चालत्या बस मध्ये ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नारायणगाव,किरण वाजगे

चालत्या बसमध्ये प्रवाशाचा मृत्यू झाला असल्याची घटना नारायणगाव (ता. जुन्नर) येथे आज (दि. २७ रोजी) दुपारी घडली आहे.
साक्री पुणे ही बस आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नारायणगाव जवळ आली असताना आळेफाटा येथे बसलेल्या एका तरुण प्रवाशाचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना नारायणगाव येथे पुणे नाशिक महामार्गावर घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील साक्री येथून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास नारायणगाव जवळ येताच अमित अरविंद घोलप (वय ३७, रा. गुरुवार पेठ, धनगर आळी पुणे) हे प्रवासी बस वरील सीटवर बसले असताना अचानक आकडी आली व ते बेशुद्ध झाले. यामुळे त्यांना बस चालक रोहिदास हरी बागुल व बस वाहक यांनी पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये आणले. परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या रुग्णाला नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात घेऊन जा असे सांगितले. त्याच वेळी काही प्रवाशांच्या मदतीने व रुग्णवाहिका चालक संजय भोर यांच्या मदतीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ माटे यांनी अमित घोलप यांची तपासणी केली असता उपचारापूर्वीच ते मृत्युमुखी पडले असल्याचे डॉ माटे यांनी सांगितले.
दरम्यान ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक संजय भोर तसेच बस चालक रोहिदास हरी बागुल यांनी मयत अमित घोलप यांना दवाखान्यात नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले मात्र उपचारापूर्वीच अमित घोलप मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या खिशात रोख रक्कम देखील होती. नेमकी ही घटना कशी घडली याबाबत बस चालक बागुल व प्रवाशांनी याबाबत माहिती दिली आहे.

या घटनेचा पंचनामा पोलीस हवालदार संतोष दुपारगुडे व कॉन्स्टेबल कोळी यांनी केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार काळूराम साबळे करत आहेत.

Previous articleधामणीच्या जाधव पाटलांच्या रावण बैलाला मिळाली विक्रमी किंमत
Next articleनारायणगावात चोरट्यांचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत तीन चोरटे कैद