वाढीव वीज बिलांबाबतच्या तक्रारी संदर्भात शिबिरांचे आयोजन करून तक्रारींचे निवारण करा खासदार डॉ. अमोल कोल्हे

अमोल भोसले,उरुळी कांचन –प्रतिनिधी

महावितरणच्या वीज बिलाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (दि. १ जुलै रोजी महावितरण, पुणे विभागाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार आणि अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन करा अशा सूचना दिल्या.
कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मार्च महिन्यापासून वीज ग्राहकांना सरासरी बिल आकारणी करण्यात येत होती. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महावितरणने वीज वापरापोटी भरमसाठ बिलं पाठविल्याची तक्रार करायला ग्राहकांनी सुरुवात केली. डॉ. अमोल कोल्हे यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना पत्र पाठवून सुधारीत बिलं पाठविण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार आणि अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेट घेऊन वीज आकारणी बाबत माहिती दिली.

नागरिकांना दिलेली बिलं बरोबर असल्याचा दावा श्री. तालेवार आणि पवार यांनी केला. त्यावेळी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण होणे गरजेचे आहे असे सांगून ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन करून तक्रार निवारण करा. जो पर्यंत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण केल्याशिवाय वीजपुरवठा खंडित करणे आदी कारवाई करु नये अशी सूचनाही डॉ.अमोल कोल्हे यांनी केली.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या सूचनेनुसार महावितरणने शिरूर लोकसभा मतदारसंघात १ ते १० जुलै राजगुरुनगर, २ जुलै रोजी चाकण येथे शिबीर आयोजित केले. तर ४ जुलै रोजी उरळीकांचन, ५ जुलै मंंचर व राजगुरुनगर, ६ जुलै घोडेगाव व जुन्नर आणि ८ जुलै नारायणगाव व आळेफाटा आदी ठिकाणी शिबिरांचे आयोजन केले आहे.

या संदर्भात डॉ.अमोल कोल्हे यांनी नागरिकांनी वाढीव वीज बिलाबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शिबिरात जाऊन खात्री करून घ्यावी. जर बिलात तफावत दिसत असेल तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना दाखवून देऊन बिलात सुधारणा करून घ्या असे आवाहन केले.

Previous articleप्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या आठ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल ;नारायणगाव पोलिसांची कारवाई
Next articleरेल्वेमार्गाच्या भूमिगत रस्त्यात साठणारे पाणी तातडीने काढून टाकण्याचे आदेश खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी रेल्वे अभिय़ंत्यांना दिले