पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करावी, एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

माथेरान (जि-रायगड ) येथील पत्रकार संतोष पवार यांचा मृत्यू सरकारी यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झालेला असल्याने त्याची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाव्दारे केली आहे.संतोष पवार यांच्या कुटुंबियांना सरकारने पन्नास लाख रूपयांची मदत करावी अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,संतोष पवार यांना सकाळी श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना कर्जत येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र तेथे व्हेंटिलेटर नसल्याने त्यांना डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये नेण्याचे ठरले. १०८ क्रमांकांच्या अ‍ॅम्ब्युलन्समधून त्यांना घेऊन जात असताना ऑक्सिजन  संपला,मात्र नवीन सिलेंडर स्टाफला लावता आले नाही आणि संतोष पवार यांचं निधन झाले.केवळ सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे त्यांचं निधन झाल्याने या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार व्यक्तींना कठोर शासन व्हावं अशी मागणी करण्यात आली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील कार्यक्रमात बोलताना कोरोनानं निधन झालेल्या पत्रकारास पन्नास लाख रूपयांची मदतीची घोषणा केली होती.त्यानुसार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना देखील पन्नास लाख रूपयांची मदत मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

३१ जुलै नंतर राज्यात कोरोनानं १४ पत्रकारांचं निधन झालं आहे,२५ पेक्षा जास्त पत्रकारांवर उपचार सुरू आहेत आणि २५० पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची बाधा झालेली आहे.हि संख्या सातत्यानं वाढत असल्याने सरकारने पत्रकारांच्या उपचाराची विशेष व्यवस्था करावी अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे,सरचिटणीस संजीव जोशी आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous articleमराठी पत्रकार परिषदेचा ‘रायगडाचा शिलेदार’ निखळला. पत्रकार संतोष पवार यांचे कोरोनामुळे आकस्मित निधन
Next articleमाजी आमदाराचा कारनामा; सुरेश गोरेंकडून राजमुद्रेचा गैरवापर