खेड प्रांताधिकारी कार्यालयाजवळ शाळकरी विद्यार्थ्याने वाचवला मुक्या जीवाचा प्राण

राजगुरूनगर

चासकमान (ता .खेड) येथील विश्वराज नाईकरे या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलाने राजगुरुनगर मधील बेवारस
कुत्र्याच्या जखमी पिलाचा जीव वाचवून शालेय विद्यार्थ्यांसाठी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की सुमारे तीन दिवसांपूर्वी रस्ता अपघातात जखमी झालेल्या कुत्र्याच्या पिलाला रस्त्यावर विव्हळताना पाहून विश्वराज नाईकरे या विद्यार्थ्याला खूप वाईट वाटले.

त्याने या पिल्लाला रस्त्यावरून बाजूला घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवले.एका दुकानातून विनंती करून पुठ्ठ्याचे खोके आणून ते व्यवस्थित कापून त्याचे सुरक्षित घर बनवले व त्यात या पिल्लाला ठेवून त्याचे प्राण वाचवले.गेल्या तीन दिवसांपासून तो मुका जीव वेदनेने विव्हळत होता.त्याला हा मुलगा दररोज एक बिस्कीट पुडा व पाणी ठेवून जात होता.त्याने या खोक्यावर एक संदेश व आपले नाव आणि मोबाईल नंबर लिहून ठेवला.


” तुम्ही याला वाचवाल तर आपण सुरक्षित राहू…”

व हा संदेश वाचून कोणी तरी या पिल्लाला आणखी मदत करील असे त्याला वाटले.हा संदेश वाचून प्रांताधिकारी कार्यालयातील वाहन कर्मचारी विकी वन्ने यांनी त्या संदेशाखाली दुसरा अनमोल संदेश लिहिला.
” एक कुत्रा वाचवल्याने जग काही बदलणार नाही परंतू त्या कुत्र्याचा जीव वाचवल्याने त्याचे जग मात्र कायमचे बदलेल.

हे सारे इतके सहज घडत गेले आणि ही संपूर्ण गोष्ट प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी श्रीमती विधाते मॅडम व सुरक्षा रक्षक यांच्या निदर्शनास आली.तेथून पुढे या पिल्लाचे नशीबच उजळले.विधाते मॅडम यांनी त्या पिल्लासाठी डॉक्टरांना बोलावून औषधोपचार केले व दररोजच्या दुधाची व्यवस्था केली.तीन दिवसांत त्याला या कार्यालयातील माणसांचा लळा लागला.व ते ब-यापैकी ताजेतवाने झाले आहे.आणि उभे राहून चालायलाही लागले आहे.

त्या संदेश चिठ्ठीत नाव व नंबर लिहिलेल्या मुलाचे विशेष कौतुक वाटून त्या नंबरवर विधाते मॅडम यांनी उत्सुकतेपोटी सहज फोन केला असता तो नंबर व तो मुलगा निसर्ग प्रेमी शिक्षक संजय नाईकरे यांचा असल्याचे समजले. तो न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी या शाळेत शिकत आहे.या सर्व घटनेची माहिती संजय नाईकरे यांना मिळाल्यामुळे तेही घटनास्थळी दाखल झाले.

एकंदरीत झाले ला सर्व विषय उपस्थितांच्या लक्षात आला.
यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ‘आपल्या मुलाच्या या कृतीमुळे मला खूप आनंद झाला असून आपण या सुंदर जगाचं आयुष्यभर
नक्कीच काही तरी देणं लागतो. ही भावना जपून सर्वांनी योग्य तो बोध घ्यावा.बालवयातच निसर्ग व पर्यावरण संवर्धन दुर्गभ्रमण आणि प्राण्यांप्रती भूतदया जोपासणा-या उच्च संवेदनशील मनाच्या विश्वराजचे राजगुरुनगर मधील सर्पमित्र समुह तसेच वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष, सदस्य आणि अनेक संस्था, नागरिक व मान्यवरांकडून कौतुक होत आहे.

Previous article“भाजी बाजार आणि खाऊ गल्ली” या उपक्रमात विद्यार्थीच बनले व्यापारी
Next articleउरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद