उरुळी कांचन ते खामगांव टेक या रस्त्याची अवस्था झाली अत्यंत दयनीय

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन-प्रतिनिधी

उरुळी कांचन ते बायफ , टिळेकरमळा खामगांव टेक या प्रमुख जिल्हा मार्ग क्र.१३८ चे काम गेल्या सुमारे एक वर्षांपासून रडत… खडत ,अडखळत तर अर्धवट करत आता तर पूर्ण बंद पडल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांची, शेतकऱ्यांची, चाकरमान्यांची जाण्या येण्याची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली आहे व आता पावसाळा चालू झाल्याने या रस्त्याने जा ये कशी करायची असा गहन प्रश्न या रस्त्याचा वापर करणाऱ्या जनतेला पडला आहे, संबंधित ठेकेदाराने, सार्वजनिक बांधकाम खात्याने व लोकप्रतिनिधींनी तातडीने याबाबत लक्ष घालून या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांची जी गैरसोय झाली आहे ती दूर करावी अशी मागणी भाजपचे युवा नेते अजिंक्य कांचन, भैरवनाथ सेवा समितीचे सचिव सुनील तांबे यांनी केली आहे.

१४ जुलै २०१९ ला रोडचे भुमी पुजन तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते झाले, हा रस्ता पहिल्या टप्प्यात रेल्वे पुल ते बायफ गेट पर्यत होणार होता भुमीपुजन झाल्यावर चार महिन्याने पाठपुरावा करून ते काम चालू झाले परंतु ठेकेदाराने राजकीय दबावातून म्हणा की आणखी कोणत्या कारणाने या रस्त्याचे काम मधुनच चालु केले आणि सिमेंट काँक्रिटचे १५० मीटरचे काम केले बाकी अर्धवट अवस्थेत सोडून बंद ठेवल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

आता पावसाळा चालु झाला, शाळा चालु होतील या भागातील नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास कमी व्हावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील तांबे यांनी पदरमोड करून काही भागात मुरूम टाकून मोठे खड्डे भरून थोडासा दिलासा आहे,
उरुळी कांचन ते बायफ , टिळेकरमळा खामगांव टेक या प्रमुख जिल्हा मार्ग क्र.१३८ चे काम बांधकाम खात्याच्या “विशेष दुरुस्ती” या लेखा शिर्षातून मंजूर झाले असून त्यासाठी ६ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे , या कामात काही भाग सिमेंट कॉंक्रिटने व काही भाग डाबरीकरणाने करण्यात येणार होता ठेकेदाराने सिमेंट कॉंक्रिटचा काही भाग पूर्ण केला आहे व काही भागात खडीकरण केले आहे, सध्या या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे ही वस्तुस्थिती आहे असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सासवड (१) चे उपविभागीय अभियंता एस.व्ही.इनामदार यांनी सांगितले.

याबाबत स्थानिक आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आमच्या सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन निवडणुकीपूर्वी चालू झालेल्या कामांना बंद न ठेवता चालू करण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्याचे धोरण आखले आहे,परंतु कोरोणाच्या प्रादुर्भावाने यासाठी काही विलंब होतोय तो दूर करून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीत आहे.