शहाजीराजे भोसले यांच्या समाधीच्या सुशोभीकरणासाठी कर्नाटक सरकारकडून १० कोटी मंजूर : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश

उरुळी कांचन

स्वराज्य संकल्पक महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांच्या होदीगेरे (Hodigere) येथील समाधी स्मारकाचा विकास करण्यासाठी निधी मंजूर करण्याच्या आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी समाधीच्या सुशोभीकरणासाठी १० कोटींचा निधी मंजूर केला याबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

यंदाच्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर होदीगेरे येथील शहाजीराजे भोसले यांची समाधी दुर्लक्षित अवस्थेत असल्याची पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत होती. शिवजयंती निमित्त व्याख्यानासाठी कागल येथे गेलेल्या खासदार डॉ. कोल्हे यांनी या पोस्टची दखल घेत या होदीगेरे येथे भेट देऊन शहाजीराजे भोसले समाधीवर नतमस्तक होऊन आदरांजली वाहिली होती.

या भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्रोत असलेल्या महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांच्या समाधी दुर्लक्षित असणे क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया देत तातडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र पाठवून या समाधीचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री बोम्मई यांनी समाधीच्या सुशोभीकरणासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा केली.

शहाजीराजे भोसले यांच्या होदीगेरे येथील समाधीच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री बोम्मई यांचे खासदार डॉ. कोल्हे यांनी आभार मानले असून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्रोत असलेल्या शहाजीराजांच्या समाधीचा दिमाखदार विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Previous articleशहाजीराजे भोसले यांच्या समाधीच्या सुशोभीकरणासाठी कर्नाटक सरकारकडून १० कोटी मंजूर : खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश
Next articleटीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांची दुर्ग कलावंतीण, प्रबळगड आणि इर्षाळगड एकाच दिवशी सर करुन लोकमान्य टिळकांना अनोखी मानवंदना