पहिणे नवरी सुळक्यावर फडकाविला तिरंगा

राजगुरूनगर- सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा आणि चिमणी क्लाइंब थराराची अनुभूती देणारा २६० फूटी पहिणे नवरी सुळका टीम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर्सच्या मार्गदर्शनाखाली सर करीत गिर्यारोहकांनी अभिमानाने तिरंगा फडकाविला.

या मोहीमेची सुरवात लक्ष्मणपाडा ,पहिणे गाव ( ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक ) येथून झाली. सुरवातीचा टप्पा शेता लगत असणाऱ्या बांधाने जात एक छोटा ओढा पार करावा लागतो. येथूनच घनदाट जंगलातील खड्या चढाईचा मार्ग नवरा नवरी सुळक्याच्या पायथ्याला घेऊन जातो.

सुळका आरोहणासाठी सुमारे एक तास लागतो. खडकांच्या खाचांमध्ये हातांच्या आणि पायाच्या बोटाची मजबूत पकड करून चिकाटीने आरोहण करावे लागते. अंगावर येणारा खडक हा गिर्यारोहकांची मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहणारा आहे. सुळक्याचा खडतर मार्ग “चिमणी क्लाइंब” पद्धतीने आरोहण करावे लागते.

पहिला तीस फूटी टप्पा पार केल्यावर एक छोटा ट्रॅवर्स मारल्यावर खिंडीत गेल्यावर १५ फूट चिमणी क्लाइंब करीत शेजारील डोंगरावरील खडकाळ टप्पा पार करीत “चोक स्टोन” येथे जाता येते.येथून पुन्हा “चिमणी क्लाइंब” करीत सूळक्याच्या बाजूला येऊन अंगावर येणारा खडकाळ टप्पा खूपच चिकाटीने आरोहण करून पार करून शिखर गाठता येते.

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा आणि काळजाचे ठोके चूकवणारा सुळक्याचा अंगावर येणारा खडतर मार्ग, चिमणी क्लाइंबची अनुभूती देणारा थरार, आणि खूपच छोटेसे निसरडे शिखर अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर्सच्या मार्गदर्शनाखाली डॉ.समीर भिसे, अर्चना गडधे, प्रदीप बारी, वंदना कुलकर्णी, माधुरी पवार, प्रशांत राऊत, समीर देवरे, अजय अपूर्व, सर्वेश भावसार, भूषण पवार, अजिंक्य नांदुर्डीकर, ऋषी कुलकर्णी, मंदार आव्हाड, आयुष धंदे, ज्ञानो ठाकरे या गिर्यारोहकांनी अभिमानाने तिरंगा फडकावित मोहीम फत्ते केली.

Previous articleसावरदरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना फराळ व मिठाई वाटप
Next articleशिवसेनेच्या शिवसहकार सेनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील कुंजीर यांची निवड