नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवाच्या यात्रेला प्रारंभ

नारायणगाव : किरण वाजगे

संपूर्ण पुणे जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या व सर्वात जास्त दिवस चालणाऱ्या नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवाच्या यात्रेला आज उत्साहात प्रारंभ करण्यात आला.यात्रेच्या पहिल्या दिवशी श्री मुक्ताबाई देवीच्या उत्सव मूर्ती व पादुकांची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा काढत मिरवणूक व महाआरती करण्यात आली. याप्रसंगी यात्रा समितीचे संयुक्त अध्यक्ष संतोष नाना खैरे, सुजित खैरे, सरपंच योगेश पाटे, देवस्थान ट्रस्ट व समाज मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी तसेच समस्त ग्रामस्थ नारायणगाव वारूळवाडी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सकाळी नऊ वाजता श्री मुक्ताबाई देवी मंदिरातून देवीची चांदीची मूर्ती पालखी मध्ये ठेवून मावळे आळी वाजवी आळी पेठ आळी मार्गे हनुमान चौकात आली तेथून बाजारपेठ मधून पूर्व वेस मार्गे पुन्हा मुक्ताई मंदिरात पालखी ग्राम प्रदक्षिणा घालत वाजत गाजत आणण्यात आली. याप्रसंगी देवीची महाआरती, अभिषेक करण्यात आला.
यात्रा सलग आठ दिवस होणार असून देवीला मांडव डहाळे, शेरणी नैवद्य, पालखी व घागरी मिरवणूक, छबिना मिरवणूक, शोभेचे दारूकाम तसेच कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे.

या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दिवंगत ज्येष्ठ तमाशा कलावंत तुकाराम खेडकर, पांडुरंग मुळे तसेच विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेची मिरवणूक देखील काढण्यात आली. सतत आठ दिवस आजपासून रोज रात्री लोकनाट्य तमाशाचे कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती यात्रा समितीचे संयुक्त अध्यक्ष संतोष नाना खैरे, सुजित खैरे व सरपंच योगेश पाटे यांनी दिली.

Previous articleकवठे येमाई येथे जागतिक हिवताप दिन साजरा
Next articleआयपीएस अधिकाऱ्यांनी झाडाखाली भरवली शाळा ; शेवराई संस्थेचा कौतुकास्पद उपक्रम