माझ्या शिक्षकबांधवांना बदलीने स्वजिल्ह्यात आणणार -आमदार दिलिप मोहिते पाटील

Ad 1

राजगुरूनगर-गेली अनेक वर्ष आपल्या घरादारापासून दूर जिल्ह्यात सेवा करत असलेल्या माझ्या शिक्षक बांधवांना टप्प्याटप्याने पुणे जिल्ह्यात बदलीने आणण्यासाठी सर्व सहकार्य करणार असल्याचे सूतोवाच खेडचे आमदार दिलिप मोहिते पाटील यांनी केले.शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर जिल्हा परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी व शिक्षक प्रतिनिधी यांची संयुक्त सहविचार सभा झाली .

खेडचे आमदार दिलिप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी सुनिल कुर्‍हाडे, राज्य शिक्षक संघाचे मा.उपाध्यक्ष, संजय राळे, खेड तालुका शिक्षक संघाचे मा.अध्यक्ष धर्मराज पवळे, आंतरजिल्हा बदली संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष शरद राळे, सरचिटणीस तुषार डुंबरे, महादेव कोंडभर या मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सीईओंच्या दालनामध्ये सद्यस्थितीतील आरोग्याचे सर्व नियम पाळून अनेक विषयांवर सखोल बैठक झाली.

“२०१० सालापासून अनेक शिक्षक निवृत्त होऊनही जागा कशा निर्माण होत नाहीत? परजिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात येऊ इच्छिणार्‍या शिक्षकांच्या वाटा बंद झाल्या आहेत यावर आपण काय कार्यवाही करत आहात? असा सवाल मोहिते पाटलांनी उपस्थित केला. यावर प्रमोशन संदर्भात कोर्ट केसेस, रोष्टर, पेसा आदींमुळे विलंब झाला असला तरी प्रमोशनची प्रक्रिया सुरु केली असून लवकरच पुर्ण करण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी सुनिल कुर्‍हाडे यांनी सांगितले.

पदविधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी प्रमोशन, कोरोनाचे काम करणार्‍या शिक्षकांसाठी भवितव्य तरतूद, आंतरजिल्हा बदलीने पुणे जिल्ह्यात येण्याच्या प्रतिक्षेत असणार्‍या शिक्षक बांधवांना जागा निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना, जिल्हांतर्गत बदली-बढतीची अपेक्षित निकोप गतिमान प्रक्रिया, बिंदूनामावली (रोष्टर), शिक्षकांची विविध प्रलंबित बिले, आदिवासी क्षेत्रात काम करणार्‍या शिक्षकांसाठीची एकस्तर वेतनश्रेणी, अशा शिक्षण व शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

सर्व बाबींवर रितसर आणि जलद गतीने मार्ग काढण्याच्या सूचना आमदार दिलिप मोहिते पाटील, अध्यक्ष निर्मलाताई पानसरे यांनी केल्या. गतिमानतेने हे विषय मार्गी लावण्याचे सूतोवाच मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी सुनिल कुर्‍हाडे यांनी केले.

जाहिरात