळ्या गोष्टींचा अचूक वापर करून आपल्या देशाला आपल्या अर्थक्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज फेसबुक लाईव्ह करत राज्यातील युवकांशी संवाद साधला.

भारतीय तरुणांनी संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवावं. तर आणि तरच स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना ती खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात जयंत पाटील यांनी तरुणांना प्रेरीत करण्याचा प्रयत्न केला.

स्वामी विवेकानंद हे नेहमीच काळाच्या खूप पुढे राहिले आहेत. आपल्यासमोरच्या आजच्या आणि उद्याच्या प्रश्नांची मांडणी करून त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे आपल्या उपदेशांच्या माध्यमातून सांगितली आहेत. आपल्या भाषणाच्या माध्यमातून, परखड लेखणीच्या माध्यमातून विवेकानंदांनी रूढी, अंधश्रद्धा, धर्मातील अनाचार यांच्याविरुद्ध नेहमीच लढाई पुकारली होती.

स्वामी विवेकानंद यांनी नेहमीच विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून उपदेश दिले. देशाच्या युवा कसा असावा याची संक्षिप्त मांडणीच त्यांनी केली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात भारतीय तरुणांना सदैव पुढे रहावं अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणूनच स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते असेही जयंत पाटील म्हणाले.

भारत हा एक युवा देश आहे. भारताच्या लोकसंख्येत युवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जगाला भारतीय युवकांकडून मोठी अपेक्षा आहे. राजकारणात काम करणाऱ्या युवकांना मी सांगू इच्छितो की आपण पवार साहेबांचा आदर्श घ्यावा. आपल्या राजकीय कारकीर्देत त्यांनी युवक काँग्रेसमध्ये असताना एक वेगळाच ठसा उमटवला. ते ज्यावेळी युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी दादरच्या टिळक भवनातच आपले बस्तान मांडले. टिळक भवनाच्या एका खोलीत राहूनच ते लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करत व आपला जनसंपर्क वाढवत. आपल्या कामाविषयी त्यांना फार आपुलकी होती व चिकाटी होती याची आठवण करून दिली.

तरुण वयात शरद पवार यांनी अनेक पदे भूषविली म्हणून शरद पवार यांचा तरुणांवर जास्त विश्वास आहे. म्हणूनच की काय कोणताही अनुभव नसताना पवार अतिशय कमी वयात आमच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या जबाबदाऱ्या पेलवल्याही
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला मोठी अपेक्षा आहे. त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांचे विचार तळागाळात रुजवण्यासाठी काम करावे. समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडावे, सरकार दरबारी प्रयत्न करावेत असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

यावेळी युवा दिनानिमित्त भावी वाटचालीसाठी जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या !

Previous articleआळंदीत पहिले शाहिरी व लोककला संमेलन संपन्न
Next articleनिवडणुकीत अनुचित प्रकार घडल्यास होणार कडक कारवाई -प्रताप माणकर