दावडी येथे “सुरक्षित गणेशोत्सव” मोहीम

राजगुरुनगर-लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगर व करिअर हब कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने दावडी (ता. खेड) येथे ‘सुरक्षित गणेशोत्सव मोहीम’ सुरू करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ शनिवारी (दि. २९) माजी उपसरपंच संतोष गव्हाणे यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी करिअर हबच्या संचालिका अनिता टाकळकर, क्लब जिल्हा खजिनदार संतोष सोनावळे, विभागीय अध्यक्ष मुरलीधर साठे, लायन्स क्लबचे अध्यक्ष कृणाल रावळ, चाकण क्लबचे अध्यक्ष रवींद्र सातकर, माजी अध्यक्ष विष्णू कड व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

या मोहिमे अंतर्गत गणेशोत्सव काळात गावात ३३०० मास्क व २०० सॅनिटाईजर बॉटल्सचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात स्थानिक गणेश मंडळाचे अध्यक्ष शंकर बोत्रे व राजू बोथरा यांच्याकडे मेडिकल किट देण्यात आले. त्याचप्रमाणे कोविड १९ च्या काळात कोरोना योद्धा म्हणून समर्थपणे काम करणारे करणारे पत्रकार, अंगणवाडी सेविका, पोलीस, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत कर्मचारी यांना देखील मेडिकल किट वाटण्यात येणार आहे. या सर्व विभागप्रमुखांना प्रातिनिधिक स्वरूपात मेडिकल किट उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी संतोष गव्हाणे यांनी लायन्स क्लबच्या समाजोपयोगी कार्यात यापुर्वीही सहभागी झाल्याचे अनुभव कथन केले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून पुढील काळातील विधायक कार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रमुख पाहुणे संतोष सोनावळे व मुरलीधर साठे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पोलीस बीट अंमलदार संतोष मोरे यांना वाढदिवसानिमित्ताने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे संयोजन अंबर वाळुंज, नितीन दोंदेकर, मिलिंद आहेर, रमेश बोऱ्हाडे, राजू गायकवाड आदींनी केले. प्रास्ताविक अमितकुमार टाकळकर यांनी केले. सूत्रसंचालन अक्षता कान्हूरकर हिने तर आभार प्रदर्शन पोलीस पाटील आत्माराम डुंबरे यांनी केले.

Previous articleनारायणगाव चे सरपंच योगेश पाटे कोरोना बाधीत
Next articleसातकरस्थळ ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांना परसबागेचे प्रशिक्षण व बियाणे वाटप