तमाशा फडमालक कलावंत विकास महामंडळाच्या वतीने नारायणगावात उपोषण

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)

संपूर्ण देशात तमाशा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव मध्ये आज महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत विकास महामंडळाच्यावतीने ज्येष्ठ तमाशा फडमालक रघुवीर खेडकर यांच्या नेतृत्वाखाली तमाशा कलावंत व फडमालक यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले.

तळागाळातील सर्व प्रकारचे कलावंत तसेच तमाशा क्षेत्राशी संबंधित असलेले सर्व कर्मचारी यांना लॉक डाऊन च्या कालावधी मध्ये दरमहा पाच हजार रुपये मानधन मिळावे, तमाशासाठी वेगळे महामंडळ स्थापन करावे, प्रत्येक फडमालकांना आर्थिक पॅकेज द्यावे, तमाशा उभारणीसाठी बँकेतून २५ लाखापर्यंत कर्ज द्यावे, लॉक डाऊन संपल्यानंतर तमाशा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, कलावंतांना घरकुल व मुलांना शिक्षण मोफत दिले जावे आदी मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले.

नारायणगाव येथील फुलसुंदर मार्केट परिसरात झालेल्या उपोषण स्थळी आमदार अतुल बेनके यांनी तमाशा फड मालकांच्या व कलावंतांच्या मागण्या शासन दरबारी मांडू असे आश्वासन दिले. याचवेळी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी देखील फोनवरून कलावंतांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू असे आश्‍वासन रघुवीर खेडकर यांना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

याप्रसंगी अखिल भारतीय मराठी तमाशा महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, शरद सांस्कृतिक कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मिकांत खाबिया, डॉ संतोष खेडलेकर, तहसीलदार हनुमंत कोळेकर, अमर पुणेकर, मालती इनामदार, कैलास नारायणगावकर, संजय महाडिक, शफीभाई शेख, शिरीष बोराडे, शांताबाई संक्रापूरकर, शिवकन्या बढे, वर्षा संगमनेरकर, सीमा पोटे, राजेश बागूल, विशाल मुसाभाई इनामदार, सुधाकर पोटे, महेश पिंपरीकर, दत्ता जाधव, संजय फल्ले तसेच राज्यातील अनेक तमाशा फडमालक व कलावंत या उपोषणाला उपस्थित होते.

जाहिरात