पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून चांडोलीत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित

बाबाजी पवळे,राजगुरूनगर-गावातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी श्री साई विश्व ग्रुप च्या माध्यमातून जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली असून, यासाठी प्रशासनाने खेड तालुक्यातील चांडोली येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवणार आहे.

ग्रामीण भागात अद्यापही म्हणावी, तशी स्वच्छेतेबाबत जनजागृती झालेली नाही. त्यामुळे आजही गावांमध्ये कचरा रस्त्यावरच पडलेला दिसत आहे. या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. रासायनिक खतांचा वापर टाळून जास्तीत- जास्त सेंद्रीय खतांचा वापर व्हावा व गावात होणा-या कच-याचे रूपांतर सेंद्रीय खतात व्हावे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी हा प्रकल्प राबविण्याचे ठरवले आहे.

तळेगाव दाभाडे येथील श्री साई विश्व ग्रुप च्या मदतीने चांडोली येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला. येथे या प्रयोगाला यश आले असून, कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या व त्याद्वारे खत निर्मिती करणाऱ्या मशीन मागवण्यात आल्या आहेत या मशिनद्वारे शून्य कचरा मोहीम यशस्वी होऊ शकते असे मत कंपनीचे संचालक प्रवीण खंडागळे यांनी व्यक्त केले.

यावेळी पंचायत समिती समितीचे गटविकास अधिकारी अजय जोशी, खेड तालुका पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, चांडोली ग्रामपंचायतीचे प्रशासक बापूसाहेब कारंडे, ग्रामसेवक उगले, श्री साई विश्व ग्रुप च्या संचालिका पल्लवी खंडागळे, ग्रामपंचायतीचे माजी पदाधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्याय प्रतिष्ठानच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन बाबत जाणीव जागृती तसेच कचरा विषयावर कार्यशाळा हौसिंग कॉपरेटिव सोसायटी मध्ये प्रत्यक्ष नागरिकांसोबत बैठका, मोबाईल व्हॅन व विविध पत्रकाद्वारे जागृती कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहेत.

Previous articleपुणे सोलापूर महामार्गावर वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांचा इशारा
Next articleक्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी इंदापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन