टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना स्कॉटिश कड्यावरून मानवंदना

राजगुरूनगर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत सह्याद्री खोर्यात आरोहणासाठी अति कठीण श्रेणीत गणला जाणारा ५५० फूटी स्कॉटिश कडा सर करीत टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी तिरंगा फडकावित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करीत त्यांना वंदन केले.

या मोहिमेची सुरवात नाशिक जिल्ह्यातील निरगुडपाडा येथून झाली. दोन तासांची पायपीट करून कड्याच्या पायथ्याला पोहचून शिव गर्जना देऊन आरोहणास सुरवात झाली.

खडकांच्या खाचांमध्ये हातांच्या आणि पायांच्या बोटांची चिकाटीने मजबूत पकड करून आरोहण करावे लागते. पहिला ७० फूटी टप्पा हा ८० अंशातील आहे. त्या नंतर पुढील आरोहण मार्ग हा अंगावर येणारी उभी भिंतच. पुढे ७० फूटी टप्पा पार केल्यावर बहिर्गोल खडक आरोहण करणे कठीण जाते. येथून पुढे कधी दोन खडकांच्या मधून अंग चोरून तर कधी बाहेर येऊन आरोहण करावे लागते. हा १०० फूटी टप्पा पार केल्यावर अजून ७० फूटी अरुंद भिंतीमधील टप्पा पार केल्यावर शेवटचा ३० फूटी मातीचा घसरडा टप्पा गडावर घेऊन जातो.

छातीत धडकी भरावी अश्या सरळसोट कड्याचे रांगडे रूप, उष्णतेची लाट असल्याने मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहणारी खडतर मोहीम, ९० अंशातील ५५० फूट आरोहण मार्ग, चुकीला माफी नाही असे हे ठिकाण, काळजाचा थरकाप उडवणारी चित्तथरारक चढाई, कोणत्याही क्षणी कोसळणारे दगड (लूज रॉक्स) अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या चेतन शिंदे, जॅकी साळुंके, समीर देवरे, विशाल बोडके, तेजस जाधव, मंदार चौधरी, सिद्धार्थ बावीसकर, महेश जाधव, अमोल शिंदे, बालाजी जामखेडे, गोकुळ पाटील, सागर शिंदे, प्रज्वल शिंदे, शशी पारसे, राजश्री चौधरी, अनुप इंगोले, सागर चौधरी, माही बारीस, सुवर्णा कांगणे आणि डॉ.समीर भिसे या गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते केली.

Previous articleराजगुरूनगर मध्ये हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा
Next articleज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या ७२५ व्या वर्षानिमित्त राजभवन येथे अजानवृक्षाचे रोपण