आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात

राजपूर (ता.आंबेगाव) येथे केंद्रातील नऊ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात पार पाडला.यावेळी अंगणवाडीतून इयत्ता पहिलीत येणाऱ्या बालकांचे सेल्फी काढून स्वागत व फेटा बांधून,फुगे,चॉकलेट,गुलाबाची फुले देऊन सत्कार करण्यात आला. सुरुवातीला पुरुष व महिलांच्या लेझीम पथकाने,ढोल,ताशाच्या निनादात व बालकांनी ‘ताई माई आई आक्का-विद्यार्थ्यांचा पाया करा पक्का’, ‘मेळावा कशासाठी-विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी,’ ‘शाळापूर्व तयारी असे आमची शान-विद्यार्थी करू हुशार आणि छान’ अशा संदेशफलकासह प्रभातफेरी काढली.त्यानंतर सरस्वती पूजन सरपंच कमल लोहकरे व मेळाव्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देहू कोकाटे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर लोहकरे,पोलीस पाटील उत्तमराव वाघमारे,सुभाष भोते,निवृत्ती गवारी,माजी सैनिक जिजाराम भोईर, केंद्रप्रमुख चिमा बेंढारी,ग्रामसेवक उल्हास कारभळ,माजी मुख्याध्यापक काळू लोहकरे,खंडू उंडे,हनिफ इनामदार, ग्रामपंचायत सदस्य बारकू उंडे,अंगणवाडी सेविका,विविध शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,महिला व विद्यार्थी उपस्थित होते.

मेळाव्यात तळेघर,फलोदे, कोंढवळ, गवांदेवाडी, निगडाळे, म्हतारबाचीवाडी,राजपूर,पालखेवाडी,सावरली शाळांतील दाखलपात्र बेचाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी मुलांची नावनोंदणी करून प्रत्येकाचा शारीरिक, बौध्दिक, सामाजिक, भावनिक व भाषा विकास,गणनपूर्व तयारीबाबत प्रात्याक्षिकांद्वारे क्षमतांची चाचपणी करण्यात आली.पालकांची शाळापूर्व तयारीमध्ये भूमिका काय आहे,यावर पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यांना विकासपत्रक तसेच कृतीपुस्तिका देण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षापासून अंगणवाड्या बंद असल्याने बालकांना शाळा पूर्वतयारी कृतीची संधी मिळाली नाही.त्यामुळे बालकांची अपेक्षित शाळा पूर्वतयारी व्हावी व त्याआधारे दाखलपात्र बालकांचे पहिलीच्या वर्गात सहज संक्रमण घडून यावे याकरिता ‘शाळा पूर्वतयारी मेळावा’ आयोजित करण्यात आला होता.

मेळाव्याचे संयोजन मुख्याध्यापक सावळेराम आढारी,गोविंद उतळे,अनिल वाव्हळ,पांडुरंग भवारी,संतोष थोरात,राजू भालेराव,उषा गवारी,रतन सुक्रे,वृषाली बोऱ्हाडे,नयना चौधरी,अलका गुंजाळ,सुनंदा काळे,तुकाराम डामसे,वामन गभाले,किरणराज शेंगाळे,मनोहर थोरात,काळूराम भांगरे,बाळासाहेब गेंगजे यांनी केले.प्रास्ताविक संजय हुले व आभार मनोहर केंगले यांनी मानले.

Previous articleओझरच्या विघ्नहराचे अंगारकी चतुर्थीला लाखो भाविकांनी घेतले दर्शन
Next articleथेऊर- अंगारकी चतुर्थीच्या निमित्त व्हिलेजर्स फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन