ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या ७२५ व्या वर्षानिमित्त राजभवन येथे अजानवृक्षाचे रोपण

पुणे – भगवान श्रीकृष्णांनी संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली तर भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी जवळ अजानवृक्ष आहे. आपल्या देशात तुळशीपासून तर वटवृक्षापर्यंत प्रत्येक झाडाला सांस्कृतिक महत्व आहे. वृक्षारोपण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असून वृक्षारोपण ही लोक चळवळ होऊन त्याद्वारे पर्यावरण रक्षणाचे कार्य केले जावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या ७२५ व्या वर्षानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. ११) राजभवन येथे अध्यात्मिक व धार्मिक महत्व असलेल्या अजानवृक्षाचे रोपण करण्यात आले.

पर्यावरण व जैवविविधता अध्ययन, संरक्षण व संवर्धन या क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘बायोस्फिअर्स’ या संस्थेतर्फे वृक्षारोपण तसेच पर्यावरण रक्षणासंबंधी संबंधी माहिती पत्रकांच्या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आपल्या देशात प्रत्येक झाडाचे सांस्कृतिक महत्व जाणून पूजा केली जात असे. यामागे शास्त्रशुद्ध चिंतन व दूरगामी विचार होता. परकीय आक्रमणाच्या काळात शास्त्रीय विचार मागे पडून केवळ रूढी उरल्या. त्यामुळे प्रत्येक झाडाचे शास्त्रीय महत्व समजून त्याचे वृक्षारोपण केले जावे, असा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

सिद्धवृक्ष गोरक्षवल्ली, शांभवी, योगवल्ली, आदी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अजानवृक्षाचे राजभवन येथे रोपण केल्यामुळे त्याला राजाश्रय मिळाला असे बायोस्फिअर्स संस्थेचे संस्थापक व पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ सचिन पुणेकर यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये अजानवृक्षाचे रोपण व्हावे व त्यामाध्यमातून नवी पिढी पर्यावरणाबाबत जागरूक व्हावी अशी अपेक्षा पर्यावरण तज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

संत ज्ञानेश्वर यांच्या समाधीवर असलेलाल अजानवृक्ष सर्वदूर पोहचवणे तसेच त्या माध्यमातून ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने बायोस्फिअर्स ही संस्था कार्य करीत असल्याची माहिती पुणेकर यांनी दिली.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते अजानवृक्ष व सुवर्ण पिंपळ या वृक्षांची शास्त्रीय माहिती देणाऱ्या माहितीपत्रांचे प्रकाशन करण्यात आले तसेच जलसंवर्धन व जलसाक्षरता या विषयावरील लघूपटाचे प्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसमवेत मा. आमदार मंगलप्रभात लोढा, पर्यावरण तज्ञ डॉ. सचिन पुणेकर, महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे, ह.भ.प. माणिक महाराज मोरे, डॉ रवींद्र जायभाये, डॉ. मोहन वामन, डॉ. शंकर लावरे, सुरेश वैद्य, शिवलिंग ढवलेश्वर , दत्तात्रय गायकवाड, चंद्रकांत सहासने, आशिष तिवारी, जय जगताप, सुनील जंगम, निवेदिता जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण तज्ञ डॉ. सचिन पुणेकर, त्यांची बायोस्फिअर्स संस्था आणि पर्यावरण क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्ती यांची मदत आणि मार्गदर्शन घेवुन महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळाच्या निसर्गरम्य असलेल्या पर्यटक निवासांच्या आवारातही अशाप्रकारचे वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. भारतीय प्रजातींची झाडे आणि आध्यात्मिक, धार्मिक महत्तव असलेले वृक्ष यांचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आणि पर्यावरण व जैवविविधता यांचे संरक्षण करण्यासाठी जबाबदार पर्यटनाच्या अंतर्गत असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहीती महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी दिली आहे.

दिपक हरणे
प्रादेशिक व्यवस्थापक,
महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळ, पुणे.

Previous articleटीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना स्कॉटिश कड्यावरून मानवंदना
Next articleमहावीर जयंतीनिमित्त नारायणगावात विविध कार्यक्रम उत्साहात