बाजी प्रभू देशपांडेंना टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांचे पावनखिंडीत वंदन

राजगुरूनगर – छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा ते पावनखिंड ही तब्बल ५० किलोमीटरची ऐतिहासिक पदभ्रमंती करून “पन्हाळगड-पावनखिंड-विशाळगड” रणसंग्रामात वीरमरण स्विकारणारे शिवा काशिद आणि “लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे” अशी स्वामीनिष्ठा मनी धरून घोडखिंडीत धारातीर्थी पडून त्यास पावन करणाऱ्या बाजी प्रभू देशपांडे, बांदल सेना आणि कैक निर्भिड रग्गड मावळ्यांना शिलेदार परिवार आणि टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी पावनखिंडीत वंदन केले.

या मोहिमेची सुरवात वीर शिवा काशिद आणि वीर बाजी प्रभू देशपांडे यांच्या पन्हाळगडावरील स्मारकासामोर नतमस्तक होऊन झाली. पन्हाळगड, तुरुकवाडी, म्हाळुंगे गाव, मसाई पठार, कुंभारवाडी, खोतवाडी, चापेवाडी, मांडलाईवाडी, धनगरवाडी, कर्पेवाडी, आंबेवाडी, कळकवाडी, रिंगेवाडी, पाटेवाडी, सुकामाचा धनगरवाडा, म्हसवडे, धनगरवाडी, पांढरपाणी, पावनखिंड अशी ही तब्बल ५० किलोमीटरची ऐतिहासिक पायवाट मार्गक्रमण केल्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्याून शिवरायांना पन्हाळगडावरून विशाळगडावर सुखरूप घेऊन जाणाऱ्या त्या रणधुरंधर मावळ्यांपैकी आपणच एक आहोत असा आभास गिर्यारोहकांना झाला.

खिंडीत पोहोचल्यावर “स्वराज्य रक्षणासाठी मरण आले तरी बेहत्तर पण आमचा पोशिंदा जगला पाहिजे” अशी स्वामीनिष्ठा मनी धरून या पवित्र ठिकाणी धारातीर्थी पडलेल्या स्वराज्य रक्षक मावळ्यांना भगवा स्वराज्य ध्वज हाती घेत, “जय भवानी जय शिवराय”, “हर हर महादेव” या घोषणा देत वंदन केले.

दिवसभर पडणारा मुसळधार पाऊस, धुक्यात हरवलेला परिसर, काही ठिकाणी वाडी-वस्ती तर काही ठिकाणी भात शेतीतून असणारे निसरडे गुडघाभर चिखलमय रस्ते आणि काही ठिकाणी शेवाळलेले दगडी रस्ते, अंधारमय व घनदाट जंगल, भरभरून वाहणारे ओढे नाले, जळू, अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात अवधूत चाळके, प्रीतम चौगले, शैलेश जाधव, अंकुश कुंभार, प्रदीप मदने, संजय सावंत, दिपक परीट, कपील सुतार, फैयाज मणेर, प्रशिल अंबाडे आणि डॉ.समीर भिसे हे शिवभक्त गिर्यारोहक पावनखिंडीत नतमस्तक झाले.

Previous articleआषाढी एकादशीनिमित्त शाळांमध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा
Next articleमानव विकास परिषदेच्या आंबेगाव तालुकाध्यक्षपदी राम फलके यांची निवड