देशाचे परमादरणीय महामहिम राष्ट्रपती, माननीय श्री. प्रणब मुखर्जी यांची संस्मरणीय आठवण..!! शिक्षकनेते धर्मराज पवळे

…..यानिमित्ताने दिल्ली दरबारी राष्ट्रपती भवनात त्यांच्या मुख्य उपस्थितीत सजलेला आणि सुवर्णाक्षरात नोंदवावा अशा प्रखर राष्ट्रप्रेमी सोहळ्याचा एक साक्षीदार झाल्याचा मनोमन नम्र अभिमान आहे.

खेड तालुक्याचे महान सुपुत्र हुतात्मा राजगुरुंचे टपाल तिकिट प्रकाशन सोहळा २२ मार्च २०१३ रोजी राष्ट्रपती भवनात अगदी मोजक्या निमंत्रीत उपस्थितीत संपन्न झाला. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यातून (एकूणच उत्तर पुणे जिल्ह्यातून) फक्त ४०० नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी अनुक्रमांकासह निमंत्रण पत्रिका होत्या, त्यातील १७७ क्रमांकाची निमंत्रणपत्रिका मला होती याचे मनोमन समाधान आहे. या अनुपम्य देखण्या सोहळ्यासाठी राष्ट्रपतींसमवेत, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलिपराव मोहितेपाटील आणि ज्येष्ठ नेते, राजगुरुभक्त, शिवसैनिक व पत्रकारमित्र उपस्थित होते.

समाजात आपल्या कार्यकर्तृत्वानं असं नावारुपाला यावं कि घरातले, भावकीतलेच काय अगदी समान आडनाव असणारे, आणि दूरच्या पाहुण्यांना सुद्धा अशा व्यक्तीशी आपले जवळीकीचे नातं सांगायला आवडावं, अभिमान वाटावा!
आणि…कुविचारी, कुआचारी व्यक्ती असेल तर अगदी जवळच्या माणसांनाही ‘तो’ आमचा नाही वेगळ्या भावकीतला आहे, दूरच्या नात्यातला आहे असं नि:संकोचपणे सांगणं भाग पडावं हेही दुर्दैवच…!

खेडच्या मातीने असा सुपुत्र दिला की ज्यांच्याशी नातं सांगण्याचा मोह गाव, तालुका, जिल्हा आणि राज्यालाही व्हावा.

खेड तालुक्याच्या इतिहासात असा देशभक्त सुपुत्र जन्माला आला ज्याच्या नावाचा अभिमान, ज्याच्याशी भूमिचे, गावाचे नातं सांगण्याचा गर्व प्रत्येकाला होतो आहे, हुतात्मा शिवराम हरी राजगुरुंच्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात आम्ही राहतो हे प्रत्येकजन अभिमानाने सांगतो आहे.

फक्त राजगुरुंच्या भागातील म्हणून टपालतिकिट प्रकाशनाला उपस्थित हे ४०० राजगुरुभक्त राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपती प्रणब मुखर्जींकडे खास पाहुणे आल्यासारखे होते. नम्रपणे सांगतो ज्या कपात चहा पिलो ना त्या कपावर राष्ट्रपती भवन राजमुद्रा छापलेली होती, ज्या डिशमधून जेवण केले त्या डिशवर या मुद्रा होत्या, मन देशभक्तीनं आणि राजगुरुप्रेमानं गहिवरुन सांगत होतं.

“एक सुपुत्र तालुक्याला लाभला, तालुक्याचं सोनं झालं, फक्त त्यांच्या नावामुळं राष्ट्रपती भवनात सन्मानानं पाय ठेवण्याचं भाग्य लाभलं, खुर्चीत बसून राजेशाही कार्यक्रमाचे साक्षीदार होता आलं, राष्ट्रपतींचे पाहुणे बनून त्यांचा चहापान घेता आला, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा! हुतात्मा राजगुरु अमर रहे!”

यावेळी दिल्लीदर्शन, आग्रा, मथुरा, वाघा बाॅर्डर, नैनिताल सगळीकडे सारे फिरलो…
पण स्मरणात कायमचे घर करुन राहिले ते राष्ट्रपतीभवन, राजगुरुंचे टपालतिकिट प्रकाशन आणि महामहिम राष्ट्रपती प्रणब मुखर्जी!!

भारतरत्न स्व. प्रणब मुखर्जींना विनम्र अभिवादन!!

~ श्री.धर्मराज रामचंद्र पवळे.
‘शिवतीर्थ’ वाकळवाडी.
‘रामविजय’ राजगुरुनगर.                                               

 

 

 

Previous articleगुरव समाज सेवा संस्थेतर्फे जुन्नर तालुक्यातील १०१ कोरोना योध्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव
Next articleजनजागृती अभियान अंतर्गत सेनिटायजर मास्क व रोगप्रतिकार शक्तीच्या गोळ्यांचे पोलीस मित्र संघटनेच्या वतीने वाटप