पुणे-सोलापूर महामार्गावरील कांचन हॉटेलच्या मालकाला साडेचार लाखाचा गंडा घालणाऱ्या बोगस फूड इन्स्पेक्टरला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

योगेश राऊत , पाटस

फुड इन्स्पेक्टर असल्याचे सांगून पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कांचन व्हेज या हॉटेल मालकाला दोघांनी साडेचार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सुरज सुरेश काळे ( वय-४०, रा मधूबन नगर सोलापूर, धर्मराज शिवाप्पा शिकलवाडी (वय ३६ रा. रामवाडी धोंडिबा वस्ती, सोलापूर) अशी तोतया आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी प्रसाद दत्तात्रय कांचन (वय-५४. रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिन्यापूर्वी यवत येथील कांचन व्हेज या हॉटेलचे मालक प्रसाद कांचन यांना मुंबई मंत्रालयातून फूड इन्स्पेक्टर बोलत आहे. असा फोन आला. त्या वेळी संबंधित व्यक्तीने तुमच्या हॉटेलमध्ये जेवण केलेल्या एका महिलेला जेवणातून विषबाधा झाली असल्याचे सांगितले. या बाबतची तक्रार थेट मंत्रालयात आली असल्याने तुमचे हॉटेल बंद करण्यासाठी आमची टीम यवत कडे निघाली आहे. ही कारवाई टाळावयाचे असेल तर एका बँकेच्या खात्यावर काही ठराविक रक्कम जमा करण्यास कांचन यांना सांगितले.

यावेळी हॉटेलचे नाव बदनाम होऊ नये, या भीतीपोटी कांचन यांनी सदर व्यक्तीने सांगितलेल्या खात्यावर महिनाभराच्या काळात साडेचार लाख रुपये जमा केले. पैसे जमा करूनही संबंधित व्यक्ती फोन करीत असल्याने कांचन यांनी पोलिस निरीक्षक नारायण पवार यांची भेट घेतली. व त्यांच्यासोबत महिनाभरात घडलेल्या घटनांची माहिती दिली.

सदर गुन्ह्याचा तपास यवत पोलीस करीत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी तपास करीत असताना आरोपी हा वेळोवेळी सीमकार्ड बदलून फोन करीत होता.तांत्रिक माहितीच्या आधारे सदर आरोपी हे सोलापूर येथे असल्याबाबत माहिती झाल्याने यवत पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथक यांनी सोलापूर येथे जाऊन सदर दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

दरम्यान हे दोघेही एका ऑनलाइन मनी ट्रान्सफर शॉपवर फिर्यादी यांनी पाठवलेले पैसे नेण्याकरिता आले असता त्यांना तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच ते रिक्षा मध्ये पळून जात असताना त्यांच्या पाठलाग करून अतिशय शिताफीने पकडून जेरबंद केले.
सदरची कामगिरी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे
पोलीस उप निरीक्षक संजय नागरगोजे , पोलीस नाईक राम जगताप ,प्रवीण चौधर, मारुती बाराते यांनी केलेली आहे.

Previous articleकवठे येमाई येथे वादळीवार्यासह पावसाची दमदार हजेरी
Next articleवडकी येथे शेतकऱ्यांना वेस्ट डिकंपोजर कल्चरचे वाटप