आळे गावात आढळली बिबट्याची पिल्ले ; ऊसतोड मजुरांनी ऊसतोडणी केली बंद

नारायणगाव : किरण वाजगे

जुन्नर तालुक्यात गेल्या चार दिवसात दोन ठिकाणी बिबट्यांचे सहा बछडे आढळल्याची घटना घडली आहे.आळे- बोरी हद्दीमधील सुनिल आबाजी कुऱ्हाडे यांच्या शेतातील उस तोडणी सुरू असताना गुरुवारी (दि.७) रोजी दोन बिबट्याची पिल्ले म्हणजेच बछडे आढळून आले होते. याबाबतची माहीती त्यांनी आळे गावचे उपसरपंच विजय कुऱ्हाडे यांना दिली. त्यानंतर कुऱ्हाडे यांनी वनअधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता घटनास्थळी अधिकाऱ्यांनी भेट दिली. बिबट्याच्या अस्तित्वामुळे उसतोड कामगारांनी ऊस तोडणी थांबवली होती. या ठिकाणी सापडलेली पिल्ले लहान लहान असल्याने पिल्लांना त्यांची आई घेवून जाईल यासाठी वन विभागाकडून त्यांना पुन्हा त्याच शेतात ठेवण्यात आले होते .

परंतु आज शुक्रवार (दि.८ ) रोजी सकाळी ऊस तोडणीला आलेल्या कामगारांना त्याच ठिकाणी ती पिल्ले आढळून आली. उसातून बिबट्याच्या आवाज येवू लागल्याने पुन्हा उसतोड बंद करण्यात आली.

दरम्यान कबाडवाडी येथे तीन दिवसांपूर्वी संतोष कबाडी यांच्या उसाच्या शेतात ४ पिल्ले आढळून आली होती. या पिल्लांना त्यांच्या आई पर्यंत पोहचवण्यास वन विभागाला यश आले आहे. मात्र काल सापडलेल्या दोन बछड्यांना आपल्या आईची भेट घडू शकली नाही.

दरम्यान नव्याने उप वनसंरक्षक म्हणून नुकतेच रुजू झालेले डीएफओ अमोल सातपुते यांच्यापुढे बिबट्यांच्या वाढत्या प्रजननाचे व इतर समस्यांचे आवाहन ठाकले आहे.

Previous articleअवैध्य गोवंक्षाची वाहतुक करणाऱ्या गाडी मालकाचा खेड न्यायालयाने अर्ज फेटाळला
Next articleपाटस मध्ये १ कोटी १५ लाखांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन