नारायणगावात चोरट्यांचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत तीन चोरटे कैद

किरण वाजगे

नारायणगाव (ता जुन्नर) येथील ओंकार सहकारी गृहनिर्माण सोसायटी येथील दोन सदनिका (फ्लॅट) तसेच खोडद रोड येथील डॉक्टर गोसावी हॉस्पिटल समोरील संतुष्टी प्रेस्टीज येथील बंद असलेले कार्यालय व शेटे मळा येथील शुभम सोसायटी मधील एक सदनिका अज्ञात तीन चोरट्यांनी फोडली व घरातील मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवार (दि. २७) रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत नारायणगाव पोलिसांच्याा वतीने या चारही घटनेचा पंचनामा करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध तात्काळ घेतला जाईल असे आश्वासन नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिले. मात्र सध्या यात्रा-जत्रा उरूस व लग्नसराई असल्यामुळे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षा रक्षक नेमावेत तसेच वस्तीवर व एकटे राहणाऱ्या कोणीही आपापली घरे बंद करून जाण्यापूर्वी शेजाऱ्याला कळवावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

दरम्यान नारायणगाव येथील जुन्नर रस्त्याजवळील ओमकार सोसायटी मध्ये राहणारे ग्रामसेवक संतोष भोसले यांची तळमजल्यावरील सदनिका व त्यांच्याच समोरच्या इमारतींमध्ये चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या संजिवनी संतोष गाडेकर यांच्या बंद असलेल्या सदनिका पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी फोडण्यात आल्या. संतोष भोसले यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये तीन चोरटे दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत घुसले असल्याचे निदर्शनास आले आहे.

खोडद रोड येथील डॉक्टर गोसावी हॉस्पिटल समोरील संतुष्टी प्रेस्टिज सोसायटीमध्ये असलेले संदीप बांगर यांचे कार्यालय व शेटे मळा येथील शुभम सोसायटीमधील सरस्वती इमारती मध्ये राहणारे वैभव पाचपुते यांची सदनिका अज्ञात चोरट्यांनी फोडून काही ऐवज चोरून नेला आहे.

दरम्यान संतोष भोसले यांच्या घरातून रोख रक्कम ५० हजार रुपये व दोन वीस हजार रुपयांची टायटन कंपनीची घड्याळे असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. तर संजीवनी गाडेकर यांच्या घरातून लहान मुलाचे सोन्याचे सुमारे एक तोळे वजनाचे दागिने व चांदीच्या पट्ट्या चोरट्यांनी पळूवून नेल्या आहेत. तर खोडद रोड येथील कार्यालय व सदनीके मधून किरकोळ ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Previous articleचालत्या बस मध्ये ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Next articleमातोश्री सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने थंड पाण्याची पाणपोई