“भाजी बाजार आणि खाऊ गल्ली” या उपक्रमात विद्यार्थीच बनले व्यापारी

राजगुरुनगर (विशेष वृत्त)

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना दैनंदिनी व्यवहाराची जाणीव आणि पैशांची आकडेमोड यावी या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारापाटी कमान येथील विद्यार्थ्यांसाठी आज एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बाजारयंत्रणेच्या माध्यमातून समाजजीवनातील मानवी व्यक्तिमत्त्वांचे अनेक पैलू समोर येत असतात.समाजातील विविध भल्याबु-या अनुभवांची ओळख देखील अशाच समाज माध्यमांतुन होत असते.आणि म्हणूनच शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वांच्या जडणघडणीत या गोष्टींचे देखील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या बारापाटी शाळेत विद्यार्थ्यांना हा जीवनिनुभव देण्यात आला.दैनंदिन जीवनातील व्यवहारज्ञान,समयसुचकता व हजरजबाबी पणा अशा विविध महत्त्वांच्या मुल्यांचा अंतर्भाव विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सहजरित्या सामाविष्ट होण्यासाठी या शाळेत शाळेत भाजीबाजार आणि खाऊ गल्लीचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी केले.

शाळेतील सहशिक्षिका वैशाली मुके यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे स्टॉल उभारणीपासून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या दुकानाची योग्य मांडणी,सुटे पैसे व्यवस्थित ठेवणे,नेमकी आकडेमोड करून बिनचूक व्यवहार कसा करावा, आणि आपल्या मूळ भांडवल व खर्चाचा ताळमेळ घालून नेमका फायदा तोटा असा लक्षात घ्यावा,व बाजारात होणा-या काही संभाव्य फसवणुकीपासून सुद्धा कसे सावध राहावे, याबाबत सखोल मार्गदर्शन केले.शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना स्टॉलसाठी क्रमांक देण्यात आले होते.

या उपक्रमात विविध प्रकारच्या पालेभाज्या, भाज्या,भोपळा,अळू,
पालक,मेथी,आवळे, वांगी, टोमॅटो यांसारख्या शेतमालासह चवदार आणि पौष्टिक खाद्यपदार्थांची देखील रेलचेल दिसून आली.पाणीपुरी, गुलाबजामून,ओली सुकी भेळ, घरगुती चिक्की,खारे शेंगदाणे वाटाणे, चणे, पापड्या,बेकरी उत्पादनांसह विविध प्रकारचे वीस स्टॉल लावण्यात आले होते.सुमधूर पार्श्वसंगीत, ग्राहकांशी सौजन्य शील संवाद, बोलण्यातील नीटनेटकेपणा, परिसर स्वच्छता व बाजारात होणा-या संभाव्य कच-याचे देखील सुयोग्य व्यवस्थापन अशा नानाविध वैशिष्ट्यांमुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरला.वैशाली मुके यांनी सर्व सहभागी विद्यार्थी महिला पालक व उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ नाईकरे, बाजीराव नाईकरे, सचिन नाईकरे,संपत नाईकरे, एकनाथ नाईकरे, सोपान नाईकरे ज्योती सपाट राणी नाईकरे,अक्षदा नाईकरे, अस्मिता नाईकरे,साधना नाईकरे,पूजा नाईकरे, अश्विनी नाईकरे,जयश्री नाईकरे,राणी सपाट व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक आणि महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleसाहीत्य सम्राटचा कवी भारत जिंकतो – जोगदंड
Next articleखेड प्रांताधिकारी कार्यालयाजवळ शाळकरी विद्यार्थ्याने वाचवला मुक्या जीवाचा प्राण