सांदण दरीतून मराठी पत्रकारीतेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

राजगुरूनगर- आशिया खंडातील सर्वात खोल दरी मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सांदण दरी मध्ये भ्रमंती ग्रुप,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली झिपलाईन (व्हॅली क्रॉसिंग) आणि रॅपलिंगचा थरार अनुभवत राजगुरूनगरच्या गिर्यारोहकांनी मराठी पत्रकारीतेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करीत, पत्रकारांच्या कार्याला सलाम करीत केलेली ही मोहीम निर्भीड, निष्पक्ष पत्रकारीतेस समर्पित केली.

या मोहीमेची सुरवात साम्रद (गाव, ता.अकोले, जि.नगर ) येथून झाली. अवघ्या पंधरा मिनिटांची पायपीट सांदण दरीच्या मुखी घेऊन जाते. येथे गिर्यारोहकांनी ३०० फूट झिपलाईन  (व्हॅली क्रॉसिंग) आणि १२० फूट रॅपलिंगचा थरार अनुभवला.

सांदण दरीतून मार्ग काढताना दोन अजस्त्र भिंती मधून जावे लागते. या भिंती ५० ते ४०० फुट खोल तर अंदाजे २ किलोमीटर लांबीच्या आहेत. वाटेची रुंदी बदलत जाते. हा संपूर्ण मार्ग खडकाळ टप्यातून खाली जातो. काही टप्प्यात गुडघाभर ते अगदी छातीभर साचलेल्या थंडगार पाण्यातून मार्ग काढावा लागतो. आकशातील सुर्याची किरणे देखील खाली दरीत येत नाहीत असा हा रांगडा प्रदेश.

भ्रमंती ग्रुप, नाशिक चे महेश जाधव, त्रिलोक भामरे, गजानन भामरे, दिनेश वर्मा, कृष्णा आव्हाड, युगंधर पवार आणि तांत्रिक सहाय्यक सागर बांडे व हरी भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना गडधे, महेश कुलकर्णी, शिवाजी जाधव, डॉ.किरण सोनावणे, शशांक पगार, अथर्व शेटे आणि डॉ.समीर भिसे या गिर्यारोहकांनी सांदण दरी मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करीत, पत्रकारांच्या कार्यास अनोखी सलामी देत मोहीम फत्ते केली.

Previous articleजऊळके बु || शाळेत शिक्षण परिषदेचे आयोजन
Next articleपांढरेवाडी येथे क्रातीज्योति सावित्रीबाई फुले जयंती मोठया उत्साहात साजरी