वाघोलीत कचऱ्याचा प्रश्न गंभीर

गणेश सातव,वाघोली- पुणे

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या वाघोली मध्ये ओल्या कचरा उचलण्याबाबत अर्थकारण होत असल्याचे समोर आले आहे. महानगरपालिका नियमानुसार ५० सदनिका व त्यापेक्षा मोठ्या सोसायटीमध्ये ओला कचरा सोसायटीच्या आवारात जिरवणे गरजेचे असताना देखील महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संगनमताने ओला कचरा बाहेर येत आहे. कचरा बाहेर टाकणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे. याबाबत वाघोलीत मात्र अर्थकारणाचे चित्र असल्याचे दिसून येत आहे .

पुणे महानगरपालिकेच्या नियमावलीनुसार नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६ अन्वये प्रतिदिन १०० किलो कचरा निर्माण करणा-या कोणत्याही आस्थापना (सोसायटी – ५० पेक्षा जास्त सदनिका संख्या असलेल्या गृहसंस्था, बंगले, रुग्णालये,नर्सिंग होम,शाळा, महाविद्यालये,विद्यापीठे, इतर शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, हॉटेल्स, मंगल कार्यालये,व्यावसायिक प्रकल्प,बाजारपेठ, केंद्र सरकारच्या विभागांनी व्यापलेल्या इमारती किंवा उपक्रम, राज्य सरकारी विभाग किंवा उपक्रम, स्थानिक संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा खाजगी कंपन्या, धार्मिक स्थळे, स्टेडीयम आणि क्रीडा संकुल) इत्यादी यांनी त्यांच्या आस्थापनेत निर्माण होणा-या (ओला कचरा) जैव विघटनशील कच-याची विल्हेवाट त्यांच्याच आवारात कंपोस्टिंग, बायोमिथनायझेशन अथवा इतर तंत्रज्ञानाद्वारे लावणे बंधनकारक आहे.

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्या सुचनेनुसार वाघोली कार्यक्षेत्रात येणा-या बल्क वेस्ट जनरेटर्सच्या ठिकाणी ओला कचरा जिरविण्याची यंत्रणा उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत माहिती संकलित करण्याबाबत वेळोवेळी आदेश देण्यात आलेले आहे.ज्या ठिकाणी प्रकल्प कार्यान्वित नसेल त्या आस्थापनांना नियमाप्रमाणे नोटीस देऊन व आवश्यक त्याठिकाणी दंडात्मक कारवाई करून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व BWG च्या परिसरात ओला कचरा जिरविण्याची यंत्रणा कार्यान्वित करणेबाबत वेळोवेळी सर्व क्षेत्रिय कार्यालयांना कळविण्यात आलेले आहे.असे असताना देखील ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद असणा-या बल्क वेस्ट जनरेटर्सवर प्रभावी दंडात्मक कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

याउलट वाघोली मध्ये जवळपास मोठ्या व 50 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या जवळपास 84 सोसायटी आहेत मात्र यापैकी फक्त सहा सोसायट्यांमध्ये ओला कचरा विघटन प्रकल्प कार्यान्वित आहे,तर इतर सोसाट्याचा ओला कचरा जातो कुठे हा हि एक मोठा शोधाचा प्रश्न आहे.असा ओला कचरा उचलण्यास महानगरपालिकेला अधिकार नसताना देखील महानगरपालिकेचे कर्मचारी हा कचरा अर्थकारणातून उचलत असल्याची चर्चा सध्या वाघोली परिसरात रंगत आहे.

“संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबतच्या सूचना केल्या असून त्यांना याबाबत आढावा सादर करण्याबाबत कळवले आहेत”-सुहास जगताप (सहाय्यक आयुक्त,नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय.)

“घनकचरा जिरवण्याची जबाबदारी ही संबंधित सोसायटी धारकांची आहे हे अगदी आम्हाला मान्य आहे,परंतु, त्याचबरोबरीने पीएमआरडीएने देखील गृह प्रकल्प पूर्ण होत असताना संबंधित प्रकल्पांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित आहे की नाही हे पाहणे तितकीचं गरजेचे आहे.”-संजीव कुमार पाटील (वाघोली हाउसिंग सोसायटी)

Previous articleवाघोलीत पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर व तलाव परिसराची स्वच्छता
Next articleमीना शाखा कालव्याला नारायणगाव येथे भगदाड:अनेक शेतकऱ्यांचे नुकसान