टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांची दुर्ग कलावंतीण, प्रबळगड आणि इर्षाळगड एकाच दिवशी सर करुन लोकमान्य टिळकांना अनोखी मानवंदना

राजगुरूनगर- एकाच दिवशी अवघ्या १४ तासात दुर्ग कलावंतीण, प्रबळगड आणि इर्षाळगड हे तीन गड किल्ले सर करीत दुर्गम घाटवाटेचा अनुभव घेत टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी तिरंगा फडकावीत लोकमान्य टिळकांना जयंती दिनी अनोखी मानवंदना दिली.

या मोहिमेची सुरवात ठाकूरवाडी (ता.पनवेल, जि.रायगड) या ठिकाणाहून झाली. प्रबळमाचीला येऊन पहिल्यांदा कातळात कोरलेल्या अवघड पायऱ्यांसाठी सर्वपरिचित असलेला दुर्ग कलावंतीण सर करून गिर्यारोहक शिवरायांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाले. येथून गडउतार होऊन ट्रॅवर्स मारून प्रबळगडाकडे प्रस्थान केले.

नाळ वाटेने प्रबळगडाच्या पठारावर गेल्यावर ४ राजवाड्यांनंतर असणाऱ्या गणेश मंदिर आणि शिव मंदिरासमोर गिर्यारोहक नतमस्तक झाले. येथून पुढे महादरवाज्यातून गड उतार होत घनदाट जंगलातून मार्ग काढत इर्षाळवाडीतून जात इर्शाळगड सर करीत नेढ्यानंतर गुफेच्या पायरी मार्गाचा थरार अनुभवला. या नंतर गड उतार होऊन नम्राचीवाडी (ता.खालापूर, जि.रायगड )येथे या मोहिमेची सांगता झाली.

मुसळधार पाऊस, घनदाट जंगलातील चकवा देणाऱ्या दुर्गम घाटवाटेची तंगडतोड भटकंती, धुक्यात हरवलेला परिसर अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या जॅकी साळुंके, चेतन शिंदे, मंदार चौधरी, प्रणाली जोशी, जुबेर शेख, प्रतिक भगत, उदय गावंडळकर, निखिल अंजनवाड, एसकीराजा कुमार, नंदकुमार सावंत, रोहिदास भाऊड आणि डॉ.समीर भिसे यांनी मोहीम फत्ते केली.

Previous articleशहाजीराजे भोसले यांच्या समाधीच्या सुशोभीकरणासाठी कर्नाटक सरकारकडून १० कोटी मंजूर : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश
Next articleजागतिक वनसंवर्धन दिनानिमित्त घोडेगाव येथे वृक्षारोपण