धोकादायक स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याची रेटवडी ग्रामस्थांनी मागणी

Ad 1

राजगुरूनगर: रेटवडी (ता खेड ) येथील स्मशानभुमीचा पुराच्या पाण्याने भराव वाहून गेला आहे आहे. शेडचे पत्रे निसटले आहेत. अंत्यविधी करण्यासाठी हि स्मशानभूमी धोकादायक झाली असून यांची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रेटवडी येथे गावालगतच ओढयाकाठी सुमारे २० वर्षापुर्वी बांधलेली स्मशानभुमी आहे. गेल्या काही दिवसापासुन या परिसरात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे येथील ओढा पुराच्या पाण्याने वाहत आहे. दोन दिवसापुर्वी या परिसरात मुसळधार प्रमाणात पाऊस पडला. ओढयाला पुराचे पाणी येऊन स्मशानभुमी पाण्याने वेढली होती. दि. २४ रोजी रात्रीच्या सुमारास स्मशानभुमीचा भराव पाण्याने वाहून गेला आहे. भराव वाहून गेल्यामुळे उभ्या असलेल्या पत्र्यांचे शेडचे लोखंडी खांब निखळले आहेत. स्मशानभुमीला बसविण्यात आलेली फरशी तसेच सिमेंटचे गटू खचले आहेत. त्यामुळे हि स्मशानभुमी वापरसाठी योग्य नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्यस्थितीत या ठिकाणी एखादा अंत्यविधी करणे धोकादायक ठरणार आहे.

या स्मशानभुमीची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी रेटवडी गावाचे पोलीस पाटील उत्तमराव खंडागळे,शिवराम काळे,किरण पवार,ज्ञानेश्वर पवार व ग्रामस्थांनी केली आहे.