खेड ,नारायणगाव, मंचर ,शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरी करणाऱ्या व विकत घेणाऱ्या तिघांवर कारवाई

नारायणगाव (किरण वाजगे)

मागिल काही दिवसांमध्ये नारायणगाव, मंचर, खेड व शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ब्रँडेड कंपनीचे मोबाईल चोरणारे व विकणारे अशा तीन जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजगुरूनगर येथे सापळा रचून आज कारवाई केली. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली.
तिघा आरोपींना ताब्यात घेतले असून याबाबत मंचर पोलीस स्टेशन मध्ये शशिकांत जयराम लोखंडे (वय ३७ रा. पारगाव तर्फे अवसरी ता. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली होती.

या घटनेतील आरोपी निखिल विजय पलांडे (वय २६) सचिन आत्माराम मोहिते (वय ३३, दोघेही रा. मुखई ता. शिरूर जि पुणे ) हे दोन आरोपी कोणत्याही प्रकारे काम धंदा करत नसून त्यांच्याकडे मोबाईल विक्रीसाठी आहेत व ते आज दिनांक १३ रोजी शिरोली फाटा येथे नवीन मोबाईल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्यामार्फत मिळाली. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयित रित्या तेथे वावरत असलेल्या निखिल पलांडे व सचिन मोहिते यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचे नवीन मोबाईल आढळले. प्रथम त्या मोबाईल विषयी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच आपण हे मोबाईल पारगाव तर्फे अवसरी येथील ओम एंटरप्राइजेस या मोबाईल शॉपी मधून ३० मार्च २०२२ रोजी पहाटे चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून विविध कंपनीचे ३ लाख ४ हजार ७२१ रुपयांचे १२३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हे मोबाईल त्यांनी शिक्रापूर येथील पाबळ चौक हिवरे रोड येथे राहणारा अमन मुकेश अग्रवाल याला विकले असल्याची कबुली दिली. त्यानुसार अमन अग्रवाल याला ताब्यात घेऊन उर्वरित मोबाईल त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी खेड, शिक्रापूर भागात देखील चोरी केल्याचे कबूल केले. त्यानुसार नारायणगाव, मंचर, खेड व शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, राजू मोमीन, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, दगडू विरकर, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे यांनी केली आहे.

Previous articleटाकळी हाजी येथील व्हॉलीबॉल स्पर्धेत पिंपळगाव संघ विजेता
Next articleघोडेगावचे ग्रामदैवत श्री हरिश्चंद्र महादेव संस्थानच्या अध्यक्षपदी प्रशांत काळे यांची निवड