मीना शाखा कालव्याला नारायणगाव येथे भगदाड:अनेक शेतकऱ्यांचे नुकसान

नारायणगाव ,किरण वाजगे

जुन्नर तालुक्यातील वडज धरणातून नगर जिल्ह्यात जलसिंचन करणाऱ्या मीना शाखा कालव्याला नारायणगाव जवळील मुक्ताई ढाब्याच्या पाठीमागे भगदाड पडले असून या कालव्यावर असणारा रस्ता खचला आहे.शनिवारी दिनांक १२ रोजी रात्री अथवा रविवारी पहाटे च्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून नारायणवाडी व नारायणगडाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.

 

प्रसंगावधान दाखवून येथील काही स्थानिक नागरिकांनी या पाण्याचा विसर्ग बंद केला. त्यामुळे फार मोठी दुर्घटना टळली. अजूनही या ठिकाणाहून पाण्याचा थोडाथोडा विसर्ग होत असून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी घटनास्थळाला भेट दिली. या कालव्याहून होणारी वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे.

या कालव्याला भगदाड पडल्यामुळे आजूबाजूच्या शेतात पाणी घुसले आहे. या कालव्यावरील रस्ता नारायणगाव मार्गे गडाचीवाडी, खोडद या परिसरात जात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतमालाची वाहतूक या रस्त्याने केली जात आहे. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

Previous articleवाघोलीत कचऱ्याचा प्रश्न गंभीर
Next articleपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाचे प्रा.डॉ. संजय भागवत यांचा सेवा निवृत्त निमित्ताने माजी विद्यार्थी संघाच्या वतीने विशेष सन्मान