राजगुरुनगर बस स्थानकात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

राजगुरुनगर- बस स्थानकात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या मोकाट कुत्र्यांना कुठलीही भीती नसून मात्र प्रवाशांना या परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.कचऱ्याच्या साम्राज्यामुळे बसस्थानक परिसरात व राजगुरुनगर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. अस्वच्छ परिसरात कुत्र्यांना सहज खाद्य उपलब्ध होते. कुत्र्यांची वाढलेली संख्या ही केवळ डोकेदुखीच नाही तर भयावह वाटणारी बाब ठरू लागली आहे.

राजगुरुनगर बस स्थानक हे उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे बस स्थानक आहे या बस स्थानकात रोज हा सार हजारो प्रवाशांचे ये-जा दररोज सुरू असते. या बस स्थानकात स्वच्छता राखली जात नसल्याने मोकाट कुत्र्यांनी या बस स्थानकावर हैदोस घातला आहे. ही मोकाट कुत्री बस स्थानक व आवारात कळपाने फिरत आहेत. तसेच प्रवाशांसाठी बसण्यासाठी केलेल्या बाकड्यावर ही कुत्रे बिनधास्तपणे रात्रीची झोपत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बसस्थानक मधील आतील व बाहेरील परिसरात मोकाट कुत्री बिनधास्तपणे तळ ठोकून उभी राहत आहेत.

या बसस्थानाकालगतच ओढा असल्याने या ओढ्यात हॉटेल व खानवळीमधील उरलेले व शिळे अन्न पदार्थ टाकले जाते. त्यावर ही मोकाट कुत्री ताव मारून बसस्थानकाच्या आवारात फिरत असतात. त्यामुळे प्रवाशांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट कुत्री फलाट वरती लागलेल्या एसटी बस खाली झोपतात तसेच फलाटवर उभे राहून प्रवांशी बसची वाट पाहत असतात. फलाट वरती ही झोपत असल्यामुळे गडबडीत एखाद्या प्रवाशांचा चुकून या झोपलेल्या कुत्र्यावर पाय पडल्यास कुत्रे चावा घेत आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

राजगुरुनगर शहरातही दिवसेंदिवस वाढणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांना रस्त्याने जाताना भीती वाटू लागली आहे. या मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रस्त्यावर कसेही आणि कुठेही वेगाने पळणाऱ्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वार पडून ते गंभीर जखमी झाल्याच्या अनेक घटना राजगुरूनगर शहर व परिसरात घडलेल्या आहेत. कचरा आणि अस्वच्छता यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. रस्त्यावर कुठेही टाकण्यात येणार कचरा, त्यातील पदार्थ, मासांचे तुकडे, हाडे यांच्यामुळे कुत्र्यांना आयते खाद्य उपलब्ध होत असल्याने शहर परिसरात कुठेही कुत्रे नजरेस पडत असतात. राजगुरुनगर शहर सर्व परिसराचा विचार केल्यास मोकाट कुत्र्यांची संख्या दोनशेच्या वर भरले असे नागरिकांचे म्हणणे आहे. कुत्र्यांची संख्या वाढण्यास रस्त्यावर कुठेही कचरा टाकणे हे प्रमुख कारण आहे. या कचऱ्यात खाद्यपदार्थही असल्यामुळे कुत्र्यांना आयते खाद्य मिळत असल्याने कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कचरा उघड्यावर टाकणे बंद केल्यास कुत्र्यांच्या संख्येवर निश्चित आळा बसू शकेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Previous articleधोकादायक स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याची रेटवडी ग्रामस्थांनी मागणी
Next articleजबरी चोरी करणारे दोन सराईत पोलिसांच्या जाळ्यात