हवेली – मुळशी तालुक्याची स्वतंत्र बाजार समिती — आमदार अशोक पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन- प्रतिनिधी

यापुढील काळात गुलटेकडी, पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती फक्त हवेली तालुक्याचीच असणार आहे. पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करुन, पुर्वीप्रमानेच हवेली व मुळशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतलेल्या निर्णयानुसार “हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती” या नावाने बाजार समिती अस्तीत्वात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात हवेली व मुळशी बाजार समितीचे एकत्रीकरण करुन, दोन वर्षापुर्वी पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होताच आमदार अशोक पवार व संग्राम थोपटे यांनी पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करुन, पुर्वीप्रमानेच हवेली व मुळशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावे अशी मागणी केली होती. यासंदर्भात तीन महिण्यापुर्वी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक झाली होती. यामध्ये पाटील यांनी वरील बदलाचे संकेत दिले होते.
याबाबत अधिक माहिती देतांना आमदार अशोक पवार म्हणाले, राज्यात प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती असतांना राज्य शासनाने अडीच वर्षापुर्वी हवेली व मुळशी या तालुक्यावर अन्याय करुन दोन्ही तालुक्यांच्या दोन वेगवेगळ्या बाजार समिती एकत्रीत केल्या होत्या. तसेच मागील पंधरा वर्षापासुन या बाजार समितीवर शासन नियुक्त प्रशासक नेमला जात होता. हा अन्याय दुर करण्यासाठी मंत्रालयात तीन महिण्यापुर्वी आमदार संग्राम थोपटे यांच्या समवेत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन, पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करुन, पुर्वीप्रमानेच हवेली व मुळशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावे अशी विनंती केली होती. तसेच चार दिवसापुर्वी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन, पवार यांच्याकडेही वरील मागणीबाबत चर्चा केली होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने, वरील बदल होणार आहे.

हवेली व मुळशी या दोन बाजार समित्या स्वतंत्र झाल्यानंतर, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे शहर, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील परिसर, पुणे, खडकी, देहुरोड कॅन्टोन्मेंट आणि हवेली तालुक्‍यातील सर्व गावांचा समावेश असणार आहे. तर वरील निर्णयामुळे आशिया खंडात सर्वात मोठी बाजार समिती असा नावलौकीक असणाऱ्या हवेली कृषी बाजार समितीची सत्ता सुत्रे तब्बल सोळा वर्षानंतर हवेली करांच्या हाती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Previous articleहुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना महत्त्वाची – प्रमिला मडके
Next articleउरुळी कांचन ते खामगांव टेक या रस्त्याची अवस्था झाली अत्यंत दयनीय