आळंदी,मरकळ, तुळापूर ,लोणीकंद रस्त्यासाठी ३५ कोटींचा निधी मंजूर

पुणे – राज्याच्या अर्थसंकल्पात हवेली तालुक्यातील आळंदी मरकळ तुळापूर लोणीकंद रस्त्याची सुधारणा करण्यासाठी व इंद्रायणी नदीवरील कमकुवत पुलाच्या पुनर्बाधणीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या निधी मागणीला पालकमंत्री अजितदादा पवार यांनी प्रतिसाद देत एकूण रु. ३५ कोटींचा निधी मंजूर केला असून यापैकी रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.

आळंदी मरकळ तुळापूर लोणीकंद (राज्य मार्ग ११६) या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे धोक्याचे झाले आहे. तसेच कि.मी. ३१ वर असलेला इंद्रायणी नदीवरील पूल कमकुवत झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक बनला असल्याने या रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण आणि बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे यांच्याकडे या रस्त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री पवार यांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लोणीकंद (रा.मा.११६) रस्त्यावरील कि.मी.३१/०० वरील इंद्रायणी नदीवरील पुलासाठी रु. ११ कोटी तर कि.मी. २१/४०० ते कि. मी. ३१/०० रस्त्यासाठी रु. १२ कोटी आणि कि.मी. ३१/०० ते कि.मी. ३८/०० या ७ कि.मी. लांबीसाठी १२ कोटी असा एकूण रु. ३५ कोटींचा भरीव निधी मंजूर केला.

या मंजूर कामापैकी रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून येत्या २२ एप्रिलपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत आहे. तर पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया येत्या आठवडाभरात सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असलेल्या या आळंदी मरकळ तुळापूर लोणीकंद (राज्य मार्ग ११६) या रस्त्याच्या सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे.

या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, वर्षानुवर्षे खराब झालेल्या आळंदी मरकळ तुळापूर लोणीकंद (राज्य मार्ग ११६) या रस्त्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले होते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी असलेल्या श्रीक्षेत्र आळंदी आणि छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर या धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या स्थळांना जोडणारा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असल्याची जाणीव सातत्याने होत होती. मात्र मध्यंतरी कोविड संकटकाळात निधीची कमतरता असल्याने थोडा उशीर झाला असला तरी आता जनतेला चांगला रस्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक जनता, मतदार व प्रवास करणाऱ्या वाहनचालक या सर्वांना लवकरच दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.

खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण जनतेला दिलेल्या आश्वासनापैकी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बायपास रस्त्यांची कामे, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, पुणे शिरूर रस्ता, तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता, कोरेगाव भीमा, वढु, चौफुला, केंदूर पाबळ रस्ता आणि सर्वात जिव्हाळ्याचा विषय असलेली बैलगाडा शर्यत सुरू करण्यात यशस्वी झालो याचा मनस्वी आनंद आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना डॉ. कोल्हे यांनी मनापासून धन्यवाद दिले, तर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे या सर्वांचे सहकार्य लाभले याचा विशेष उल्लेख खासदार डॉ. कोल्हे यांनी केला.

Previous articleपेंशन धारकांना किमान पेंशन पाच हजार रूपये व महागाई भत्ता देण्याची मागणी
Next articleवाघोलीत उद्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन