रेल्वेमार्गाच्या भूमिगत रस्त्यात साठणारे पाणी तातडीने काढून टाकण्याचे आदेश खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी रेल्वे अभिय़ंत्यांना दिले

अमोल भोसले,उरळी कांचन —प्रतिनिधी

हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची येथे सुरू असलेल्या रेल्वेच्या डबलिंगच्या कामामुळे येथील रेल्वेमार्गाच्या भूमिगत (underpass) रस्त्यात साठणारे पाणी काढण्यासाठी तातडीने काम करण्याचे आदेश शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रेल्वेचे अभियंता आणि भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

मॉन्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच पावसात आळंदी म्हातोबाची येथील रेल्वे अंडरपासखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने पुणे-सोलापूर रस्त्याकडून गावात जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद पडला होता. त्यामुळे ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी डॉ. कोल्हे यांना संपर्क साधून या अडचणी दूर करण्यासाठी रेल्वे आणि रस्त्याचे काम करणाऱ्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या ठेकेदाराला रस्ता मोकळा करण्याविषयी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. त्यानुसार डॉ. कोल्हे यांनी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. रेणू शर्मा यांना लक्ष घालण्याची सूचना केली होती. त्यानंतर रेल्वेचे अभियंता व रस्त्याच्या कामाचे ठेकेदार यांनी पाणी काढून रस्ता मोकळा करून दिला. मात्र पाणी जाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याने खासदार डॉ. कोल्हे व आमदार अशोक पवार यांनी २ जुलै रोजी या अंडरपास रस्त्याची पाहणी केली.

या पाहणी प्रसंगी रेल्वे अंडरपासच्या भागात भरपूर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आले. त्यामू डॉ. कोल्हे यांनी रेल्वेचे अभियंता व बीपीसीएलचे ठेकेदार यांना अंडरपास मध्ये पाणी साचू नये यासाठी तातडीने उपाययोजना करा असे आदेश दिले. पावसाचे प्रमाण वाढल्यावर येथे पाणी साचले तर आळंदी म्हातोबाची येथील ग्रामस्थांचा संपर्क तुटेल ही बाब लक्षात घेऊन युद्धपातळीवर काम करा अशी सूचना डॉ. कोल्हे यांनी दिली.

या पाहणी प्रसंगी आमदार अशोक पवार, तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पंचायत समिती उपसभापती सनी काळभोर, सरपंच कविता शिवरकर अशोक जवळकर, भगवान जवळकर, लक्ष्मण भोंडवे, शंकर जवळकर, विकास सोसायटीचे चेअरमन साहेबराव जवळकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleवाढीव वीज बिलांबाबतच्या तक्रारी संदर्भात शिबिरांचे आयोजन करून तक्रारींचे निवारण करा खासदार डॉ. अमोल कोल्हे
Next articleराजगुरुनगर मध्ये सोशल डिस्टनसचे नियम धाब्यावर बसवत नागरिकांची खरेदीसाठी गर्दी तर दारू खरेदीसाठी झुंबड