हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना महत्त्वाची – प्रमिला मडके

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

पुढील काही दिवसात हुमणीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपाययोजना सुरू करणे आवश्यक असल्याचे कृषी अधिकारी प्रमिला वाळकु मडके यांनी सांगितले त्या संदर्भात त्यांनी कुरवंडी व कोल्हरवाडी येथे एकात्मीक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे कसे गरजेचे आहे याचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले.

प्रथम अवस्थेतील अळी अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करते. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या ऊस , सोयाबीन बटाट व इतर पिकांची मुळे जून ते ऑक्टोबर महिन्यात खातात. त्यामुळे पिकांचे अन्न व पाणी घेण्याचे कार्य बंद पडून संपूर्ण पीकच वाळते. हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उगवणीत ४० टक्के तसेच प्रादुर्भाव जास्त असल्यास १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

हुमणी किडीचा बंदोबस्त योग्य वेळी (जून ते ऑगस्ट) करणे महत्त्वाचे आहे. हुमणीची बारा महिन्यात एकच पिढी तयार होते. असे असले तरी अळीचा जास्त दिवसाचा कालावधी आणि पिकांच्या मुळांवर उपजीविका करण्याची क्षमता अधिक असल्याने पीक जास्त प्रमाणात नष्ट होते. त्यामुळे हुमणी कीड नष्ट करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन किंवा सर्वांगीण उपाय करणे आवश्यक आहे.

हुमणी किडीच्या अवस्था जमिनीत आढळतात. त्याला एकच अपवाद म्हणजे पावसाळ्याच्या सुरवातीला सूर्यास्तानंतर खाण्यासाठी बाभळीच्या किंवा कडुनिंबाच्या झाडांवर जमा होणारे भुंगेरे हे होय. किडीना आकर्षित करण्यासाठी झाडाखाली प्रकाश सापळे गरजेचे आहेत.त्यामुळे रॉकेल मिश्रित पाण्यात भुंगेरे पडून मरण पावतात.

हे नियंत्रण उपायामध्ये सर्वात प्रभावी व कमी खर्चाचे आहे. म्हणून शेतकऱ्यांनी नियंत्रण सुरू करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आंबेगाव टी के चौधरी यांनी केले आहे. प्रशिक्षण कृषी अधिकारी प्रमिला मडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडण्यात आले कोल्हारवाडी येथे कल्पना थोरात ,चंद्रकांत गावडे, प्रमिला एरडे, मनिषा एरडे, किसन गावडे ,बाळशिराम एरडे ,रामदास शेवाळे,विदया एरडे,कुरवडी येथे आशा गटे कविता तोतरे, सोपान तोतरे, रविंद्र तोतरे,दतु तोतरे, सुनिता तोतरे,मंगल तोतरे,यांच्या शेतावर करण्यात आले. कमी खर्चात चांगल्या पद्धतीने हुमणीवर नियंत्रण करण्यासाठी हया उपाय योजनेचे शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे असे प्रमिला मडके यांनी सांगितले व सर्व शेतकर्‍यांचे आभार मानले

Previous articleसृष्टी वाचायची असेल झाडे लावली पाहिजे –  सुनिल जगताप
Next articleहवेली – मुळशी तालुक्याची स्वतंत्र बाजार समिती — आमदार अशोक पवार