वडकी येथे शेतकऱ्यांना वेस्ट डिकंपोजर कल्चरचे वाटप

उरुळी कांचन

वडकी (ता.हवेली) येथे कै. रामदासजी गायकवाड माजी उपसरपंच यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित खरीप हंगाम पुर्व शेतकरी प्रशिक्षण वर्ग व शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. मच्छिंद्र गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य यांच्या पुढाकारातून पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून गावातील शेतकऱ्यांना मोफत स्वरुपात वेस्ट डिकंपोजर कल्चरचे वाटप तालुका कृषि अधिकारी हवेली मारुती साळे यांच्या हस्ते व अरुण दादा गायकवाड, सरपंच वडकी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सदर प्रशिक्षण वर्गात तालुका कृषि अधिकारी हवेली मारुती साळे यांनी कृषि विभागाच्या विविध योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले व महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अर्ज करुन जास्तीत जास्त कृषि औजाराच्या व सुक्ष्म सिंचन योजना अंतर्गत ठिबक सिंचन तुषार सिंचन संच चे अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

मंडळ कृषि अधिकारी हडपसर गुलाबराव कडलग यांनी जमीनीची आरोग्य पत्रिका व जमीनीच्या आरोग्य पत्रिका नुसार शिफारशीत खतमात्रा देऊन पिकांचे उत्पादन घ्यावे तसेच सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व जिवाणू संवर्धक खतांचा वापर बाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले. मेघराज वाळुंजकर कृषि पर्यवेक्षक हडपसर-१ यांनी एकात्मिक शेती, सेंद्रिय शेती, जैविक शेती , वेस्ट डिकंपोजर कल्चर चा वापर, विषमुक्त भाजीपाला फळपिके व अन्नधान्य उत्पादन, अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत परसबाग किटचा अवलंब करून विषमुक्त भाजीपाला/फळपिकांचे उत्पादन करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानी कमीत कमी एक गुंठा ते २गुंठे क्षेत्रावर विविध भाजीपाला व फळपिकांची लागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले.

देवकुळे, महाकृषि ग्रीन गोल्ड शेतकरी उत्पादक कंपनी यांनी शेतकऱ्यांना‌ जमीनीची सुपीकता, जिवाणू संवर्धक खतांचा वापर,कृषि प्रक्रिया, शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत राबविण्यात येणा-या औषधी व सुगंधी वनस्पती लागवड , पुदिना प्रक्रिया उद्योग बाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.

अरुण दादा गायकवाड, सरपंच यांनी महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत राबविण्यात येणा-या विविध योजना, शेतकरी प्रशिक्षण वर्ग, शेतकरी चर्चासत्र बाबत समाधान व्यक्त करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. उपसरपंच दिलीप गायकवाड यांनी कृषि विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या मार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांबाबत समाधान व्यक्त करुन कृषि विभागाच्या विविध योजनांची प्रशंसा केली.गोरख गायकवाड, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन करुन आभार प्रदर्शन केले.

सदर कार्यक्रमास मच्छिंद्र गायकवाड, महेश गायकवाड, श्रीमती कमल कोळपे, ग्रामपंचायत सदस्य, कृषि पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी दशरथ गायकवाड, प्रयोगशील शेतकरी नाथु मोडक, भिवा कोळपे, कोंडीबा कोळपे, कुभार साहेब, नितीन गायकवाड व इतर शेतकरी उपस्थित होते.

Previous articleपुणे-सोलापूर महामार्गावरील कांचन हॉटेलच्या मालकाला साडेचार लाखाचा गंडा घालणाऱ्या बोगस फूड इन्स्पेक्टरला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Next articleशिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वारावरील शिवपुतळ्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतले दर्शन