दोन वर्षापासुन फरार असलेल्या पेठ येथील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उरुळी कांचन

डोक्यात कोयत्याने वार करून मागील दोन वर्षापासुन स्वतःची ओळख लपवुन फरारी असलेल्या पेठ येथील आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.

चेतन उर्फ मयूर रामदास शेलार (वय-२२, रा. पेठ, नायगाव, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठ -नायगाव येथील सुधाकर पोपट अडागळे यांनी चेतनच्या अंगावर गुलाल टाकला होता. चेतन शेलार याने सुधाकर अडगळे यांना रस्त्यात अडवून तसेच घरी जाऊन मला गुलाल का लावला याचा राग मनात धरून सुधाकर अडागळे यांच्या डोक्यात कोयत्याने वर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये अडागळे गंभीररीत्या जखमी झाले होते. यावरून चेतन शेलार याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून चेतन शेलार हा पोलिसांना गुंगारा देत होता. तसेच तो राहण्याची जागा सतत बदलत होता. त्यामुळे तो मिळून येत नव्हता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक मदत घेतली परंतु तो कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे कठीण झात होते. परंतु पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली त्यानुसार त्यास सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई लोणी काळभोर पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार सोनवणे, विजय जाधव, पोलीस नाईक दिगंबर जगताप महेश भोंगळे व विशाल बनकर यांच्या पथकाने केली आहे.

Previous articleडिंग्रजवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य व्हॉलिबॉल स्पर्धेत चऱ्होलीचा सावतामाळी संघ विजेता
Next articleयोगेश पाटे आदर्श सरपंच, डॉ वर्षा गुंजाळ आदर्श वैद्यकीय अधिकारी तर नितीन नाईकडे आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित