निराधार पेन्शन योजनेत वाढ करण्याची किसान सभेची राज्यशासनाकडे मागणी

घोडेगाव

महाराष्ट्रात निराधारांसाठी, ५ प्रकारच्या पेन्शन योजना आहेत.या पेन्शनचा गरीब,वृद्ध,विधवा महिला,अपंग, निराधार व्यक्तींना जगण्यासाठी आधार आहे. परंतु येणाऱ्या अर्थसंकल्पात, अतिशय तुटपुंजे असलेली रक्कम महागाईच्या पार्श्‍वभूमीवर वाढविण्याची गरज आहे, व त्यातील जाचक अटी दूर करण्याची आवश्यकता आहे.

या अनुषंगाने किसान सभेच्या आंबेगाव तालुका समितीनेनिवेदनाच्या माध्यमातून श्री धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री ,महाराष्ट्र शासन,यांच्याकडे केलेल्या आहेत.

निराधार पेन्शन फक्त रु १००० व  त्या महिलेला मूल असेल तर १०० रुपये जास्त दिले जातात. १००० रु म्हणजे दिवसाला फक्त ५८ रुपये रक्कम दिली जाते. आजच्या महागाईच्या काळात ही रक्कम अतिशय हास्यास्पद व संतापजनक आहे. तेव्हा किमान १०० रुपये रोज या दराने महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन दिली जावी.

शासकीय कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो त्याप्रमाणे दरवर्षी या पेन्शन रकमेत वाढ नैसर्गिक रीतीने असावी, कारण निराधार व्यक्ती संघर्ष करू शकत नाहीत.

त्यामुळे दरवर्षी या पेन्शनमध्ये २० टक्के वाढ करायला हवी.

या निराधार पेन्शन मध्ये उत्पन्नाची अट 21,000 रुपये आहे, म्हणजे दिवसाला ५८ रुपये उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीलाच हे पेन्शन मिळते.

इतके कमी उत्पन्न कोणाचेच नसते.

त्यामुळे अनेक गरीब कुटुंब या पेन्शनपासून वंचित झाले आहेत.

जुन्या काळी लावलेली, ही उत्पन्नाची अट आता बदलत्या स्थितीत वाढवायला हवी.

आज-काल, अनेक महत्त्वाच्या शासकीय योजनांसाठी वार्षिक उत्पन्नाची अट एक लाख रुपये आहे. तीच एक लाख रुपयांची उत्पन्नाची अट या पेन्शन योजनांसाठी लागू करायला हवी.

बिहार, राजस्थान, दिल्ली, आंध्र, तेलंगणा समवेत बऱ्याच राज्यांनी उत्पन्नाची अट आणि पेन्शनची रक्कम वाढवली आहे.

महाराष्ट्र सरकारनेही जर उत्पन्नाची अट एक लाख केली  तर अनेक गरजू कुटुंब त्यात सामावले जाऊ शकतील.

महाराष्ट्रात सर्वात गरीब व निराधार वर्गासाठी या योजनेचा आधार आहे.

त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने या पेन्शनमध्ये वाढ करावी व उत्पन्नाची मर्यादा वाढवायला हवी.

अशा मागण्यांचे निवेदन किसान सभा,आंबेगाव तालुका समितीचे उपाध्यक्ष राजू घोडे व भारती बाळापुरे,दिव्या जाधव,नंदन लोंढे,महेश गुंजाळ इ.नी आंबेगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून सादर केले आहे.

Previous articleदत्तात्रय वाळुंज यांच्या शेतातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक
Next articleश्री समर्थ विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी